ब्रेकिंग | जीएमसीतील ऑक्सिजन तुटवड्याची हायकोर्टाकडून गंभीर दखल

मुंबई हायकोर्टाच्या गोवा खंडपीठानं खडसावलं

किशोर नाईक गावकर, संपादक | प्रतिनिधी

ब्युरो : ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे जीएमसीत कोविड रूग्ण दगावण्याच्या घटनेची गंभीर दखल मुंबई हायकोर्टाच्या गोवा खंडपीठाने घेतलीय. बुधवार आणि गुरूवारी रात्री ऑक्सिजन पुरवठ्याचे निरीक्षण करा. ऑक्सिजनअभावी एकही रूग्ण दगावणार नाही, याची काळजी घ्या,असेही खंडपीठाने बजावले आहे. जीएमसीतील ऑक्सिजन पुरवठ्याबाबत सविस्तर अहवाल प्रतिज्ञापत्रामार्फत सादर करा,असे निर्देश देऊनही डीनकडून ते मिळाले नसल्याने खंडपीठाने नाराजी व्यक्त केलीए. ऍडव्होकेट जनरलांमार्फत जीएमसीच्या डीनना खंडपीठासमोर वैयक्तीक हजर राहण्याचे फर्मान खंडपीठाने सोडलेय.

आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी मंगळवारी ऑक्सिजन पुरवठ्यावरून केलेल्या खळबळजनक विधानामुळे सगळीकडेच गोंधळ उडालाय. रात्री 2 ते पहाटे 6 पर्यंत जीएमसीत कोविड रूग्ण का दगावतात, याचा तपास करा,असे संकेत आरोग्यमंत्र्यांनी दिल्यानंतर एकूणच जीएमसीच्या व्यवस्थापनावरच संशयाचे ढग निर्माण झालेत. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काही दिवसांपूर्वीच ऑक्सिजन व्यवस्थापनाची जबाबदारी घेतलीए. त्यांनी तीन सदस्यीय समिती नेमून ऑक्सिजनच्या पुरवठ्यावर तसेच व्यवस्थापनावर देखरेख ठेवण्याची यंत्रणा तयार केलीए. आरोग्यमंत्री राणे यांनी यासंबंधी खुद्द गोवा खंडपीठानेच चौकशी करावी,असे विधान करून अप्रत्यक्ष मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यावरच शरसंधान केलंय.

मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी मंगळवारी उशिरा तातडीची बैठक घेऊन कुणाही रूग्णाला ऑक्सिजनची कमी भासणार नाही,अशी व्यवस्था केल्याचे सांगितले. बुधवारी खुद्द खंडपीठानेच आदेश देऊन दोन दिवस जीएमसीतील ऑक्सिजन पुरवठ्याचे चोविस तास देखरेख करण्याचे आदेश दिल्याने आता सरकारची खरी कसोटी लागणार आहे.

अखेर सत्य उघड

जीएमसीत ऑक्सिजन आणि बेड्सचा तुटवडा असल्याचं डीन बांदेकर यांनी खंडपीठासमोर अखेर मान्य केलंय. १ हजार कोविड रुग्णांसाठी फक्त ७०० बेड्स आणि १६० पाईप ऑक्सिजनचीच सुविधा असल्याची माहिती त्यांनी खंडपीठासमोर दिलीए. जीएमसीचे नोडल अधिकारी यांनी धक्कादायक माहिती पुढे आणलीए. मंगळवारी जीएमसीत 400 सिलींडरची कमी होती,असे सांगून 320 रूग्ण ऑक्सिजनवर तर 160 रूग्ण पाईप ऑक्सिजनवर होते. दुपारी 2 वाजेपर्यंत 500 सिलिंडर्सची गरज होती, असेही ते म्हणाले.

एकंदरीत आत्तापर्यंत आरोग्यमंत्री विश्वजित राणे आणि मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडून सगळं काही आलबेल सुरू आहे, असे जे भासवलं जात होतं ते आता यानिमित्ताने उघड झालंय. या प्रकरणी आता सरकार खंडपीठाला कसं सोमोरं जातं ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे. सध्या ही सुनावणी व्हर्च्यूअल पद्धतीने सुरू आहे.

कोर्ट इथे कुणावरही खापर फोडण्यासाठी नाहीए. प्राप्त परिस्थितीला कोण जबाबदार आहे किंवा आत्तापर्यंत दगावलेल्या रूग्णांचे पोस्टमार्टम खंडपीठ करत नाहीए. फक्त पुढे किमान रूग्ण दगावू नये, यासाठी तातडीने पावले उचलण्याची गरज आहे, असे खंडपीठाने स्पष्ट केलंय. प्रत्येक रूग्णाचा जीव वाचवणे हेच सध्याच्या घडीला प्राधान्य हवे, असंही खंडपीठानं म्हटलंय.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!