तिळारी नदीकाठावर ‘हाय अलर्ट’ ; एनडीआरएफ राबवणार ‘रेस्क्यू ऑपरेशन’

राज्यमार्ग वाहतुकीसाठी बंद झाल्याने मदतकार्यात अडथळे

संदिप देसाई | प्रतिनिधी

दोडामार्ग : तिळारी नदीने सध्या धोका पातळी ओलांडली असून तब्बल 1160 क्युसेक्स इतक्या वेगाने धरणातील पाणी नदीत विसर्ग होत आहे. त्यामुळे नदीला पूर आला असून नदीकाठच्या गावांना अलर्ट करण्यात आले आहे. नदीला आलेल्या पुरामुळे दोडामार्ग बांदा आणि दोडामार्ग तिलारी दोन्ही राज्यमार्गावर पाणी आल्याने दोन्ही राज्यमार्ग वाहतुकीस प्रशासनाने पूर्णतः बंद केलं आहेत. या पुरात अडकलेल्या लोकांच्या मदतीसाठी व संभाव्य धोकादायक परिस्थिती हाताळण्यासाठी प्रशासनाने एनडीआरएफच्या टीमला पाचारण केले आहे. गोवा येथून ही टीम दोडामार्गमध्ये दुपारपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.

दरम्यान कोनाळ, आवाडे, साटेली भेडशी, घोडगे परमे, कुडासे व मणेरी या गावांना पुराचा मोठा फटका बसला आहे. शेती बागायतींचे प्रचंड नुकसान झाले असून अनेक घरे सुद्धा पाण्याखाली गेली आहेत. कुडासे भरपाल, साटेली भेडशी, आवाडे, भेडशी खालचा बाजार, मणेरी खालचा बाजार व बडमेवाडी, खालची हेदुसला पूराचा वेढा पडला आहे.

राज्यमार्गच वाहतुकीसाठी बंद झाल्याने मदतकार्यात अडथळे येत आहेत. आता १० नंतर पावसाचे प्रमाण ओसरल्यावर थोडं नदीतील पाणी कमी होते आहे. मात्र येत्या 4 दिवस पावसासाठी ऑरेंज अलर्ट असल्याने व तिळारी धरणात मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने नदीकाठच्या लोकांवर महापुराची टांगती तलवार कायम आहे. पहाटेपासून स्वतः तहसीलदार अरुण खानोलकर, पोलीस निरीक्षक आर. जी. नदाफ व त्यांच्या टीम पुरस्थिती हाताळण्यासाठी ऑन फिल्ड आहेत. शिवसेना तालुकाप्रमुख बाबुराव धुरी हे सुद्धा मैदानात उतरले असून पुरस्थितीत अडकलेल्यांच्या मदतीसाठी प्रयत्नशील आहेत. तिळारीचे कार्यकारी अभियंता रोहित कोरे हे सुद्धा तिळारीकडे पाण्याखाली गेलेल्या राज्यमार्गमधून वाट काढत तिळारीकडे रवाना झाले आहेत

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!