या आहेत त्या १० गोष्टी ज्यावर पावसाळी अधिवेशनात गाजणार

उद्यापासून तीन दिवसांचे निवडणूक फ्लेवर्ड अधिवेशन

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजीः गोवा विधानसभेचा कार्यकाळ फेब्रुवारी 2022 मध्ये संपुष्टात येतो. उद्या बुधवार 28 जुलै ते 30 जुलै 2021 रोजीपर्यंत तीन दिवसांचं पावसाळी अधिवेशन होणार आहे. या विधानसभा कार्यकाळातील हे शेवटचं अधिवेशन ठरण्याची शक्यता आहे. साहजिकच हे अधिवेशन वादळी ठरणार आहे. सत्ताधारी भाजपच्या 27 अधिक 1 अशा 28 आमदारांच्या बहुमतासमोर विरोधकांची फौज बरीच कमी पडते. त्यात अंतर्गत हेवेदावे, रूसवेफुगवे आणि ऐक्याचा अभाव यामुळे सरकारला चांगलंच फावतं. तरीही हे अधिवेशन मतदारांवर प्रभाव टाकण्याची या कार्यकाळातली शेवटची संधी असल्यानं प्रत्येक आमदार या अधिवेशनात अस्तित्वाची लढाई लढणार आहे. मागील अर्थसंकल्पीय अधिवेशन वाढत्या कोरोना प्रकरणांमुळे अर्धवट आटोपतं घ्यावं लागलं होतं. आता हे अधिवेशन केवळ तीन दिवसांचं आणि त्यात मोठ्या प्रमाणात सरकारी कामकाज असल्यानं यातून नेमकं जनतेसाठी काय साध्य होईल, हा प्रश्न मात्र अनुत्तरीतच आहे.

हेही वाचाः गुणाजी मंद्रेकर यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गुणगौरव

भूमी अधिकारिता बील मांडणार?

मागील मार्च महिन्यात अर्थसंकल्पीय अधिवेशन बोलावण्यात आलं होतं. हे अधिवेशन 24 मार्च 2021 ते 16 एप्रिल 2021 पर्यंत होतं. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी 24 मार्च 2021 रोजी राज्याचा 2021-22 वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर केला होता. याच दरम्यान, कोरोनाची प्रकरणं वाढू लागल्यानं हे अधिवेशन आटोपतं घेण्यात आलं. यानंतर राज्यात नगरपालिका निवडणुका होऊ घातल्या होत्या आणि त्यामुळे पुढील अधिवेशन जुलै महिन्यात घेण्याचं ठरलं होतं. यानुसार 28 ते 30 जुलै रोजीचा कार्यकाळ निश्चित करण्यात आलाय. मागील अधिवेशनाच्या कामकाजाचा भाग या अधिवेशनात पुढे नेला जाणार आहे. खातेनिहाय अर्थसंकल्पीय अनुदानाच्या मागण्यांना या अधिवेशनात मंजूरी देण्यात येईल. खातेनिहाय अनुदानीत मागण्यांवर चर्चा होणार आहे. या व्यतिरीक्त सरकारकडून वेगवेगळी बीलं सादर केली जाणार आहे. यात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी यापूर्वीच संकेत दिलेलं भूमी अधिकारिता बील सादर होण्याची शक्यता आहे. निवडणुकीच्या तोंडावर लोकांना जमिनीचे अधिकार प्राप्त करून देण्याचं आश्वासन देणारं हे बील आगामी विधानसभेच्या दृष्टीकोनातून भाजपसाठी गेम चेंजर ठरू शकेल, अशी रणनिती भाजपने आखली आहे. विषय अनेक पण वेळ कमी.

विरोधकांकडे विषयांची जंत्रीच

कोरोना व्यवस्थापन, कोरोना बळी, खाण प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा निवाडा, पूरामुळे झालेली हानी, ऑनलाईन शिक्षणातील अडचणी, वाढती गुन्हेगारी, कोविडमुळे रोजगार आणि व्यवसाय गमावलेल्यांची अवस्था, सरकारी नोकर भरती, सामाजिक योजनाचे पैसे रखडणं, रस्त्यांची दुर्दशा, नॅशनल हायवेची दारूण परिस्थिती, लसीकरण, कर्फ्यू असे अनेक विषय या अधिवेशनात चर्चेला येणार आहेत. विरोधक किती प्रभावीपणे हे विषय मांडतात आणि सत्ताधारी कशा चपखल पद्धतीने विरोधकांच्या टीकेला प्रत्यूत्तर देऊन सरकारची बुज राखतात हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

हेही वाचाः तुयेतील ‘ती’ घरं ९० वर्षानंतर आज होणार प्रकाशमान

नड्डांच्या दौऱ्याने भाजपात उत्साह

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्या दोन दिवसांच्या गोवा दौऱ्यानंतर भाजपात उत्साहाचं वातावरण पसरलंय. भाजप आमदारांचे मनोधैर्य वाढल्यानं विधानसभेत त्याचं दर्शन घडणार आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासाठी ही भेट विशेष ठरलीए. आगामी विधानसभा निवडणूक ही डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालीच लढवली जाईल, असंही त्यांनी स्पष्ट करून भाजपांतर्गत नेतृत्वबदलाच्या चर्चेलाही पूर्णविराम दिलाय. डॉ. प्रमोद सावंत यांचं नेतृत्व मान्य नसलेल्या नेत्यांसाठी हे स्पष्ट संकेत असून त्यांनी आत्ताच आपला वेगळा मार्ग चोखाळावा अन्यथा सावंत यांच्या सावलीखाली गुपचुपपणे पक्षासोबत निष्ठाने राहावं, असाच संदेश त्यांच्या या भूमीकेतून सर्वंत्र पसरला आहे. डॉ. प्रमोद सावंत यांना अपशकुन करू पाहणाऱ्या भाजपातीलच काही नेत्यांना ही मोठी चपराक ठरलीए.

हेही वाचाः ACCIDENT | काणकोण गुळे येथे १४ गुरांचा मृत्यू

अधिवेशनात काय काय होणार

पहिल्या दिवसापासून अनुदानीत मागण्यांवर चर्चा

शुक्रवारी खाजगी ठरावांवर होणार चर्चा

खाणबंदी निवाड्याचे पडसाद उमटणार

ऑनलाईन शिक्षणाचा विषय गाजणार

कोविड बळींना कोण जबाबदार?

नोकर भरतीवरून चर्चा रंगणार

वाढच्या गुन्हेगारीचे विरोधकांच्या हाती कोलीत

आपत्ती व्यवस्थापनाचा पूरामुळे झाला पोलखोल

राष्ट्रीय महामार्गाची दुर्दशा आणि रस्ते अपघात बळी

कोविडमुळे रोजगार, व्यवसाय गमावलेल्यांचे काय

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!