‘त्या’ पर्यटकांना त्यांच्या देशात जाण्याची मदत करा

हरमल पंच सदस्य प्रवीण वायंगणकर यांची सरकारला विनंती

निवृत्ती शिरोडकर | प्रतिनिधी

पेडणेः कोरोना काळात राज्यात अडकून पडलेल्या विदेशी पर्यटकांची स्थिती सध्या गंभीर बनलीये. व्हिसा संपूनही ते गोव्यात अडकून आहेत.  दैनंदिन गरजा भागवण्यासाठी त्यांना खूप अडचणी येतायत. काही पर्यटक तर रस्त्याच्या बाजूला थांबून भिकही मागतायत. तोंडावर मास्क नाही, अंगावर कपडे नाही अशी त्यांची परिस्थिती आहे. काही पर्यटक जखमी झालेत. दवाखान्यात जाण्यासाठीसुद्धा त्यांच्याकडे पैसे नाहीत. काम करणार तर काम नाही. हे चित्र हरमल, मांद्रे या किनारी भागात पहायला मिळतंय. या विदेशी पर्यटकांना त्यांच्या देशात परत पाठवण्याची जबाबदारी सरकारने घ्यावी, अशी मागणी हरमल येथील पंच सदस्य प्रवीण वायंगणकर यांनी केलीये.

कोरोनाने केले पर्यटकांचे हाल

पेडणे तालुक्यातील मोरजी, आश्वे- मांद्रे, हरमल, केरी या किनारी भागात अजूनही किमान 100 विदेशी पर्यटक किनारी भागात अडकून पडलेत. काही पर्यटक विविध हॉटेल्स, शॅकवर काम करतायत. सध्या सर्व व्यवहार बंद असल्यानं त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलीये. सध्या तीन-चार पर्यटक एकत्र येऊन एका ठिकाणी बसतात, दारू पितात. काही पर्यटक जखमी होऊन, अंगावर कपडे नाहीत, पायात चप्पल नाही असा अवस्थेत फिरतायत. भिक मागून दोन वेळचं जेवण मिळवण्याची परिस्थिती त्यांच्यावर ओढवलीये, असं वायंगणकर म्हणाले. काही पर्यटक त्यांच्या मायदेशी परत जायला तयार आहेत. मात्र त्यांच्याकडे जाण्यासाठी ना पैसे आहे, ना व्हिसा. त्यांची सरकारने सोय करावी, अशी मागणी वायंगणकरांनी केलीये.

हेही वाचाः डॉ. प्रमोद सावंतजी, तुम्ही या गोमंतभूमीचे खरे पुत्र

कोरोनाच्या नियमावलीचा पर्यटकांकडून फज्जा

कोरोनाने सर्वांनाच वाईट परिस्थितीत आणून उभं केलंय. कोरोनाचे नियम स्थानिक नागरिक पाळतात. मात्र जास्त काळ कोरोनामुळे अडकून पडलेले विदेशी पर्यटक मात्र बिनधास्त तोंडावर मास्क न घालता फिरतात. त्यांच्याकडील पैसेही संपल्याने लोकांकडून, दुकानदारांकडून उधारीवर सामान घेऊन ते दिवस ढकलतायत. ते मास्काचा वापर करत नसल्याने कोरोना फैलावण्याची भीती नागरिकांकडून व्यक्त केली जातेय.

हेही वाचाः CoWIN पोर्टलवर अधिक वेगानं करता येणार बुकींग

सरकारने या पर्यटकांची चौकशी करावी

हरमल तसंच इतर ठिकाणी काही विदेशी पर्यटक किनाऱ्यावर मास्क न घालता फिरतात. काही व्हिसा संपूनही कोरोनामुळे गोव्यात अडकून पडलेत. अशा पर्यटकांची सरकारने चौकशी करायला हवी. त्यांच्या समस्या जाणून घेत त्या सोडवण्याचा प्रयत्न करायला हवा. मनाला वाट्टेल तसं हे पर्यटक वागतात. मात्र पोलिसांकडून त्यांच्यावर कारवाई होताना दिसत नाही.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!