त्यांनी आपल्या पदांचा गैरवापर केला, अन्…

Goan Varta Live | प्रतिनिधी
पणजीः कायद्याच्या दृष्टीने अग्राह्य अशी खोटी कागदपत्र (फोर्ज्ड डॉक्युमेंट्स) कायद्याच्या परिभाषेत बनावट दस्तऐवजाचे मानले जातात. भूखंड विक्री करताना अशी बनावट कागदपत्रे सादर करणं हा कायद्याच्या दृष्टीने मोठा गुन्हा आहे. असा गुन्हा करणारी व्यक्ती शिक्षेस पात्र असते. बार्देश तालुक्यात नुकतंच असं प्रकरण समोर आलंय.
बार्देश तालुक्यातील रेईश-मागूश पंचायत क्षेत्रात बनावट कागदपत्रे सादर करून भ्रष्टाचार केल्याचं प्रकरण घडलंय. या प्रकरणात माजी सरपंच प्रसन्न नागवेकर व सचिव सुबोध प्रभू यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी गुन्हा नोंदविलाय.
नक्की काय झाला विषय
बार्देश तालुक्यातील रेईश-मागूश पंचायत क्षेत्रात बनावट कागदपत्रे सादर करून भ्रष्टाचार केल्याच्या प्रकरणी माजी सरपंच प्रसन्न नागवेकर व सचिव सुबोध प्रभू यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी गुन्हा नोंदविलाय. रेईश-मागूश पंचायत क्षेत्रातील पाच घरे सीआरझेड क्षेत्रातून वाचविण्यासाठी त्यांची घरे शंभर वर्षांपूर्वीची असल्याची बनावट घरपट्टी व कागदपत्रे सादर केलेली. तसंच ही कृती करण्यासाठी प्रसन्न नागवेकर व सुबोध प्रभू यांनी आपल्या पदाचा गैरवापर केलेला.
लोकायुक्ताकडे पोहोचलं प्रकरण
जेव्हा म्हापसाच्या गटविकास अधिकाऱ्यांच्या या तक्रारीची दखल घेतली गेली नाही, तेव्हा हे प्रकरण लोकायुक्ताकडे सादर करण्यात आलं. लोकायुक्त पी.के.मिश्रा यांनी गेल्या वर्षी हे प्रकरण निकालात काढलं. गटविकास अधिकाऱ्यांच्या तक्रारीत तथ्य असल्याचं नमूद केलं. आणि १७ सप्टेंबर २०२० रोजी नागवेकर तसंच प्रभू यांच्या विरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा नोंद करण्याचा आदेश दिला. त्यानुसार भ्रष्टाचार प्रतिबंध विभागाच्या पोलिसांनी मंगळवारी ५ जानेवारीला वरील संबंधिताविरुद्ध गुन्हा नोंदविलाय.