हरमलमध्ये अटीतटीचा सामना! राष्ट्रवादीचे उमेदवार कॉंग्रेसच्या गळाला

उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांच्या भूमिकेकडे लक्ष

निवृत्ती शिरोडकर | प्रतिनिधी

पेडणे : जिल्हा पंचायत निवडणुकीत हरमल मतदार संघातून अपक्ष उमेदवार रंगनाथ कलशावकर, भाजपाचे अनंत गडेकर, कॉंग्रेसचे नारायण रेडकर आणि अपक्ष भारत नाईक यांच्यात अटीतटीची लढत होणार आहे. मात्र उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांच्या भूमिकेकडे लक्ष लागून राहिले आहे. अटीतटीच्या लढतीत रंगनाथ कलशावकर, नारायण रेडकर आणि अनंत गडेकर या तिघांमध्ये खरी लढत रंगणार आहे. ही निवडणूक जशी तिन्ही प्रमुख उमेदवारांना प्रतिष्ठेची आहे. त्यापेक्षा उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर आणि मांद्रेचे आमदार दयानंद सोपटे याना त्याहीपेक्षा महत्वाची आहे. या निवडणुकीवरूनच येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीचे दोन्ही आमदारांचे विचार करून या निवडणुकीत दोन्ही आमदारांनी भाजपच्या बाजूने प्रचारात सहभाग दर्शवला आहे .

आमदार सोपटे यांचे वर्चस्व

हरमल जिल्हा पंचायत क्षेत्रात हरमल, पालये, केरी आणि कोरगाव या चार पंचायत क्षेत्राचा समावेश आहे. एकूण १५ हजार ४९७ मतदार आहेत सर्वाधिक साडे सहा हजार पेक्षा जास्त मते कोरगाव पंचायत क्षेत्रात त्या खालोखाल सहा हजार पेक्षा हरमल तर केरी आणि पालये मिळून साडेतीन हजार मतदार आहेत . कोरगाव पंचायत क्षेत्र हे विधानसभेच्या निवडणुकीत पेडणे मतदार संघात समावेश आहे. मात्र या पंचायत क्षेत्रात आजही मांद्रेचे आमदार दयानंद सोपटे यांचे वर्चस्व आहे.

उपमुख्यमंत्री आजगावकरांची भूमिका काय?

कोरगाव पंचायत मंडळावर उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांचे पूर्ण वर्चस्व आहे. बाबू आजगावकर यांच्या सहकार्याने कोरगाव पंचायत क्षेत्राचा विकास चालू आहे. मात्र नुकतीच भाजपाची एक प्रचार सभा कोरगाव येथे भाजपाचे उमेदवार अनंत गडेकर यांच्या समर्थनास झाली होती. त्या सभेला उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर,आमदार दयानंद सोपटे, भाजपा गोवा प्रदेश अध्यक्ष सदानंद शेट तानावडे आदी उपस्थित होते. मात्र या सभेला कोरगाव पंचायतीचा एकही पंच सदस्य, उपसरपंच, सरपंच उपस्थित नव्हता. उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर हे सभेला उपस्थित असताना एकही पंच सदस्य या सभेला उपस्थित न राहिल्याने एकाच कुजबुज चालू होती. आता उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांच्या भूमिकेकडे लक्ष लागून राहिलंय.

रंगनाथ कलशावकरांसोबत पंचायत मंडळ

कोरगावचे माजी उपसरपंच तथा पंच सदस्य रंगनाथ कलशावकर हे या निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात आहेत. भाजपची उमेदवारी आपल्याला मिळावी म्हणून ते इच्छुक होते. मात्र आमदार दयानंद सोपटे यांचे कट्टर समर्थक अनंत गडेकर याना उमेदवारी मिळाल्याने ते नाराज बनले. भाजपा बंडखोरी करत रंगनाथ कलशावकर यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आणि कोरगाव पूर्ण पंचायत मंडळ त्यांच्या बाजूने आहे.

राष्ट्रवादीचे उमेदवार नरेश कोरगावकर कॉंग्रेसच्या गळाला

मांद्रे मतदार संघातील राष्ट्रवादीचे सर्व्हे सर्वा जेष्ठ नेते राजन साटेलकर यांच्या निधनाने या मतदार संघात कार्यकर्त्याना कोणीच वाली राहिला नाही. मोरजी मतदार संघातून जुवाव फर्नांडीस व हरमल मधून नरेश कोरगावकर यांनी पक्षातर्फे उमेदवारी दाखल केली होती. मोर्जीच्या उमेदवारांनी या पूर्वीच आपला प्रवेश कॉंग्रेस पक्षात केला तर आता निवडणुकीला चार दिवस बाकी असतानाच नरेश कोरगावकर यांनी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेवून कॉंग्रेसचे उमेदवार नारायण रेडकर याना पाठींबा जाहीर करून राष्ट्रवादीचे अस्तित्व धोक्यात आणले.

कोरगावात इतिहासाची पुनरावृत्ती?

या मतदार संघातून हरमल मधील दोन उमेदवार पालये मधील एक उमेदवार आणि सर्वाधिक मते असलेल्या कोरगाव पंचायत क्षेत्रातून एकमेव उमेदवार रिंगणात रंगनाथ कलशावकर यांच्या रुपात आहे. मोठी संख्या मतदार असलेल्या पंचायत क्षेत्रातून एकमेव स्थानिक उमेदवार रिंगणात असल्याने कोरगाव मधून परत एकदा इतिहासाची पुनरावृत्ती होते की काय याकडे लोकांचे लक्ष लागलंय. पहिल्याच जिल्हा पंचायत निवडणुकीत कोरगाव मतदार संघातून या पूर्वी एकमेव कोरगावच्या स्थानिक उमेदवार म्हणून सुविधा सुदीप कोरगावकर रिंगणात होत्या. स्थानिक एकमेव उमेदवार म्हणून रिंगणात असल्याने पूर्ण कोरगावची जनता त्यांच्या मागे उभी राहून सुविधा हीला विजयी केले होते. आता परत एकदा कोरगाव मधून रंगनाथ कलशावकर उभे राहिल्याने इतिहासाची पुनरावृत्ती होते की काय ते पाहत आहे.

मगोची माघार, पार्सेकरांवर लक्ष

हरमल मतदार संघातून मगोचे उमेदवार प्रवीण वायागणकर यांनी उमेदवारी मागे घेतली मात्र अजूनपर्यंत आपला पाठींबा कुणाला ते जाहीर केले नाही. माजी जिल्हा पंचायत सदस्य अरुण बानकर माजी मुख्यमंत्री प्राचार्य लक्ष्मिकान्त पार्सेकर आदींनी आपला पाठींबा कुणाला असेल हे जाहीर केले नाही. शिवाय गोवा फॉरवर्डचे दीपक कलंगुटकर यांनीही आपली भूमिका अजून स्पष्ट केलेली नाही.

या मतदार संघातून कॉंग्रेसचे युवा नेते सचिन परब यांच्या प्रयत्नाना यश आले आहे. दोन्ही राष्ट्रवादीच्या उमेदवाराना कॉंग्रेस पक्षात आणण्यासाठी यश मिळवले मात्र मोरजी मतदार संघातील कॉंग्रेसचे उमेदवार मात्र बैलांच्या झुंजी होण्यापूर्वीच रणांगणातून धूम ठोकली आणि मगोच्या कळपात गेला.सचिन परब यांनी केलेले सर्व प्रयत्न वाया गेले. आता तिरंगी लढतीत कोण बाजी मारतो या वर विधानसभेच्या निवडणुकीचे भवितव्य अवलंबून आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!