दिलदार ‘अण्णा’ गेले !

गोव्याच्या काजू ब्रँडींगचं श्रेय झांटयेंना

किशोर नाईक गावकर, संपादक | प्रतिनिधी

पणजी : गोव्याचे माजी शिक्षणमंत्री, माजी खासदार, उद्योजक आणि सहकार कार्यकर्ते हरीष प्रभू झांटये यांचे शनिवारी वृद्धापकाळाने निधन झाले. ते 85 वर्षांचे होते. राज्यात अण्णा या टोपण नावाने ते सर्वांना परिचित होते. झांटये हे गोव्यातील एक नामंकीत उद्योजक कुटुंब आहे. विनम्रता ही या कुटुंबाची ओळख असून दिलदारपणामुळेही या कुटुंबाचे समाजात एक विशिष्ट स्थान आहे. महत्वाचे म्हणजे पर्यटकांचे खास आकर्षण ठरलेल्या गोव्याच्या काजूगरांना झांटये कुटुंबाकडूनच खरी ओळख प्राप्त करून देण्यात आली. झांटये काजू हा ब्रँड सर्वदूर पोहचला. गोव्यात पहिला काजू कारखाना या कुटुंबाने उभारला. राज्यात चित्रपट थिएटरच्या चळवळीतही झांटये कुटुंबाचे मोठे योगदान आहे.

मालवणचे अण्णा गोंयकार झाले

हरीष झांट्ये यांचा जन्म 22 सप्टेंबर 1935 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथे झाला. झांट्ये यांच्या कुटुंबाचा मुख्य उद्योग काजूगरांचा. डिचोली ही त्यांची कर्मभूमी. केवळ डिचोलीतच नव्हे तर संपूर्ण गोव्यात अण्णांना लोकप्रियता प्राप्त झाली होती. मयेचे विद्यमान आमदार प्रवीण झांट्ये यांचे ते वडील होत.

राजकीय कारकीर्द

1980 च्या विधानसभा निवडणूकीत हरिष झांटये यांनी माजी मुख्यमंत्री शशिकला काकोडकर यांचा पराभव करून गोवा दमण आणि दीव विधानसभेत प्रवेश केला. ते अपक्ष निवडून आले. 1984 मध्ये ते काँग्रेसच्या तिकीटावर डिचोलीतून दुसऱ्यांदा निवडून आले. 1989 साली मगोचे पांडुरंग राऊत यांनी त्यांचा पराभव केला. 1999 मध्ये त्यांचा पुन्हा एकदा पराभव झाला. 2002 मध्ये मात्र त्यांनी मये मतदारसंघातून काँग्रेसचे आमदार म्हणून पुन्हा पुर्नप्रवेश केला. 1980 ते 1981 या काळात वेगवेगळ्या खात्याचे मंत्री म्हणूनही त्यांनी काम केले. तत्पूर्वी १९९१ मध्ये ते दहाव्या लोकसभेवर काँग्रेसचे खासदार म्हणून निवडून गेले. गोवा विधानसभेचे ते तीनवेळा सदस्य होते. शिक्षण, पर्यटन, नागरी पुरवठा, समाज कल्याण, क्रीडा, वीज, नदी परिवहन, माहिती आणि प्रसिद्धी अशा खात्यांचे ते मंत्री होते.

सामाजिक कार्य

शिक्षण, क्रीडा, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात त्यांची रुची होती. नारायण झांट्ये कॉमर्स कॉलेजची स्थापना त्यांनी केली. अनेक वर्षे त्यांनी डिचोली अर्बन बँकेचे अध्यक्षपद संभाळले.

केंद्रीय आयुष मंत्र्यांनी वाहिली श्रद्धांजली

माजी खासदार आणि गोव्याचे शिक्षणमंत्री श्री. हरीश झांट्ये यांच्या निधनाचे वृत्त ऐकून अत्यंत दु:ख झाले.
त्यांनी नेहमीच लोकांसाठी काम केले आहे. त्यांच्या उदार स्वभावामुळे आणि शिक्षण क्षेत्रात त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल ते सदैव स्मृतीत राहतील.
देव त्यांच्या कुटुंबाला हे दु:ख सहन करण्यासाठी सामर्थ्य देवो ही प्रार्थना.
– श्री. श्रीपाद नाईक, संरक्षण राज्यमंत्री

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!