हाळी चांदेल येथे गुरुद्वादशीचा कार्यक्रम

हाळी गावात भक्तीमय वातावरण

Goan Varta Live | प्रतिनिधी

पेडणे- पेडणे तालुक्यातील चांदेल येथील हाळी गावात गुरुवारी गुरुद्वादशीचा कार्यक्रम संपन्न होत आहे. देवी श्री.महालक्ष्मी आणि श्री. वंस पंचायतन देवतांच्या मंदिरात हा कार्यक्रम वार्षिक रित्या साजरा होत असतो. आश्विन कृष्ण एकादशी ते गुरुद्वादशी पर्यंत चालणाऱ्या या कार्यक्रमात २४ तास “राम नामाचा” जप होत असतो.

एकादशी दिवशी सकाळी मंदिरातील देवतांच्या पूजेनंतर श्री राम आणि श्री राघव रामदास स्वामींचा घट बसवला जातो. त्यानंतर शिवलिलेतील अकराव्या अध्यायाचं पारायण केलं जातं आणि आरतीनंतर ठीक दुपारी बाराच्या ठोक्याला राम नामाचा जप सुरू केला जातो. मंदिरातील प्रत्येक भाविकांच्या ओठांवर ” श्री राम जय राम जय जय राम ” हा जप पुढील २४ तास येत असतो. दुसऱ्यादिवशी म्हणजे गुरुद्वादशी दिवशी रात्रभर चालणाऱ्या नामस्मरणाचा रंग अधिकच फुलतो, संगळीकडे भक्तिमय वातावरण निर्माण होते आणि दुपारी बारा वाजता आरतीने या सप्ताहाची समाप्ती होते. त्यानंतर देवतांचा कौल आणि महाप्रसाद होतो .

या सप्ताहाची आख्यायिका बघायची झाली तर हाळी गाव खूपच मागासलेला होता,गावात दोन वेळेच्या अन्नाची सोय नव्हती आणि अशावेळी गावातल्या काही जाणत्या मंडळीनी श्री राघव रामदास स्वामी यांच्याकडून दीक्षा घेतली आणि या रामनाम सप्ताहाची सर्वात झाल्याचे जाणती मंडळी सांगतात. हा सप्ताह सुरू झाल्यापासून हाळी गाव सुखी आहे , आणि तेव्हापासून हाळी गाव नावारूपास येत आहे असेही मानले जाते .

पण यंदा कोविड -१९ च्या वाढत्या संक्रमणामूळे हा कार्यक्रम मर्यादित स्वरूपात होणार असून सरकारी नियमावली पाळून हा कार्यक्रम संपन्न होणार आहे.

हेही वाचा

शिरोड्याच्या कामाक्षी देवीचं मंदिर उघडणार, पण…

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!