दीडशतकानंतरही ‘कोसळधार’ सुरूच!

नद्यांच्या पाणी पातळीत वाढ, पडझड; रस्ते पाण्याखाली

सचिन खुटवळकर | प्रतिनिधी

पणजी : यंदाच्या मान्सून हंगामात राज्यात इंचांचे दीडशतक पार करत पावसाने सोमवारीही संपूर्ण राज्याला झोपडून काढले. त्यामुळे राज्यातील सर्वच नद्या आणि नाल्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. काही ठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या. तर काही भागांतील रस्ते पाण्याखाली गेले. पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवत राज्य हवामान खात्याने मंगळवारी ऑरेंज अलर्टही जारी केला आहे. त्यामुळे सरकारने आपत्कालीन यंत्रणेलाही सज्ज राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. 
बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याच्या प्रभावामुळे गेल्या तीन-चार दिवसांपासून महाराष्ट्र, कर्नाटकप्रमाणेच गोव्यातही पावसाने ठाण मांडले आहे. रविवारी सकाळी 8.30 ते सोमवारी सकाळी 8.30 या चोवीस तासांत 3.54 इंच पाऊस पडला. त्यामुळे इंचांचे दीडशतक पार करत सोमवारी सकाळपर्यंत 153.48 इंच पावसाची नोंद झाली होती. त्यानंतर सोमवारी दिवसभर पाऊस कायम होता. त्यामुळे सोमवारी रात्रीपर्यंत 155.26 इंच पूर्ण होऊन पावसाने गेल्या सात वर्षांतील मान्सून हंगामातील सर्वाधिक पावसाचा विक्रमही नोंद केल्याची शक्यता आहे. गेल्या हंमागात 1 जून ते 21 सप्टेंबर या कालावधीत पडलेल्या पावसापेक्षा यंदाचा पाऊस तब्बल 35 टक्के अधिक आहे. गत हंगामात याच कालावधीत राज्यात 11.86 इंच पाऊस पडला होता. 
गेल्या दोन दिवसांत संपूर्ण राज्यभर पडलेल्या मुसळधार पावसामुळे पेडणे, बार्देश तसेच सत्तरी तालुक्यांत घरे तसेच वृक्ष कोसळून नागरिकांचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे. वृक्ष उन्मळून रस्त्यांवर पडल्याने अनेक ठिकाणचे रस्ते वाहतुकीसाठी बंद झाल्याचे दिसून आले. दोन्ही जिल्ह्यांतील नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. पण छोट्या नाल्यांना पूर आल्याने पाणी रस्त्यावर साचले. त्याचा फटका नागरिक तसेच वाहन चालकांना बसला. गुडी-पारोडा परिसरात रस्ता पाण्याखाली गेल्याने चारचाकी आणि दुचाकी पाण्यात सापडल्या. त्या बाहेर काढताना स्थानिकांच्या नाकीनऊ आले. डिचोली परिसरात नाल्याचे पाणी रस्त्यांवर आल्याने स्थानिक प्रशासनाने पंपिंगचे काम हाती घेतले होते. 
हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस कायम राहिल्यास तिलारी धरणाचे दरवाजे पुन्हा उघडले जाण्याची शक्यता आहे. त्याचा फटका पुन्हा एकदा बार्देश, डिचोली तसेच सत्तरी तालुक्याला बसण्याची भीती स्थानिकांकडून व्यक्त केली जात आहे. दक्षिण गोव्यातील कुशावती नदीची पाणी पातळी वाढल्याने नदी परिसरातील स्थानिकांतही भीतीचे वातावरण पसरले आहे.
ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!