‘जीटीटीपीएल’कडून 20 शाळांना शालेय साहित्याचे वाटप

फर्निचरसह शैक्षणिक साहित्याचा समावेश

किशोर नाईक गावकर, संपादक | प्रतिनिधी

पणजी : गोवा तमनार ट्रान्समिशन प्रोजेक्ट लिमिटेड (जीटीटीपीएल) कंपनीने सामाजिक उपक्रमाअंतर्गत दक्षिण गोव्यातील 20 अनुदानित शाळांना शालेय साहित्याचे वाटप केले. सावर्डे मतदारसंघात आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला सावर्डेचे आमदार तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री दीपक पाऊसकर, दक्षिण गोवा जिल्हा पंचायत अध्यक्ष सुवर्णा प्रभू तेंडुलकर तसेच जीटीटीपीएलचे प्रकल्प प्रमुख निनाद पितळे उपस्थित होते.

700 हून अधिक विद्यार्थ्यांना लाभ

शालेय साहित्यात फर्निचर, शैक्षणिक साहित्याचा समावेश आहे. या साहित्याचा सुमारे 700हून अधिक विद्यार्थ्यांना लाभ मिळणार आहे. मुले ही देशाचं भवितव्य आहेत आणि त्यांना चांगल्या सुविधा तसेच योग्य साधनं मिळणं गरजेचं आहे. हा विचार करूनच जीटीटीपीएलने शैक्षणिक साहित्यवाटपाचा विचार केला, अशी माहिती प्रकल्प प्रमुख निनाद पितळे यांनी दिली.

सामाजिक उपक्रमांचा फायदा

राज्यातील वेगवेगळ्या उद्योजकांना सामाजिक उपक्रमाअंतर्गत चांगले प्रकल्प आणि कामं हाती घेण्यासाठी सरकार नेहमीच प्रोत्साहित करते. जीटीटीपीएलचा हा उपक्रम अशाच पद्धतीचा ठरलाय. या उपक्रमाचा मोठ्या प्रमाणात लाभ विद्यार्थ्यांना होईल आणि त्यांना शिक्षणाबद्दल आवड निर्माण होण्याबरोबरच शिक्षणासाठीचे चांगले वातावरण तयार होण्यातही मदत होईल, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री दीपक पाऊसकर म्हणाले.

गोव्याला करणार विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण

गोवा तमनार ट्रान्समिशन प्रोजेक्ट लिमिटेड हा केंद्रीय उर्जा मंत्रालयाने 2015 मध्ये मंजूर केलेला आंतरराज्य ट्रान्समिशन सिस्टीम प्रकल्प आहे. उर्जा मंत्रालयाच्या संकल्पनेनुसार हा प्रकल्प एकमेकांशी संबंधित, पण कार्यन्वयाच्या दृष्टीने स्वतंत्र असा प्रकल्प आहे. हा प्रकल्प पाच टप्प्यांत तयार केलाय. 400 केव्ही डीसी सांगोड झेल्डम ट्रान्समिशन लाईन, 400 केव्ही डीसी सांगोड-नरेंद्र ट्रान्समिशन एलआयएलओ लाइन आणि 765 केव्ही डीसी धरमजयगड तमनार ट्रान्समिशन लाईन असे हे पाच टप्पे असतील. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर त्याचे म्हापसा, कोल्हापूर, नरेंद्र- सांगोड, म्हापसा असे वर्तुळ तयार होईल आणि उत्तर आणि दक्षिण गोव्यातील लोकांना विश्वासार्ह विजेचा पुरवठा करणे शक्य होणार आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!