जीएसआयडीसीला कारणे दाखवा नोटीस; तर मुख्यमंत्री वादाच्या भोवऱ्यात

राज्यात 144 कलम असताना जीएसआयडीसीकडून साखळीत पुलाचा उद्घाटन समारंभ; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन; कोविड-19 नियमांचं उल्लंघन केल्यामुळे मुख्यमंत्र्यांवर चौफेर टीका

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजीः गोवा साधनसुविधा विकास महामंडळ (जीएसआयडीसी) तसंच राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत बुधवारी साखळीतील पुलाच्या उद्घाटनानंतर वादाच्या भोवऱ्यात सापडलेत. कोविड-19 नियमावलीचं उल्लंघन केल्याचा आरोप जीएसआयडीसी तसंच मुख्यमंत्र्यांवर करण्यात आला. खुद्द मुख्यमंत्र्यांकडूनच कोविड-19 नियमावलीचं उल्लंघन झाल्यामुळे राजकीय वर्तुळातून त्यांच्यावर चौफर टीका होतेय.

जीएसआयडीसीला कारणे दाखवा नोटीस

कोविड-19 नियमावलीचं उल्लंघन केल्याबद्दल जीएसआयडीसीला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. साखळीत पुलाच्या उद्घाटन कार्यक्रमाला लोकांची झालेली गर्दी, यामुळे जीएसआयडीसीला नोटीस बजावण्यात आलीये. 144 कलमांचा भंग केल्याप्रकरणी कारवाई का करू नये, अशी विचारणा करणारी कारणे दाखवा नोटीस जीएसआयडीसीच्या नावे उत्तर गोवा जिल्हाधिकारी अजित रॉय यांनी बुधवारी रात्री उशीरा ही नोटीस जारी केली. तसंच नोटीसीचं उत्तर देण्यासाठी जीएसआयडीसीच्या व्यवस्थापकीय संचालकांना 48 तासांची मुदत दिली आहे. या पुलाचं उद्घाटन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते करण्यात आलं.

cm bridge 800x450

जीएसआयडीसीकडून कोविड-19 नियमावलीचं उल्लंघन

नोटीसीत असं नमूद करण्यात आलंय की, राज्यात सीआरपीसीचं कलम 144 लागू असूनही साखळीतील वाळवंटी नदीवरील शाहिद दुसरे लेफ्टनंट वीरेंद्र झोबा राणे सरदेसाई पुलावर मोठ्या संख्येने गर्दी दिसून आली. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे या कार्यक्रमासाठी डिचोली उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी कोणतीही परवानगी दिली नव्हती. जीएसआयडीसी कोविड-19 नियमावलीचं पालन करण्यात अपयशी ठरलं असून यामुळे अनेकांचा जीव धोक्यात आलाय.

काँग्रेस नेत्याकडून मुख्यमंत्री, आमदार यांच्याविरोधात तक्रार

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या विरुद्धही कोविड-19 एसओपीचा भंग केल्याचा दावा काँग्रेसचे उत्तर गोवा जिल्हा अध्यक्ष विजय भिके यांनी केला आहे. या मुद्यावरून भिकेंनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासह आमदार प्रवीण झांट्ये आणि अन्य जणांविरोधात पोलिसात तक्रार केली आहे. तक्रारीची प्रत त्यांनी मेलव्दारे डिचोली पोलिस स्थानकाला पाठवली आहे. तक्रारीत भिकेंनी म्हटलंय की राज्यात 144 कलम लागू असताना साखळीत पुलाच्या उद्घाटनावेळी जी गर्दी दिसून आली ते कायद्याने दखलपात्र आहे. त्यामुळे संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे.

लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः मात्र कोरडे पाषाण

कोविड प्रसार रोखण्यासाठी गर्दी करू नका, असा उपदेश मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत करतात. प्रत्यक्षात ते साखळी येथील पुलाच्या उद्घाटनासाठों गर्दी जमवून वावरतात. यावरून मुख्यमंत्र्यांचे हे वर्तन लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः मात्र कोरडे पाषाण या स्वरुपाचे आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अमरनाथ पणजीकर यांनी केली आहे.

सरकारची संवेदनशीलता हरवली आहे

राज्यात 144 असताना शकडो लोक साखळी पुलावरून मुख्यमंत्र्यांसोबत चालत असल्याची चित्रफीत सगळ्या गोमंतकीयांनी पाहिली. कायद्याचं उल्लघंन करणाऱ्या सवावर सरकारी यंत्रणेने ताबडतोब कारवाई करावी व 144 कलमाचा भंग केल्या प्रकरणी गुन्हे दाखल करावेत अशी मागणी विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी केली आहे. गोव्यातल्या ढासळलेल्या कोविड परिस्थितीवर मार्ग काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी बोले तैसा चाले निती अंगिकारावी असा सल्ला मी दोन दिवसांपूर्वी दिला होता. परंतु, आज स्वत: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत त्यांच्या साखळी मतदारसंघातील पुलाचं उद्घाटन केल्यानंतर शेकडो लोकांसोबत पुलावरून चालत गेले. लोकांना सामाजिक अंतर पाळण्याचा सल्ला ते आपल्या या कृतीतून देत होते का?, असा प्रश्न कामत यांनी विचारला आहे. विरोधकांनी केलेल्या सूचनांना मुख्यमंत्र्यानी अशा प्रकारे प्रतिसाद द्यावा हे कल्पनेच्या पलीकडचं आहे. सरकारची संवेदनशीलता हरवली असल्याचं हे उदाहरण आहे, असं मत कामत यांनी व्यक्त केलं.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!