11वी-12वीची परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्यास शिक्षण खात्याकडून ग्रीन सिग्नल

अधिकृत परिपत्रक जारी करत दिली परवानगी

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः सध्याच्या कोविड-19 महामारीच्या काळात गोवा सरकारच्या शिक्षण संचालनालयाला विविध उच्च माध्यमिक शाळांकडून ऑफलाइन पद्धतीने परीक्षा घेण्याची परवानगी देण्यासाठी बरेच विनंती अर्ज प्राप्त झाले. त्यामुळे आता शिक्षणाचा दर्जा राखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने वेळोवेळी जारी केलेल्या सर्व आवश्यक कोविड-19 एसओपी/प्रोटोकॉल आणि मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करत राज्यातील उच्च माध्यमिक विद्यालयांना 11वी-12वीच्या विद्यार्थ्यांसाठी ऑफलाइन पद्धतीने परीक्षा घेण्याची परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे.

शुक्रवारी शिक्षण खात्याने परीपत्रक जारी करत ही परवानगी दिली आहे. ऑफलाईन पद्धतीने परीक्षा घेण्याची परवानगी देताना राज्यातील उच्च माध्यमिक विद्यालयांसाठी राज्य सरकारने काही नियम आणि अटी घालून दिल्या आहेत. या नियम आणि अटींचं पालन करूनच उच्च माध्यमिक विद्यालयांना ऑफालाईन परीक्षा घेता येणार आहेत.

काय आहेत नियम आणि अटी?

विद्यालयाच्या आवारात केवळ लसीकरण केलेल्या कर्मचाऱ्यांना (शिक्षक आणि शिक्षकेतर दोन्ही) परवानगी दिली जाईल. ज्यांना लसीकरण प्रमाणपत्र सादर करता येणार नाही, त्यांना आरटी-पीसीआर चाचणीचा नकारात्मक अहवाल सादर केल्यानंतरच विद्यालयाच्या आवारात येण्याची परवानगी दिली जाईल. असा अहवाल केवळ सात दिवसांसाठीच वैध असेल. सात दिवसांनंतर नवा अहवाल सादर करावा लागेल.

प्रत्येक वर्गात एका वेळी विद्यार्थ्यांची संख्या वर्गाच्या क्षमतेच्या 50% पर्यंत मर्यादित असेल. विद्यार्थ्यांना सामाजिक सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून वर्गात बसवावे आणि वर्गात/विद्यालयात असताना ते नेहमीच मास्क वापरतील.

विद्यालयाच्या आवारात प्रवेश करण्यापूर्वी प्रत्येक विद्यार्थी/कर्मचाऱ्याचे बॉडी टेंपरेचर तपासले जाईल.

विद्यालय सुरू होण्यापूर्वी दररोज संपूर्ण विद्यालयाचा परिसर स्वच्छ केला जाईल.

कोविड-19 ची लक्षणे असलेल्या विद्यार्थ्यांना त्वरित चाचणी करण्याचा सल्ला दिला जाईल.

विद्यालयांनी कोविड-19 चा फैलाव रोखण्यासाठी आवश्यक ती सर्व खबरदारी आणि काळजी घेतली पाहिजे.

असं शिक्षण खात्याने जारी केलेल्या परित्रकात नमूद करण्यात आलंय.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!