गोव्याच्या माध्यम क्षेत्रात मराठी महाचॅनलची मुहूर्तमेढ

'गोवन वार्ता लाईव्ह'चं दिमाखात लोकार्पण

सचिन खुटवळकर | प्रतिनिधी

पणजी : ‘नातं गोव्याचं, देणं मराठीचं’ अशी सार्थ टॅगलाईन असणार्‍या गोवन वार्ता लाईव्ह या गोव्यातील पहिल्या मराठी महाचॅनलचं लोकार्पण शुक्रवारी, धनत्रयोदशीला दिमाखात पार पडलं. हा वैभवशाली सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत ताज हॉटेल अँड कन्वेन्शन सेंटर, दोनापावला इथं पार पडला.

गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, उपमुख्यमंत्री चंद्रकांत उर्फ बाबू कवळेकर, फोमेन्तो मीडियाचे मॅनेजिंग डायरेक्टर अंबर तिंबलो, महाराष्ट्राचे माहिती आणि जनसंपर्क महासंचालक डॉ. दिलीप पांढरपट्टे, गोवन वार्ताचे संपादक संजय ढवळीकर आणि गोवन वार्ता लाईव्हचे संपादक किशोर नाईक गावकर व्यासपिठावर उपस्थित होते. राज्यातील अनेक मान्यवरांनी लोकार्पण सोहळ्याला उपस्थिती लावून शुभेच्छा दिल्या.

गोमंतकीयांचा बुलंद आवाज…

गोव्यात मराठी चॅनलची उणीव भरून काढतानाच गोमंतकीयांचा बुलंद आवाज म्हणून गोवन वार्ता लाईव्हने मुहूर्तमेढ रोवली. विविधांगी कार्यक्रम आणि ताज्या घडामोडींच्या अपडेट्सच्या खजिन्यासह गोवन वार्ता लाईव्हची वेबसाईट यापूर्वीच लाँच करण्यात आली. केबल टीव्हीवरील प्रक्षेपणासह वेबसाईटवरील लाईव्ह स्ट्रिमिंग, यूट्यूब, फेसबुक, टि्वटर, इन्स्टाग्राम, वॉट्सअप, टेलिग्राम अशा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर महाचॅनलच्या माध्यमातून न्यूज अपडेट्स मिळतील.

फोमेन्तो मीडियाचं आणखी एक दमदार पाउल

गोव्याच्या माध्यम क्षेत्रातील आघाडीचा ब्रँड म्हणून ख्यातकीर्त असलेल्या फोमेन्तो मीडियानं मराठी चॅनलच्या माध्यमातून आणखी एक दमदार पाउल टाकलंय. फोमेन्तो मीडियाच्या द गोवन, गोवन वार्ता, भांगरभूंय या वर्तमानपत्रांसह प्रुडंट मीडिया, सिंधुदुर्ग लाईव्ह या चॅनलच्या पंक्तीत आता गोवन वार्ता लाईव्ह या गोव्याच्या पहिल्या मराठी महाचॅनलचा समावेश होतोय.

या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन गोवन वार्ता लाईव्हचे इनपुट हेड सिद्धेश सावंत आणि सिंधुदुर्ग लाईव्हच्या सिंधुदुर्ग मुख्यालय प्रतिनिधी देवयानी वरसकर यांनी केलं.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!