दहा हजार सरकारी नोकऱ्यांवर 2022 च्या सत्तेचा डाव?

2017 ची पुर्नरावृत्ती टाळण्यासाठी भाजपची खेळी

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : राज्याच्या विधानसभा निवडणुका 2022 मध्ये लागणार आहेत. केवळ एका वर्षांचा कालावधी सरकारसमोर आहे. तत्पूर्वी पालिका निवडणुका होणार आहेत. राज्याची आर्थिक परिस्थिती म्हणावी तशी बरी नाही आणि त्यामुळे विशेष विकास कामे होण्याची शक्यता तशी दूरच. खाण व्यवसाय सुरू होण्याचीही चिन्हे दिसत नाहीत. या परिस्थितीत निवडणुकांना सामोरे कसे जाणार, असा प्रश्न भाजपला सतावतोय.

कुठल्याही परिस्थितीत 2017 ची पुर्नरावृत्ती टाळणे हे पक्षासमोरचे मोठे आव्हान आहे. आता दहा हजार सरकारी नोकऱ्यांच्या भरतीचा फंडा घोषित करून भाजपने विधानसभा निवडणुकीच्या द्यूतावर फासे टाकून डावाला सुरूवात केलीय. विरोधकांचा प्रतिडाव काय असेल हे देखील तेवढेच महत्वाचं ठरले. विशेष म्हणजे 2016 मध्ये नोकर भरती रोखल्याने भाजपला निवडणुकीत बराच फटका बसला. आता नोकर भरतीचे बंद दार उघडून सत्ता पुन्हा काबीज करण्याची ही खेळी भाजपला कितपत तारणार हे पाहावे लागणार आहे.

bjp-flag-1200
bjp-flag-1200

पार्सेकरांचा बळी

राज्यात 2012 मध्ये भाजपची सत्ता आली. मनोहर पर्रीकर मुख्यमंत्री बनले. 2014 मध्ये दिल्लीत भाजपचा झेंडा फडकला. मनोहर पर्रीकर यांना दिल्लीतून बोलावणे आले आणि त्यांची केंद्रीय सरंक्षणमंत्रीपदावर नियुक्ती झाली. राज्याची धुरा लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्याकडे आली. 2014 ते 2017 पर्यंत पार्सेकरांकडे मुख्यमंत्रीपदाची सूत्रे होती. त्यांनी बऱ्यापैकी पदावर जम बसवला होता. ह्या काळात पर्रीकरांच्या वारंवार गोवा वाऱ्या मात्र पार्सेकरांसाठी डोकेदुखी बनू लागल्या होत्या. पर्रीकर दिल्लीत जरी गेले तरी दर आठवड्याला ते गोव्यात येत. इथे सरकारी अधिकाऱ्यांसोबत बैठका घेत. महत्वाचे निर्णय घेत. सहजिकच पार्सेकरांसाठी ते अडचणीचे आणि कमीपणाचे ठरू लागले होते.

पर्रीकरांच्या या कृतीमुळे पार्सेकरांच्या प्रतिमेला बराच धक्का बसत होता. मनोहर पर्रीकर हे पक्षाचे ज्येष्ठ नेते. त्यांच्या कृपार्शिवादामुळेच मुख्यमंत्रीपद मिळाल्यामुळे पार्सेकरांना हे सगळे प्रकार मुकाटपणे सहन करावे लागले होते. त्यात 2016 मध्ये निवडणुकीला एक वर्षांचा कार्यकाळ बाकी राहिलेला असतानाच पार्सेकरांनीही अशीच नोकर भरती करण्याचे निश्चित केले होते. मनोहर पर्रीकरांनी मात्र ह्यात खोडा घातला. आर्थिक परिस्थिती बिकट असल्याचे कारण पुढे करून ही नोकर भरती रोखली. या नोकर भरतीचे समर्थन करण्यासाठीच राज्य कर्मचारी भरती आयोगाचे पिल्लू पुढे करण्यात आले आणि नोकर भरती रोखण्याच्या निर्णयाला एक वेगळा आयाम देण्याचा प्रयत्न झाला. या सगळ्याचे परिणाम म्हणूनच पार्सेकरांचा मांद्रे मतदारसंघातून पराभव झालाच पण भाजपलाही 2017 च्या निवडणुकीत दारूण पराभवाला सामोरे जावे लागले.

नोकऱ्यांच्या संख्येवर मतांची बेगमी

आगामी फेब्रुवारी 2022 मध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. दहा हजार नोकऱ्यांची भरती करण्याची घोषणा सरकारने केलीय. याचा अर्थ एका वर्षांत दहा हजार नोकऱ्या भरण्याची प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. वित्त खात्याकडून यापूर्वीच नोकर भरतीबाबत आक्षेप नोंदवण्यात आलाय. करोनामुळे एकीकडे राज्याची आर्थिक परिस्थिती ढासळली असताना एवढ्या मोठ्या संख्येत नोकर भरती शक्य आहे का, असा सवाल उपस्थित झाला असतानाही सरकार आपला कार्यक्रम पुढे रेटत आहे. नोकऱ्यांच्या नावावर मतांची बेगमी करण्याचा हा डाव भाजपला कितपत तारतो हे पाहावे लागणार आहे.

हेही वाचा – सभागृहात बसून पॉर्न कंटेट स्क्रोल करताना राजकीय नेता कॅमेऱ्यात कैद

राज्य सरकारच्या सुमारे 35 खात्यांनी 11 हजार पदे रिकामी आहेत. पोलिस, आरोग्य, शिक्षण, वन, महसूल, वीज, सार्वजनिक बांधकाम, समाज कल्याण, महिला आणि बाल कल्याण, नियोजन आणि सांख्यिकी, जलस्त्रोत, कला आणि संस्कृती, कृषी, पशुसंवर्धन, कामगार आणि रोजगार, पंचायत अशा सुमारे 16 खात्यांनी ही पदे रिकामी आहेत.

jobs
jobs

सरकारी खाती आणि पदे

वन खाते- 264

शिक्षण – 356

कामगार आणि रोजगार- 260

वीज खाते- 1361

जलस्त्रोत- 349

पोलिस खाते- 2085

सार्वजनिक बांधकाम खाते- 1352

आरोग्य खाते- 2740

महिला आणि बाल कल्याण खाते- 184

कला आणि संस्कृती खाते- 132

पशुसंवर्धन खाते- 156

समाज कल्याण – 184

नियोजन आणि सांख्यिकी- 142

कृषी- 153

पंचायत- 134

महसूल- 397

याही खात्यांनी रिक्त पदे आहेत

पर्यावरण- 57, मच्छीमार- 62, नागरी पुरवठा- 67, बंदर कप्तान- 51, विज्ञान आणि तंत्रज्ञान- 09, खाण खाते- 54, हस्तकला, वस्त्रोद्योग आणि काथ्या उद्योग- 62, नगर नियोजन- 82, पर्यटन- 16, क्रीडा – 53 आणि वाहतूक – 88.

हेही वाचा – 1 फेब्रुवारी ठरणार ‘ब्लॅक डे’

हेही वाचा – नर्स, वॉर्डबॉय पदासाठी गोव्याच्या शेजारील राज्यात मोठी पदभरती

हेही वाचा – कुवेतमधील गोमंतकीयांच्या नोकऱ्या जाणार! वाचा, काय आहे कारण…

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!