‘सरकराला फक्त निवडणुका जिंकायच्यात, त्यांना कोरोनाचं सोयरसुतक नाही’

दुर्लक्ष झाल्यास वेगाने प्रसार; वैद्यकीय अधिकाऱ्यांचा गंभीर इशारा

सिध्देश सावंत | प्रतिनिधी

पणजी : राज्याच्या वेशीपर्यंत पोहोचलेली करोनाची दुसरी लाट आणि मंगळवारी वाढलेला मृतांचा आकडा यांमुळे गोमंतकीय जनतेत पुन्हा एकदा करोना प्रसाराची भीती निर्माण झाली आहे. तब्बल दोन महिन्यांनंतर मंगळवारी चौघांचा करोनामुळे मृत्यू झाला. तसेच नवे ९४ बाधित आढळल्याने राज्यात पुन्हा एकदा खळबळ माजली आहे.

डिसेंबर २०२० पर्यंत संपूर्ण राज्यभर करोना विषाणूचा वेगाने प्रसार होत होता. पण जानेवारी २०२१ पासून बाधित आणि मृतांच्या संख्येत घट होत होती. गोव्यासह इतर राज्यांमध्येही अशीच परिस्थिती होती. पण गेल्या १५ दिवसांपासून शेजारील महाराष्ट्रात करोना विषाणूचा पुन्हा एकदा झपाट्याने प्रसार होत आहे. सद्यस्थितीत महाराष्ट्रात दररोज १५ हजारांपेक्षा अधिक करोनाबाधित सापडत आहेत. ज्या राज्यांतून गोव्यात अधिक पर्यटक दाखल होत आहेत, त्या राज्यांतही करोनाबाधितांत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. तरीही सरकारने बाहेरून येणाऱ्या प्रवाशांवर अद्याप कोणतेही निर्बंध लादलेले नाहीत. त्याचा आगामी काळात गोव्याला मोठा फटका बसण्याची शक्यता वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

हेही वाचा – भयंकर! 24 तासांत 4 कोरोना बळी, 4 पैकी तिघांना फक्त कोरोनाची बाधा

जानेवारीनंतर सलग दोन महिने दिवसाला केवळ २५ ते ३० जण बाधित होत होते. पण गेल्या सहा दिवसांचा आढावा घेतला असता ११ मार्च रोजी ६९, १२ रोजी ८२, १३ रोजी ९३, १४ रोजी ६६, १५ रोजी ८९ आणि १६ मार्च रोजी ९४ अशा ४९३ जणांना करोनाची लागण झाली असून, या कालावधीत नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. ११ ते १५ मार्चपर्यंत दरदिवशी केवळ एकाच रुग्णाचा मृत्यू झाला होता. पण, मंगळवारी अचानक चार जणांचा करोनाने मृत्यू झाला. त्यांतील तिघेजण ५० ते ६० वर्षे वयोगटातील असून, त्यांना इतर आजार नसल्याचेही स्पष्ट झाले आहे. त्यामुळे गोमंतकीयांतील भीतीचा काळोख आणखी दाट झाला आहे.

Corona Negative 800X450

दरम्यान, मंगळवारचा चार मृत्यूंमुळे राज्यातील आतापर्यंतच्या करोनामृतांचा आकडा ८०७ झाला आहे. नवे ९४ बाधित आढळल्याने तसेच ७३ जण करोनामुक्त झाल्याने सक्रिय बाधितांची संख्या ७९२ वर पोहोचली आहे.

आरोग्य खात्याच्या विनंतीकडे कानाडोळा

गोव्याच्या शेजारील महाराष्ट्रात करोनाबाधितांचा आकडा वेगाने वाढत चालल्यानंतर तेथून गोव्यात येणाऱ्या पर्यटकांवर निर्बंध घालण्यासाठी नवी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करण्याची विनंती आरोग्य खात्याने राज्य सरकारला केली होती. पण, यासंदर्भातील फाईलकडे सरकारने कानाडोळा केल्याची माहिती आरोग्य खात्यातील सूत्रांनी दिली.

हेही वाचा – Video | Exclusive | नव्या आरक्षणावरुन कोर्टात जाण्याचा दयेश नाईकांचा इशारा

करोनाबाबत सरकार गंभीर नाही!

राज्यातील भाजप सरकारला कोणत्याही परिस्थितीत पालिका निवडणुका जिंकायच्या आहेत. सरकारला करोना प्रसाराचे काहीही सोयरसूतक नाही. त्यामुळेच सरकार बाधित आणि मृतांचा आकडा वाढत असतानाही करोनास्थिती गांभीर्याने घेत नसल्याचा आरोप विरोधी पक्ष तसेच स्थानिकांकडून सुरू झाला आहे. सरकारने वेळीच दखल न घेतल्यास गोव्यावरही महाराष्ट्राप्रमाणेच बिकट वेळ ओढवू शकते, असेही काही स्थानिकांचे म्हणणे आहे.

modi 800X450

पंतप्रधान आज साधणार मुख्यमंत्र्यांशी संवाद

नवी दिल्ली : देशातील करोना रुग्णसंख्या पुन्हा झपाट्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवार, दि. १७ मार्च रोजी दुपारी १२.३० वाजता सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक बोलावली आहे. महाराष्ट्र, केरळ, कर्नाटक, दिल्ली आणि उत्तर प्रदेशसह अनेक राज्यांमध्ये करोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्त्वाची आहे. करोना रुग्णांची वाढती संख्या पाहता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आधीच संबंधित राज्यांना मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

हेही वाचा – 22 मार्चला निकाल लावू नका, थोडं थांबा, आमोणकर म्हणतात…

हेही वाचा – VIRAL FACT | चांदेल पेडणेत प्रवाशांचा बसच्या टपावरून जीवघेणा प्रवास

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!