कोरोनाबाधित मतदारांमुळे सरकारी कर्मचारी धास्तावले!

नेमकी कशी असणार आहे सुविधा?

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : जिल्हा पंचायत निवडणुकीच्या मतदानादिवशी शेवटच्या एका तासात करोनाबाधितांना मतदान करता येईल, असे राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे; पण बाधितांची मतदान केंद्रांवरील व्यवस्था, कर्मचार्‍यांची सुरक्षा याबाबत आयोगाने अद्याप काहीही स्पष्ट केलेले नाही. किंबहुना त्यासंदर्भात नियमावलीही तयार केलेली नाही. त्यामुळे कर्मचार्‍यांत भीतीचे वातावरण आहे.

तयारीचा पत्ताच नाही!

जिल्हा पंचायतींसाठी शनिवारी मतदान होणार आहे. सायं. ४ ते ५ या वेळेत करोनाबाधितांना मतदान करू दिले जाईल, असे राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे. बाधितांना मतदान केंद्रांवर पीपीई कीट देण्याचा विचार आयोग करत आहे. पण त्यांना मतदान केंद्रापर्यंत कसे आणणार, केंद्रांवर त्यांची व्यवस्था कशी असेल, तेथील सरकारी कर्मचार्‍यांची सुरक्षा कशी घेणार, त्यांना पीपीई कीट देेणार की नाही, याबाबत निर्णय झालेला नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

भीती आणि अस्वस्थता

मतदानासंदर्भात मंगळवारी सरकारी कर्मचार्‍यांना प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी कर्मचार्‍यांनी आयोगासमोर करोनाबाधितांचा प्रश्न उपस्थित केला. त्याबाबत अद्याप काहीही निश्चित झालेले नाही, असे त्यांना सांगण्यात आले. त्यामुळे कर्मचार्‍यांत भीती आणि अस्वस्थता आहे. बहुतांशी मतदान केंद्रे शाळांमध्ये आहेत. सध्या दहावी आणि बारावीचे नियमित वर्ग भरवले जात आहेत. तेथे करोनाबाधित व्यक्ती मतदान करून गेल्यानंतर परिसराचे तत्काळ निर्जंतुकीकरण होणे गरजेचे आहे.

अन्यथा त्याचा फटका विद्यार्थी आणि शिक्षकांना बसू शकतो. निवडणूक आयोग आणि सरकारने सरकारी कर्मचारी व विद्यार्थी, शिक्षकांच्या आरोग्याचा गांभीर्याने विचार करून तत्काळ स्वतंत्र नियमावली जारी करावी. सुरक्षात्मक उपाययोजना आखूनच करोनाबाधितांना मतदानासाठी आणावे, अशी मागणी होत आहे.

आयोगाचा निर्णय घाईगडबडीत : गोवा फॉरवर्ड

शेवटच्या एका तासात करोनाबाधितांना मतदानासाठी आणण्याचा निर्णय राज्य निवडणूक आयोगाने घाईगडबडीत घेतला आहे. यासंदर्भात अद्याप स्वतंत्र नियमावलीही जारी करण्यात आलेली नाही. यातून राज्य सरकार सरकारी कर्मचार्‍यांच्या आयुष्याशी खेळत असल्याचेच स्पष्ट होते, अशी टीका गोवा फॉरवर्डचे नेते जॉन नाझारेथ यांनी केली आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!