सेल्फ हेल्प ग्रुपवर सरकारचे नियंत्रण…

सदस्यांना महिन्याला १ हजार रुपये ठेवीची मर्यादा

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : सेल्फ हेल्प ग्रुपच्या माध्यमातून लोकांचे पैसे घेऊन ते बुडवण्याचे प्रकार घडतात. मोठी रक्कम स्वीकारली जात असल्यामुळे आर्थिक गैरव्यवहारही वाढले आहेत. त्यामुळे राज्यातील सेल्फ हेल्प गटांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारने नियम मार्गी लावले आहेत. या नियमांप्रमाणे सदस्यांकडून महिन्याला फक्त एक हजार रुपयांची ठेव स्वीकारता येईल.
हेही वाचाःनगराध्यक्ष – उपनगराध्यक्ष फेरबदलाचा जोशुआंना अधिकार : तानावडे…

सेल्फ हेल्प गटांवर सरकारचे राहणार नियंत्रण

वित्त खात्याचे अवर सचिव प्रणव भट यांनी हे नियम अधिसूचित केले असून यापुढे सेल्फ हेल्प गटांवर सरकारचे नियंत्रण राहणार आहे. विशेष म्हणजे सरकारने लागू केलेल्या नियमांप्रमाणे सेल्फ हेल्प ग्रुपच्या मालमत्तेची, त्यांच्याकडील निधीची माहिती जाणून घेण्याचे अधिकारही सरकारला प्राप्त झाले आहेत.   
हेही वाचाःगोवा बाल हक्क संरक्षण आयोगाचा कारभार मंदावला…  

राज्यात एक हजारहून अधिक सेल्फ हेल्प गट

केंद्र सरकारने २०१९ मध्ये यासाठी कायदा लागू केला होता. त्या कायद्याखाली राज्यांनी आपले नियम तयार करायचे होते. गोव्याने तसे नियम तयार करून सेल्फ हेल्प गट सरकारच्या थेट देखरेखीखाली आणले आहेत. अशा गटांच्या वेगवेगळ्या ठेव योजनांवर सरकार लक्ष ठेवू शकते. सध्या गटांचे सदस्य महिन्याला कितीही रक्कम जमा करू शकतात; पण आर्थिक गैरव्यवहारांचा धोका ओळखून तसेच गुंतवणूकदार सदस्यांचे पैसे बुडू नयेत म्हणून सदस्यांच्या गुंतवणुकीवरच मर्यादा घातली आहे. राज्यात एक हजारहून अधिक सेल्फ हेल्प गट आहेत. यात महिलांच्या गटांची संख्या जास्त आहे. या गटांकडे ५० हजारांहून अधिक सदस्य आहेत. महिला आणि बाल कल्याण खात्याजवळच लाभांसाठी ७००हून अधिक सेल्फ हेल्प गटांची नोंद आहे. दरम्यान, नियुक्त एजन्सी कुठल्याही गैरव्यवहारांविषयी आलेल्या तक्रारींची चौकशी पोलिसांमार्फत करू शकते. पोलिसांचा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई होईल. यात मालमत्ता जप्त करण्याचेही अधिकार सरकारला आहेत. गैरव्यवहार झाल्यानंतर एखादी व्यक्ती फरार होण्याची शक्यता असल्यास सरकारी एजन्सी त्याविषयी न्यायालयाला अहवाल सादर करून पुढील कारवाई करू शकते.
हेही वाचाःआता करू शकणार नाही ‘गुगल ट्रान्सलेशन’?

गैरव्यवहार होण्याचा धोका अधिक

माध्यान्ह आहार योजनेचे कंत्राट, घरगुती पदार्थ तयार करून विकणे, हस्तकला, शिवणकाम अशा वेगवेगळ्या कामांमध्ये सेल्फ हेल्प गट सक्रिय आहेत. जास्त व्याज देण्याच्या हमीवर अनेक संस्था गावोगावी ठेवी घेतात. सेल्फ हेल्प ग्रुपही या कामात सक्रिय आहेत. त्यामुळे आर्थिक गैरव्यवहार होण्याचा धोकाही जास्त आहे.
हेही वाचाःही निव्वळ लोकशाहीची हत्या!

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!