राज्यपालांनी प्रमोद सावंत यांनाही असंच पत्र लिहिलंय का?

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे गोव्याच्या राज्यपालपदाचाही पदभार आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना त्यांनी लिहिलेल्या पत्रावरून वाद निर्माण झालाय.

Goan Varta Live | प्रतिनिधी

मुंबई : महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी लिहिलेल्या पत्रावरून निर्माण झालेला वाद शमण्याचं नाव घेत नाही. उद्धव ठाकरेंना कोश्यारींनी पाठवलेल्या पत्रावरून महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी राज्यपालांच सवाल केला आहे. कोश्यारी यांच्याकडे गोव्याच्या राज्यपाल पदाचा पदभार असून, गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनाही असंच पत्र लिहिलं आहे का?, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

हिंदुत्ववादी असूनही गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रातील देव-देवतांना टाळेबंदीत ठेवण्यात आले आहे. तुम्ही अचानक धर्मनिरपेक्ष बनला आहात का? असा सवाल राज्यपाल कोश्यारींनी ठाकरे यांना केला. त्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनीही सडेतोड उत्तर दिलं. ‘तुम्हाला घटनेतील धर्मनिरपेक्षता मान्य नाही का? माझ्या हिंदुत्वाला आपल्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही, असं ठाकरे म्हणाले होते.

राज्यपालांनी लिहिलेल्या पत्रावरून थोरात म्हणाले, राज्यपाल कोश्यारी यांनी महाराष्ट्रातील मंदिरं उघडण्यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून, दारुची दुकाने उघडली, तर मंदिरं बंद का? अशी विचारणी केली आहे. राज्यपालांनी राज्यघटनेच्या मूलभूत तत्वांना हात घातला. हे योग्य नाही.

कोश्यारी यांच्याकडे गोवा राज्याचाही प्रभार आहे. त्या ठिकाणीही दारूची दुकाने उघडी आहेत, तर मंदिरं बंद आहेत. कोश्यारींनी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांनाही असच पत्र लिहिलं आहे का? असा सवाल थोरात यांनी राज्यपाल कोश्यारी यांना केलाय.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!