सरकार 200 ते 250 पोलिस कर्मचाऱ्यांची भरती करणार

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंतांची माहिती; कोलवाळे पोलिस स्टेशनचं केलं उद्घाटन

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजीः राज्यातील गुन्हेगारीचं प्रमाण कमी करण्यात पोलिस विभागाची मोठी भूमिका आहे. आम्ही राज्यातील गुन्हेगारांवर कठोर कारवाई सुरू करणार आहोत, असं प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंतांनी कोलवाळे पोलिस स्टेशनच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी केलं.

हेही वाचाः देशात 1 लाख कोरोना योद्धा निर्माण करणार

कोविड महामारीत पोलिसांनी बजावलेली भूमिका कौतुकास्पद

उद्घाटन समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी कोविड-19 च्या उद्रेका दरम्यान पोलिसांनी बाजावलेल्या भूमिकेचं कौतुक केलं. कोविड महामारीच्या गंभीर परिस्थितीचं व्यवस्थापन करण्यासाठी सरकारने खूप प्रयत्न केलेत. या गंभीर काळात गृह खात्याने गोव्याच्या भल्यासाठी मोठी भूमिका बजावली आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले.

सर्व पदे सहा महिन्यांत भरणार

सरकारने यापूर्वीच पोलीस खात्यातील ९४० रिक्त जागांची जाहिरात दिलेली असून लवकरच २००-२५० हून अधिक रिक्त जागांची जाहिरात केली जाईल आणि ही सर्व पदे सहा महिन्यांत भरली जातील याची खात्री आम्ही देतो. गोवा सरकार गोव्याच्या विकासासाठी प्रत्येक क्षेत्रात एक नवीन क्रांती घडवून आणेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिला.

हेही वाचाः रोनाल्डोची ‘फ्री किक’…फेव्हिकॉलचा ‘मजबूत जोड’ !

गोवा क्रांती दिनी 2 पोलिस स्टेशन्सचं उद्घाटन

गोवा क्रांती दिनाच्या या शुभ दिनी गोवा सरकारने राज्यातील दोन नवीन पोलिस स्टेशनच्या इमारतींचं उद्घाटन केलं आहे. तसंच मडगाव येथे असलेल्या मायणा कुडतरी पोलिस स्टेशनचं आज कुडतरीत स्थलांतर करण्यात आलं आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. राज्यात आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी सरकारने सर्व प्रयत्न केले आहेत. शिक्षण क्षेत्रात सरकारने आजपासून कोडिंग आणि रोबोटिक्स सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला असल्याचंही यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

मुख्यमंत्र्यांचे आभार

या दोन वर्षांत मुख्यमंत्र्यांनी विविध पायाभूत सुविधांचा विकास हाती घेतला आहे आणि कोलवाळे येथे नवीन पोलिस स्टेशनची इमारत बांधण्याची आमची इच्छा पूर्ण केल्याबद्दल मी मुख्यमंत्र्यांचे आभार मानतो, असं आमदार निळकंठ हळर्णकर आपल्या भाषणात म्हणाले.

हेही वाचाः गोव्याच्या अस्मितेला हानी पोहोचवणारे सगळे प्रकल्प रद्द करणार

मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम

आमदार निळकंठ हळर्णकर, डीजीपी मुकेश कुमार, उत्तर गोवा जिल्हाधिकारी अजित रॉय, आयजीपी परमादित्य, उत्तर गोवा पोलिस अधिक्षक शोभित सक्सेना, आयजीपी राजेश कुमार, जिल्हा पंचायत सदस्य दिक्षा कांदोळर, उप-सरपंच फडते या कार्यक्रमाला उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी उत्तर गोवा पोलिस अधिक्षक शोभित सक्सेना आणि आयपीएस यांनी उपस्थितांचे आभार मानले.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!