सरकारी विद्यालयांचा कारभार रोजंदारी शिक्षकांवर

७८ माध्यमिक, ९ उच्च माध्यमिक विद्यालयांमध्ये ५०० जागा रिक्त

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी: राज्य सरकारच्या ९ उच्च माध्यमिक विद्यालयांमध्ये ९५ टक्के शिक्षक हे तासिका तत्त्वावर (एलबीटी) किंवा कंत्राटी पद्धतीवर शिकवत आहेत. ७८ सरकारी हायस्कूलमध्ये ८० टक्क्यांच्या आसपास शिक्षक हे तासिका तत्त्वावर व कंत्राटी पद्धतीवर आहेत. गेल्या दहाहून अधिक वर्षांपासून सरकारच्या माध्यमिक ते उच्च माध्यमिक विद्यालयांची ही स्थिती आहे. विशेष म्हणजे एलबीटी आणि कंत्राटावर शिकवणाऱ्या कितीतरी शिक्षकांना महिन्याचे मानधन हे शाळेच्या सुरक्षा रक्षकापेक्षा कमी आहे.

या सर्व सरकारी शाळांमध्ये ५०० पेक्षा जास्त शिक्षकांची पदे रिकामी

राज्यातील सुमारे ७८ सरकारी माध्यमिक विद्यालये आणि ९ सरकारी उच्च माध्यमिक विद्यालये सध्या तासिका तत्त्वावरील शिक्षक, कंत्राटी शिक्षक आणि एका शाळेचा पगार घेऊन इतर दोन-तीन शाळांमध्ये ‘वर्किंग अरेंजमेंट’वर शिकवणाऱ्या शिक्षकांमुळे सुरू आहेत. या सर्व सरकारी शाळांमध्ये ५०० पेक्षा जास्त शिक्षकांची पदे रिकामी आहेत, पण ती भरण्याचा कुठलाच प्रस्ताव सरकारसमोर नाही. बीएड धारकांसाठी असलेली अगदीच १५ पदांची शेवटची भरती २०१० मध्ये झाली होती. तेव्हापासून आतापर्यंत सुमारे ५ हजार बीएडधारक उत्तीर्ण झाले; पण त्यांना नोकरी मिळालेली नाही.

सरकारी शाळांचा कारभार हा ‘रोजंदारीवर’ असलेल्या शिक्षकांमुळे चालतो

राज्याची भावी पिढी तयार करणाऱ्या सर्व सरकारी शाळा सध्या १५० रुपये प्रति तासिका तत्त्वावरील व्याख्यात्यांमुळेच सुरू आहेत. एलबीटी, कंत्राटी आणि एका सरकारी शाळेत नियुक्त केलेला एखादा शिक्षक अन्य एक-दोन शाळांमध्ये ‘वर्किंग अरेंजमेंटवर’ शिकवतो. अशा पद्धतीने सरकारी शाळांचा कारभार हा ‘रोजंदारीवर’ असलेल्या शिक्षकांमुळे चालतो.

वर्षाला गोव्यातील सुमारे ४५० ते ५०० बीएडधारक उमेदवार उत्तीर्ण

राज्यातील पाच बीएड महाविद्यालये आणि शेजारील राज्यांमधील महाविद्यालयांमध्ये वर्षाला गोव्यातील सुमारे ४५० ते ५०० बीएडधारक उमेदवार उत्तीर्ण होतात. बीएडधारकांनी दिलेल्या माहितीप्रमाणे आजच्या घडीला राज्यात ७ ते ८ हजार बीएडधारक आहेत, ज्यांना नोकरीची प्रतीक्षा आहे.

गेल्या दहा वर्षांत दोनवेळा प्राथमिक स्तरावर ५२१ शिक्षकांची भरती

प्राथमिक स्तरावर स्थिती काहीशी चांगली आहे. गेल्या दहा वर्षांत दोनवेळा ५२१ शिक्षकांची भरती प्राथमिक स्तरावर झाली आहे. यात २०१३ मध्ये जाहिरात दिलेल्या ३२५ पदांची भरती २०१५-१६ मध्ये झाली आणि २०१८ मध्ये जाहिरात दिलेल्या १८२ शिक्षकांची भरती २०१९-२० मध्ये झाली.

उच्च माध्यमिक विद्यालयांत पूर्णवेळ, नियमित शिक्षक नाही!

साखळी येथील सरकारी उच्च माध्यमिक विद्यालयात १३ एलबीटी, ५ कंत्राटी पद्धतीवर शिक्षक आहेत. वाळपई उच्च माध्यमिक विद्यालयात १० एलबीटी आणि २ कंत्राटी, कांपालवरील टी. बी. कुन्हा सरकारी उच्च माध्यमिक विद्यालयात १२ एलबीटी शिक्षक आहेत. पेडणे उच्च माध्यमिक विद्यालयात २५ एलबीटी आणि १ कंत्राटी, सांगे उच्च माध्यमिक विद्यालयात १६ एलबीटी, माशेल उच्च माध्यमिक विद्यालयात २५ एलबीटी, मडगाव उच्च माध्यमिक विद्यालयात १० एलबीटी, बायणा उच्च माध्यमिक विद्यालयात २२ एलबीटी आणि २ कंत्राटी, काणकोण उच्च माध्यमिक विद्यालयात १३ एलबीटी शिक्षक आहेत. एकाही सरकारी उच्च माध्यमिक विद्यालयात पूर्णवेळ किंवा नियमित शिक्षक नाही, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.

हा व्हिडिओ पहाः Honesty | चांगली बातमी | कदंब कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणाचं कौतुक

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!