पूरग्रस्तांना सरकारकडून गणेश चतुर्थीची भेट!

डिचोली तालुक्यातील ३०१ जणांना सुमारे १.९ कोटी मंजूर

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी: राज्यात २२ आणि २३ जुलै २०२१ रोजी आलेल्या पुरात संसार उद्ध्वस्त झालेल्या डिचोली, सत्तरीसह इतर तालुक्यांतील पूरग्रस्तांना सरकारने आपत्कालीन व्यवस्थापन निधीअंतर्गत मदत मंजूर केली आहे. डिचोली तालुक्यातील ३०१ जणांना सुमारे १.९ कोटी रुपयांची नुकसानभरपाई देण्यात आली आहे. उत्तर गोव्याचे जिल्हाधिकारी अजित रॉय यांनी यासंदर्भातील आदेश जारी केला आहे.

राज्य आपत्कालीन व्यवस्थापन निधीअंतर्गत पूरग्रस्तांना अर्थसाहाय्य मंजूर

महसूल खात्याने राज्य आपत्कालीन व्यवस्थापन निधीअंतर्गत पूरग्रस्तांना अर्थसाहाय्य मंजूर केलं आहे. डिचोली, सत्तरीसह इतर तालुक्यांतील ३०१ पूरग्रस्तांना सुमारे १.९ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, अर्थसाहाय्य निधी १० ते ५० हजार रुपयांपर्यंत असल्याचं जिल्हाधिकारी अजित रॉय यांनी आदेशात म्हटलं आहे. पूरग्रस्तांना मंजूर करण्यात आलेला निधी त्यांच्या बँक खात्यांत जमा करण्यात येईल. शिवाय त्यांना सरकारमार्फत प्रमाणपत्रही देण्यात येईल, असंही आदेशात नमूद करण्यात आलं आहे.

महाराष्ट्रातील तिळारीसह गोव्यातील सहाही धरणे ‘ओव्हरफ्लो’ झाली

मान्सूनच्या पावसाने ११ जुलैपासून पुढील पंधरा दिवस गोव्यासह शेजारील महाराष्ट्र, कर्नाटकातही धुमाकूळ घातला. २२ आणि २३ जुलै या दोन दिवशी पावसाचा जोर वाढला. त्यामुळे गोव्याला गेल्या ३९ वर्षांतील सर्वांत मोठा पूर पहावा लागला. मुसळधार पावसामुळे महाराष्ट्रातील तिळारीसह गोव्यातील सहाही धरणे ‘ओव्हरफ्लो’ झाली. तिळारी ‘ओव्हरफ्लो’ झाल्याने उत्तर गोव्यातील पेडणे, बार्देश आणि डिचोली तालुक्यातील शापोरा, वाळवंटी आदी नद्यांना पूर येऊन या तिन्ही तालुक्यांतील अनेक घरं पाण्यात बुडाली.

नद्यांना पूर येऊन भीषण परिस्थिती

याशिवाय कर्नाटकातील मुसळधार पाऊस आणि धरणांतील पाण्याच्या विसर्गामुळे खांडेपार, साळावली, म्हादई, दूधसागर, रगाडा आदी नद्यांना पूर येऊन या तालुक्यांतही भीषण परिस्थिती निर्माण झाली. या दोन दिवसांत राज्यातील आठ तालुक्यांना पुराने घेरल्याने तेथील सुमारे पाच हजार घरांची मोठ्या प्रमाणात हानी झाली. अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. पुराचे पाणी घुसल्यामुळे शेती, बागायतींची हानी झाली. सरकारी मालमत्तेचे नुकसान झालं. त्यानंतर राज्य सरकारने तत्काळ पुरामुळे झालेल्या नुकसानीचा पंचनामा करण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेतले. त्यात स्थानिकांचं सुमारे पाचशे कोटी रुपयांचं नुकसान झाल्याचं समोर आलं होतं.

लवकरात लवकर आर्थिक मदत देण्याची मुख्यमंत्र्यांकडून हमी

दरम्यान, पूरग्रस्तांना आर्थिक आणि मानसिक आधार देण्यासाठी पुराचा फटका बसलेल्या कुटुंबांना संबंधित पंचायतींकडून पंचायत निधीतून तत्काळ दहा हजार रुपयांची मदत करण्याची तरतूद पंचायत कायद्यात आहे. त्यानुसार गटविकास अधिकाऱ्यांनी (बीडीओ) संबंधित पंचायतींना यासंदर्भात सूचना द्याव्या, असे निर्देश पंचायत खात्याने जारी केले आहेत. तसंच पुरात ज्यांच्या घरांची हानी झालेली आहे, त्यांना लवकरात लवकर आर्थिक मदत देण्याची हमी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली होती.

अर्थसाहाय्यामुळे पूरग्रस्तांत समाधान

– पुरामुळे संसार उद्धवस्त झालेले अनेकजण सरकारी मदतीच्या प्रतीक्षेत होते. याआधी सरकारने १५ दिवसांत अर्थसाहाय्य देण्याची घोषणा केली होती. पण ती प्रत्यक्षात न उतरल्याने पूरग्रस्तांत निराशा पसरली होती. गणेश चतुर्थीआधी सरकारने अर्थसाहाय्य मंजूर केल्याने पूरग्रस्तांमध्ये समाधान पसरलं आहे.
– पुरामुळे ज्यांची घरे पूर्णपणे कोलमडली आहेत अशांना नवी घरं बांधून देण्यासंदर्भात आदेशात कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. यासंदर्भात जिल्हाधिकारी अजित रॉय यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.

हा व्हिडिओ पहाः NIPAH Virus | कोरोनानंतर आता आणखी एका व्हायरसचा धोका!

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!