गोवा सरकारकडून सरकारी नोकरीसाठी जाहिराती

तब्बल साडेसातशेहून अधिक पदांसाठी भरती

सचिन खुटवळकर | प्रतिनिधी

पणजी : सरकारी नोकरीची प्रतीक्षा करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. वर्षभरात 10 हजार सरकारी नोकर्‍या देण्याची घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांनी केली होती. या घोषणेच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली आहे.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी 19 नोव्हेंबरला आपले सरकार येत्या वर्षभरात तब्बल दहा हजार सरकारी नोकर्‍या देईल, असे जाहीर केले होते. नोकर भरती आयोगाला बायपास करून थेट खात्यांतर्गत भरती करण्याचा निर्णय मंत्रिमंडळानं घेतला आणि जानेवारीतल्या विधानसभा अधिवेशनात त्यावर मोहोरही उमटवली. त्यामुळे सरकारने फेब्रुवारीच्या दुसर्‍या आठवड्यात दोन जाहिराती प्रसिद्ध केल्या. गोवा ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या माध्यमातून तब्बल साडेसातशे पदे कंत्राटी तत्त्वावर भरली जाणार आहेत. सुरक्षा रक्षक, अटेंडंट, मल्टिटास्किंग स्टाफ, पर्सनल असिस्टंट तसेच ज्युनियर ऑफिस असिस्टंट पदासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.

300 पुरुष सुरक्षा रक्षक

पुरुष सुरक्षा रक्षकांची 300 पदं भरली जाणार असून यासाठी किमान आठवी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे, तर 18 ते 35 अशी वयोमर्यादा आहे. पदासाठी निश्चित केलेली शारीरिक क्षमता असणारे उमेदवारच पात्र ठरू शकतात.

200 अटेंडंटची पदे

अटेंडंटची 200 पदं भरली जाणार असून यासाठी किमान सहावी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे, तर 18 ते 45 अशी वयोमर्यादा आहे. पदासाठी निश्चित केलेली कौशल्य चाचणी उत्तीर्ण होणारे उमेदवारच पात्र ठरू शकतात.

100 मल्टीटास्किंग स्टाफ

मल्टीटास्किंग स्टाफची 100 पदं भरली जाणार असून यासाठी किमान दहावी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे, तर 18 ते 45 अशी वयोमर्यादा आहे. ऑफिसबॉय कम वाहनचालक या पदासाठी ही भरती असल्यानं निश्चित केलेली कौशल्य चाचणी उत्तीर्ण होणारे तसंच वाहन चालविण्याचा वैध परवाना असणारे उमेदवारच पात्र ठरू शकतात.

100 ज्युनियर ऑफिस असिस्टंट

ज्युनियर ऑफिस असिस्टंटची 100 पदं भरली जाणार असून यासाठी किमान बारावी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे, तर 18 ते 45 अशी वयोमर्यादा आहे. क्लर्क कम डाटा एंट्री ऑपरेटर पदासाठी भरती असल्यानं त्यासंबंधीचा सहा महिन्यांचा कॉम्प्युटर कोर्स केलेले उमेदवार पात्र ठरू शकतात.

50 पर्सनल असिस्टंट

पर्सनल असिस्टंटची 50 पदं भरली जाणार असून यासाठी कोणत्याही शाखेतील पदवी असणं गरजेचं आहे, तर 18 ते 45 अशी वयोमर्यादा आहे. स्टेनो सेक्रेटरी पदासाठी भरती असल्यानं शॉर्टहँडमध्ये निपूण उमेदवारांना प्राधान्य दिलं जाईल. या पदांसाठी उमेदवारी अर्ज गोवा ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या पर्वरीतील कार्यालयात तसेच मडगाव आणि साखळीतील रवींद्र भवनाच्या रिसेप्शन सेंटरमध्ये उपलब्ध आहेत.

प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे 5 पदांसाठी भरती

गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळानं नियमित तत्त्वावर कनिष्ठ पर्यावरण अभियंत्यांची पाच पदं भरण्यात येणार आहेत. यातील 4 पदं खुल्या गटातील उमेदवारांसाठी, तर एक पद दिव्यांग व्यक्तीसाठी राखीव आहे. कनिष्ठ कायदा अधिकारी आणि मल्टिटास्किंग कर्मचार्‍याचं प्रत्येकी एक पद भरण्यात येणार असून ती खुल्या गटातील उमेदवारांसाठी आहेत. या संदर्भात गोवा राज्य प्रदूषण मंडळाच्या तसेच गोवा सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर जाहिरात उपलब्ध आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!