१९ सप्टेंबरपासून सरकार तुमच्या दारी; मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंतांची घोषणा

निवासी/उत्पन्न दाखला, पाणी/वीज जोडणी, रेशन कार्ड, निवडणूक ओळखपत्र, गृहआधार, किसान कार्ड, डीएसएसवाय, गृह उद्योग स्टार्टअप अशा गोष्टींसाठी एकाच जागी प्रशासन

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी: जनतेला आवश्यक सेवा सुविधा देण्यासाठी तसेच प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी सरकारने येत्या रविवारपासून राज्यभरात ‘सरकार तुमच्या दारी’ हा उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतला आहे. या उपक्रमाअंतर्गत विविध सरकारी खाती, महामंडळे तसेच बँकेचे अधिकारी लोकांपर्यंत जाऊन त्यांचे प्रश्न जागेवरच सोडवणार आहेत.

थिवी-कोलवाळच्या श्रीराम विद्या मंदिरातून मोहीम

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी शुक्रवारी या उपक्रमाची घोषणा केली. थिवी मतदारसंघातील श्रीराम विद्या मंदिर, कोलवाळ येथून या उपक्रमास सुरुवात होईल. नागरिकांनी सकाळी नावनोंदणी करून आपल्याला आवश्यक त्या खात्याच्या अधिकार्‍यांना भेटून त्यांच्याकडून कागदपत्रे मिळवावीत. सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत सरकारी खाती, महामंडळे तसेच बँकेचे अधिकारी नागरिकांसाठी उपलब्ध असतील, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी दिली.

प्रलंबित प्रशासकीय कामेही या उपक्रमाअंतर्गत करणार पूर्ण

नागरिकांना आवश्यक ती कागदपत्रे देण्याबरोबरच सरपंच, पंच तसेच इतर लोकप्रतिनिधींची प्रलंबित प्रशासकीय कामेही या उपक्रमाअंतर्गत पूर्ण केली जाणार आहेत. याशिवाय विविध भागांत ‘आत्मनिर्भर भारत-स्वयंपूर्ण गोवा’ मोहिमेतील प्रकल्प पुढे नेत असलेल्या स्वयंपूर्ण मित्र, अधिकार्‍यांच्या बैठका घेऊन त्यांच्या कामांनाही गती देण्यात येणार आहे. उपक्रमाअंतर्गत विविध तालुक्यांत आरोग्यविषयक शिबिरे आयोजित केली जातील. त्यात तज्ज्ञ डॉक्टरांचा सहभाग असणार आहे, असे त्यांनी सांगितले. या उपक्रमातून नागरिकांना निवासी दाखला, उत्पन्न दाखला, म्युटेशन, पार्टिशन, पाणी-वीज जोडणी, रेशन कार्ड, निवडणूक ओळखपत्र, गृहआधार, किसान कार्ड, डीडीएसएसवाय, शौचालय, कृषी, गृह उद्योग, ईडीसी, स्टार्टअप, बँक अशा अनेक गोष्टींसाठी एकाच ठिकाणी प्रशासन उपलब्ध करण्यात येणार आहे. 

विविध कारणांमुळे नागरिकांना आवश्यक ती कागदपत्रे तसंच सुविधा वेळेवर मिळत नाहीत. त्यासाठी त्यांना सरकारी खात्यांचे उंबरठे झिजवावे लागतात. त्यामुळेच हा उपक्रम सुरू करून संपूर्ण प्रशासनच जनतेच्या दारी नेण्याचा आणि जागेवरच त्यांची प्रलंबित कामे करून देण्याचा निर्णय सरकारने घेतला, असं मुख्यमंत्री म्हणाले.

गोमंतकीय जनतेला स्वयंपूर्ण बनविण्याचा सरकारचा निर्धार

दरम्यान, गोवा मुक्तीच्या हीरकमहोत्सवाचं औचित्य साधून गोमंतकीय जनतेला स्वयंपूर्ण बनविण्याचा निर्धार सरकारने केला आहे. त्या अनुषंगाने सर्वच भागांत विविध प्रकारची कामंही सुरू करण्यात आली आहेत. ‘सरकार तुमच्या दारी’ हा उपक्रमही त्याचसाठी सुरू करण्यात आला आहे. बर्‍याचदा ग्रामीण भागातील जनतेला सरकारी कामे पूर्ण करून घेण्यासाठी संघर्ष करावा लागतो. त्यात त्यांचे श्रम, पैसा वाया जात असतो. शिवाय आवश्यक कागदपत्रे वेळेवर न मिळाल्याने सरकारी सुविधांपासूनही वंचित राहावे लागते. पण या उपक्रमामुळे नागरिकांच्या सर्व समस्या दूर होणार आहेत. त्यामुळे सर्वांनीच या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असं आवाहनही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी केलं.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!