साळ येथे प्रशासन शेतकऱ्यांच्या दारी; कृषीमंत्र्यांनी दिली साळ गावाला भेट

पूरग्रस्त शेतकरी नुकसान भरपाई, समस्या आणि पूरनियंत्रण योजनेसाठी बैठक संपन्न

विशांत वझे | प्रतिनिधी

डिचोलीः साळ येथे सतत तीन वर्षं येणारा पूर, त्यामुळे शेतकऱ्यांचं होणारं नुकसान तसंच स्थानिकांना होणारा त्रास, शेतकऱ्यांच्या समस्या आणि साळमध्ये पूर न येण्यासाठी योजना या आणि अशा विषयांवर एका बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीला कृषीमंत्री बाबू कवळेकरांची उपस्थिती होती.

हेही वाचाः मुख्यमंत्र्यांच्या नावे फेक फेसबुक अकाऊंट करणाऱ्या संशयितास अटक

शेतकऱ्यांनी सामुदायिक शेतीवर भर द्यावा

यावेळी बोलताना कृषीमंत्री म्हणाले, गेल्या वर्षीची बाकी नुकसान भरपाई आणि यावर्षीची, अशी सर्व कागदपत्रे पूर्ण करून मिळाली, तर ऑगस्ट महिन्यात नुकसान भरपाई देण्यात येईल. तसंच आठवड्यात एक दिवस प्रत्येक पंचायतीत विभागीय कृषी अधिकारी उपस्थित राहून शेतकऱ्यांचे फॉर्म, दाखले, कृषी कार्ड आधी देण्याबद्दल योग्य ती कागदपत्रे भरण्याची सोय असेल. कृषी नुकसानही शेतकरी आधार निधीतून देण्यात येत असतं. त्यात वाळवी आणि कृमी लागलेल्या काजू झाडांचा या वर्षापासून समावेश केला जाईल. शेतकरी आधार निधीतून जास्तीत जास्त नुकसान भरपाईत एक लाखापर्यंत रक्कम देण्यात येत होती, जी आता एक लाख साठ हजार एवढी केली आहे. पूर्वी भात पिकासाठी हेक्टर २५ हजार रुपये नुकसान भरपाई देण्यात येत होती, जी आता वाढवून ४० हजार करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी सामुदायिक शेतीवर भर द्यावा. त्याला ९० टक्के अनुदान असून शेतकऱ्यांना फक्त १० टक्के रक्कम भरावी लागणार आहे. तसंच एकच जमीन नसेल, तर क्लब करून येथे शेती पिकवावी, त्यासाठी सुद्धा ९० टक्के अनुदान मिळणार आहे. किमान एक एकर जमीन असणं गरजेचं आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे कृषी क्षेत्र वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत. शेतकऱ्यांनी कृषी क्षेत्र विकसित करावं, असं आवाहन कवळेकरांनी केलं.

हेही वाचाः दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर कळणे खाणीवर बंदी

शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणार

यावेळी सभापती राजेश पाटणेकर म्हणाले, साळाचं पूरस्थितीत होणारं नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विचार करून ते सोडवण्यासाठी मी प्रयत्न करत राहणार आहे. आगामी वर्षात पूरस्थिती न येण्यासाठी आणि त्यावर योजनाबद्ध आखणीसाठी सरकार प्रयत्न करणार आहे. साळ गावाला भेडसावणारी समस्या कायमची निपटून टाकण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे, असं पाटणेकर म्हणाले.

हेही वाचाः मगोप नेते डॉ. केतन भाटिकरांवर हल्ला

दरदिवशी पंचायत कार्यालयात तिळारी धरणातील जलसाठ्याची माहिती पुरवणार

जलस्रोत खात्याचे मुख्य अभियंता प्रमोद बदामी म्हणाले, यापुढे प्रत्येक दिवशी पंचायत कार्यालयात तिळारी धरणातील जलसाठा आणि इतर माहिती पुरवण्यात येणार असून पूराचं पाणी गावात न येण्यासाठी नदीकाठी संरक्षक भिंत बांधणं, ओहोळाची दुरुस्ती करणं आणि पूरस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी ज्या योजना अंमलात आणणं गरजेचं आहे, त्यांची कार्यवाही करणार. तसंच मांडवेश्वर पाणी उपसा केंद्रावरील नाम फलकात बदल करून हे शेतकऱ्यांसाठी पाणी अशी तरतूद करणार असं ते म्हणालेत.

हेही वाचाः पंतप्रधान मोदींनी लाँच केले e-RUPI

शेतकऱ्यांच्या शेती सुरक्षेसाठी  सोयीनुसार भिंत बांधणार

कृषी संचालक नेव्हिल अल्फान्सो यांनी सांगितलं, शेतकऱ्यांच्या समस्या आणि नुकसान भरपाई देण्याबाबत योग्य ती कागदपत्रांची जोडणी करणार. तसंच शेतकऱ्यांच्या शेती सुरक्षेसाठी  सोयीनुसार भिंत बांधणं तसंच जाळीचं कुंपण उभं करणार, ज्यातून शेतकऱ्यांचं नुकसान होणार नाही. याकडे लक्ष देऊन कृषी क्षेत्र वाढवण्याचे प्रयत्न करणार.

हेही वाचाः बांद्यात होऊ शकतं, मग दोडामार्गात का नाही ?

यावेळी मामलेदार प्रवीणजय पंडित तसंच विभागीय कृषि अधिकारी नीलिमा गवस, कार्यकारी अभियंता के पी नाईक यांनी या चर्चेत सहभाग नोंदवला. या बैठकीला गोव्याचे उपमुख्यमंत्री आणि कृषिमंत्री बाबू कवळेकर, गोव्याचे सभापती राजेश पाटणेकर याशिवाय कृषी संचालक नेव्हिल अल्फान्सो, जलस्रोत खात्याचे मुख्य अभियंता प्रमोद बदामी, कृषी अधिकारी सत्यवान देसाई (पणजी) सहाय्यक संचालक प्रसन्नकुमार (अभियंता करासवाडा), जलस्रोत खात्याचे कार्यकारी अभियंता के पी नाईक, डिचोलीचे मामलेदार प्रवीणजय पंडित, उपजिल्हा अधिकारी दीपक वायंगणकर, डिचोलीच्या विभागीय कृषी अधिकारी नीलिमा गवस, डिचोली मतदारसंघाचे सहाय्यक कृषी अधिकारी दीपक गडेकर, गटविकास अधिकारी डिचोलीचे श्रीकांत पेडणेकर, जलस्रोत खात्याचे साहाय्यक अभियंता पोकळे तसंच सहाय्यक अभियंता सालेलकर तसंच साळचे सरपंच घनश्याम राऊत, उपसरपंच वर्षा साळकर, पंच वासुदेव परब, पंच प्रकाश राऊत, पंच देविदास नाईक आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

हेही वाचाः मोठी बातमी! यापुढे सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे विलीनीकरण होणार नाही

या चर्चेत शेतकऱ्यांमधून मेघशाम राऊत, सुरेश परब, बाबी राऊत, अशोक धाऊस्कर, गोपी राऊत, लक्ष्मण नाईक, अशोक परब, भरत तारी, गणेश राऊत, रमेश परब, संतोष राऊत, कालिदास राऊत, विशाल परब, अनिल भाईप, मनोहर राऊत आणि इतर शेतकऱ्यांनी आपल्या विविध समस्या अधिकाऱ्यासमोर मांडल्या. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन, स्वागत आणि आभार प्रदर्शन दिलीप देसाई यांनी केलं.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!