श्रीपाद नाईकांप्रमाणेच मुंडे, फालेरोंच्या अपघातांनी अंगावर काटा

फालेरोंनीही गमावली होती पत्नी

सचिन खुटवळकर | प्रतिनिधी

पणजी : केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांच्या कारला कारवारमध्ये झालेल्या अपघातानंतर माजी केंद्रीय मंत्री गोपिनाथ मुंडे यांच्या अपघाताच्या स्मृती ताज्या झाल्या. या अपघातात मुंडे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. गोव्याचे माजी खासदार तथा माजी केंद्रीय मंत्री एदुआर्द फालेरोंच्या कारचाही 1993 साली दिल्लीत अपघात झाला होता. त्या अपघातात त्यांच्या पत्नीचा मृत्यू झाला होता.

असा घडला मुंडेंच्या कारचा अपघात…

गोपीनाथ मुंडे यांनी 26 मे 2014 ला मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात मंत्रिपदाची शपथ घेतली होती. शपथविधीनंतर 3 जून 2014ला सकाळी मुंडे दिल्लीतील 21 लोधी इस्टेट या सरकारी निवासस्थानावरून विमानतळाकडे जायला निघाले होते. मुंडे सरकारी गाडीतून जात होते आणि त्यांच्या सोबत ड्रायव्हर आणि त्यांचा पीए होते. सकाळी साधारण 6 वाजून 20 मिनिटांच्या सुमारास त्यांची गाडी पृथ्वीराज रोड-तुघलक रोडचं इंटरसेक्शन असलेल्या अरबिंदो मार्गावर पोचली. तिथल्या सिग्नलवर उजवीकडून येणार्‍या इंडिका गाडीची मुंडेंच्या गाडीशी धडक झाली.

चेहर्‍याला मार लागला…

गोपीनाथ मुंडे गाडीच्या मागच्या सीटवर बसले होते. दोन्ही गाड्यांची धडक झाल्यानंतर मुंडेंचा चेहरा समोरच्या सीटवर आदळला. त्यानंतर लगेचच मुंडेंना अस्वस्थ वाटायला लागल्यामुळे पीए आणि ड्रायव्हरनं त्यांना तातडीनं ‘एम्स’च्या ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल केलं. एम्समध्ये पोहोचल्यावर त्यांचं हृदय बंद पडल्याचं डॉक्टरांच्या लक्षात आलं. डॉक्टरांच्या टीमनं सीपीआरच्या माध्यमातून सुमारे तासभर प्रयत्न केल्यानंतर सकाळी 7 वाजून 20 मिनिटांनी गोपीनाथ मुंडे यांना मृत घोषित केलं.

एदुआर्द फालेरोंनाही झाला होता अपघात

गोव्याचे माजी खासदार तथा माजी केंद्रीय मंत्री एदुआर्द फालेरोंच्या कारचाही 1993 साली केंद्रीय मंत्रिपदी असताना दिल्लीत अपघात झाला होता. पत्नी आणि दोन्ही मुलींसह दिल्ली विमानतळावर जात असताना एका भरधाव कारनं फालेरो यांच्या कारला जोरदार धडक दिली. त्या अपघातात त्यांच्या पत्नीचा मृत्यू झाला होता. या कटू स्मृती श्रीपाद नाईक यांच्या कार अपघातामुळे पुन्हा एकदा ताज्या झाल्या.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!