अट्टल सोनसाखळी चोराचे अखेर हस्तांतरण

कळंगुट पोलिसांनी कर्नाटकातून घेतले ताब्यात : तीन दिवसांची कोठडी

Goan Varta Live | प्रतिनिधी

म्हापसा: राज्यात व विशेषत: उत्तर गोव्यातील किनारी भागात सोनसाखळी चोरीप्रकरणात कळंगुट पोलिसांना हवा असलेला संशयित अजीज असिफ (३०) याला शुक्रवारी बंगळुरू येथून कर्नाटक पोलिसांकडून हस्तांतरण वॉरंटअंतर्गत गोव्यात आणले. अटक करण्यात आलेल्या संशयित असिफ याला शुक्रवारी म्हापसा न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता, न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली आहे.

उत्तर गोव्यातील किनारी परिसरात मोठ्या प्रमाणात सोनसाखळी चोरीच्या घटना

कळंगुट पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील काही दिवसांत उत्तर गोव्यातील किनारी परिसरात मोठ्या प्रमाणात सोनसाखळी चोऱ्यांच्या घटना घडल्या होत्या. याबाबत प्राथमिक चौकशी केली असता संशयित चोर मांद्रे परिसरात राहत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार, कळंगुट पोलिसांनी जुनासवाडा-मांद्रे येथील एका गेस्ट हाऊसची झडती घेतली असता, तिथे पोलिसांना चोरलेल्या काही वस्तू व संशयिताचे ओळखपत्र सापडले. त्यावेळी पोलिसांना तीन लॅपटॉप, दोन आयफोन मोबाईल, एक एमआय मोबाईल, आधार कार्ड, पॅनकार्ड व इतर साहित्य सापडले. ते नंतर पोलिसांनी जप्त केले.

संशयिताला अटक

त्यानंतर सबंधित संशयित बंगळुरू येथील असल्याचे कळल्यानंतर पोलिसांचे एक पथक तिथे रवाना झाले. त्या पथकात पोलिस उपनिरीक्षक सुशांत सांगोडकर, हेड कॉन्स्टेबल विनय श्रीवास्तव, कॉन्स्टेबल शंशाक साखळकर, प्रवीण चोडणकर व अक्षय कामुर्लेकर यांचा सहभाग होता. बंगळुरूमध्ये गेलेल्या पथकाला संशयित कर्नाटकच्या बनासवाडी पोलिस स्थानकाच्या ताब्यात असल्याचे समजले. त्यानंतर कळंगुट पोलिसांनी तेथील न्यायालयाकडून हस्तांतरण वॉरंटअंतर्गत संशयित अजीज असिफ याला ताब्यात घेऊन गोव्यात आणले आणि शुक्रवारी त्याला रितसर अटक केली. या प्रकरणी उत्तर गोवा पोलीस अधीक्षक शोबित सक्सेना यांच्या मार्गदर्शनाखाली कळंगुट पोलीस निरीक्षक नालोस्को रापोझ अधिक तपास करीत आहेत. 

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!