सोने बाजाराचं तब्बल ८०० कोटींचं नुकसान !

अक्षयतृतीयेचाही मुहूर्त हुकल्यानं व्यापारी हवालदिल !

Goan Varta Live | प्रतिनिधी

मुंबई : कडक निर्बंधांमुळं यंदा अक्षय्यतृतीयेच्या मुहूर्तावरही सोने खरेदी झाली नाही. सोन्या-चांदीची दुकाने खुली ठेवण्यास परवानगी नसल्यानं फक्त मुंबईतील सोने बाजाराचं जवळपास ८०० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यापाऱ्यांनी वर्तवला. सोन्याच्या दरात घसरण होऊनही ही परिस्थिती पाहायला मिळाली.
गेल्या वर्षीही पाडवा आणि अक्षय्यतृतीयेच्या मुहूर्तावर टाळेबंदी असल्यानं बाजारपेठा बंद होत्या. त्यानंतर व्यापार- उद्योगांना परवानगी मिळाल्याने सोने व्यापारालाही गती येईल, असा अंदाज बांधण्यात आला होता. त्यात सोन्याचे दरही कमी होऊ लागले. परंतु कठोर निर्बंधांमुळ सोने-चांदी दुकानांना आणि मोठ्या बाजारपेठांना फटका बसला आणि या व्यापाऱ्यांपुढं मोठं अर्थसंकट निर्माण झालंय.
दरवर्षी सणांच्या मुहूर्तांवर कोट्यवधी रुपयांची उलाढाल या बाजारात होते.
अक्षय्यतृतीयेच्या दिवशी सोनेखरेदी करणे हा ग्राहकांच्या श्रद्धेचाही भाग असतो. गेली काही वर्षे सोन्याचे भाव चढे असूनही सराफ बाजार अक्षय्यतृतीयेच्या दिवशी उजळला होता. मात्र यंदा भाव कमी होऊनही उलाढाल ठप्प झाली आहे. फक्त मुंबईचा विचार करता जवळपास ८०० कोटी रुपयांचा व्यवसाय यंदा झाला नसल्याचा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला. स्थानिक सराफा दुकानदारांकडूनही निर्बंधांबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे. कोरोनामुळे लोकांची क्रयशक्ती कमी झाली असली तरी भविष्याची तरतूद म्हणून अनेक ग्राहक सोने खरेदीसाठी करतात. ग्राहकांकडून फोनद्वारे मागणीही होत आहे. परंतु दुकाने खुली नसल्याने आलेल्या मागणीवर पाणी सोडावे लागत आहे,’ असे सराफा दुकानदारांचे म्हणणे आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!