गोवा डेअरीच्या प्रशासकांविरुद्ध न्यायालयात जाणार

अनुप देसाई यांचा इशारा; 1.35 कोटींच्या वसुलीची मागणी

विश्वनाथ नेने | प्रतिनिधी

पणजी: सहकार खात्याने नेमलेल्या प्रशासकीय मंडळाचा मनमानी कारभार गोवा डेअरी आणि दूध उत्पादक यांना मारक ठरत आहे. त्यामुळे या मंडळाच्या निर्णयांविरुद्ध न्यायालयात लढा दिला जाईल, असा इशारा डेअरीचे माजी अध्यक्ष अनुप देसाई यांनी दिला आहे. तसंच सहकार खात्याने डेअरीच्या माजी संचालक मंडळासह माजी व्यवस्थापकांना 1 कोटी 35 लाख 32 हजार 120 रुपयांच्या वसुलीचा आदेश देऊन 15 दिवसांत प्रतिवाद्यांकडून उत्तरही मागितले आहे. ही वसुली लवकरात लवकर होणं आवश्यक असल्याचं मत देसाई यांनी व्यक्त केलं आहे. या पार्श्वभूमीवर त्यांच्याशी केलेली बातचीत…

हेही वाचाः मोठी बातमी! बारावीसाठी दीड तासाची परीक्षा होण्याची शक्यता

1 कोटी 35 लाखांची वसुली शक्य आहे का?

देसाई: सहकार खात्याने वसुलीचा आदेश देऊन चांगलं पाऊल उचललं आहे. ही वसुली झाल्यास, ‘डेअरीत जर कोणी भ्रष्टाचार केला तर त्याच्यावरही अशाच तऱ्हेची कारवाई केली जाऊ शकते’, असा संदेश दूध उत्पादकांमध्ये जाईल. त्याचप्रमाणे डेअरीवर येणाऱ्या पुढील संचालकांना जरब बसेल. ते भ्रष्टाचार करण्यासाठी धजावणार नाहीत. जर सरकारने कायद्याची कडक अंमलबजावणी केली तर ही वसुली शक्य आहे.

हेही वाचाः CORONA UPDATE | देशात नव्या कोरोनाग्रस्तांचा आकडा दोन लाखांच्या खाली

गोवा डेअरी नेहमीच भ्रष्टाचारामुळे का चर्चेत असते?

देसाई : डेअरीत दुधाचे टँकर, गुरांचा चारा यासारख्या गोष्टींवर कमिशन घेणं अशा विविध प्रकारे यापूर्वी भ्रष्टाचार झाला आहे. श्रीकांत नाईक यांच्या अध्यक्षपदाच्या काळात हा प्रकार सुरू झाला. 2002 ते 2007 या आमच्या कार्यकाळात कुठेच कोणावरही भ्रष्टाचाराचा आरोप झालेला नाही. म्हणूनच प्रामाणिक संचालक डेअरीवर आले तर डेअरीचा कारभार नक्की सुधारेल, यात काहीच शंका नाही.

हेही वाचाः औषध उत्पादन-पुरवठा प्रक्रियेतील कर्मचाऱ्यांना फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांचा दर्जा

गोवा डेअरी कोणत्या बाबतीत कमी पडते आहे?

देसाई : गोवा डेअरी मार्केटिंगमध्ये कमी पडते. डेअरीत मार्केटिंग विभागच नाही. त्यामुळे दुधाशिवाय अन्य उत्पादनांचं मार्केटिंगच होत नाही. गोवा डेअरीला बाजारात सुमुलसारखे प्रतिस्पर्धी आले आहेत. मार्केटिंगच्या माध्यमातून सुमूल महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा या शहरांमध्ये जम बसविण्याचा प्रयत्न करत आहे. गोव्यातील दूध उत्पादकांना पर्याय निर्माण व्हावा, यासाठी माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकरांनी गोव्यात सुमूल आणली. सुमूलमुळे गोवा डेअरीला फटका बसला आहे.

हेही वाचाः खतं आणि बियाणी वाटपावरून मांद्रेचे राजकारण तापलं

गोवा डेअरी दूध उत्पादकांना विश्वासात घेते का?

देसाई : अजिबात नाही. दूध उत्पादकांना प्रोत्साहन देण्याची गरज होती. ती मधल्या काळात पूर्णपणे बंद झालेली आहे. त्यामुळे गोव्यात दूध उत्पादकांची ही अवस्था झाली आहे. सरकारने आपल्या परीने प्रयत्न केले. मात्र, त्याला गोवा डेअरीकडून अपेक्षित साथ मिळत नाही. उत्पादकांना चांगली आणि योग्य अशी पशुवैद्यक सेवा त्याचप्रमाणे वेळच्यावेळी आवश्यक ते मार्गदर्शन मिळणं अत्यंत महत्त्वाचं आहे.

हेही वाचाः आता लसीकरण केंद्रावरही होणार नोंदणी !

गोवा डेअरीवर सध्या प्रशासक नेमण्यात आला आहे. त्यावर आपलं काय मत आहे?

देसाई : प्रशासकीय समितीने दुधाचा खप वाढवणं आवश्यक होतं. मात्र, तसं झालं नाही. उलट प्रशासकीय मंडळाचा डेअरीत मनमानी कारभार सुरू आहे. प्रशासकीय मंडळाने अनेक चुकीचे निर्णयही घेतले आहेत. या चुकीच्या निर्णयांविरोधात लवकरच न्यायालयात जाणार आहे. यासंबंधीची सर्व कागदोपत्री तयारी झाली आहे. सहकार खात्याने डेअरीच्या कारभारात दूध उत्पादकांना सामावून घेण्याची गरज आहे. प्रशासक नेमून डेअरी आपल्या ताब्यात ठेवणं हा प्रकार गोवा डेअरीसाठी आणि दूध उत्पादकांसाठी मारक आहे. डेअरीच्या कर्मचाऱ्यांची सुरक्षा हाही महत्त्वाचा भाग आहे.

हेही वाचाः सावंत सरकारने आपल्या अपयशाची जबाबदारी स्वीकारावी

गोव्यात दूध व्यवसाय तोट्यात असण्याची कारणं

गोव्यात स्थानिक प्रजातीच्या गायी आणि हिरवा चारा नसणं या दोन गोष्टींमुळे येथील दूध व्यवसाय कायम तोट्यात आहे. परराज्यांतील प्रजातीच्या गायी गोव्याच्या वातावरणाशी जुळवून घेऊ शकत नाहीत. तशी प्रजात निर्माण करण्यासाठी सरकार किंवा डेअरीकडून आजपर्यंत तसे प्रयत्न झाले नाहीत. शिवाय हिरव्या चाऱ्याची व्यवस्था करण्यासाठी उचललेल्या पावलाला भ्रष्टाचाराचं ग्रहण लागलं. वास्तवात पडीक जमिनींत चारा निर्माण करता आला असता, असं मत अनुप देसाई यांनी व्यक्त केलं आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!