देवा तुझा माझा, का रे वैराकार ; याही वर्षी पायी आषाढी वारी नाही !

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : गोवा, कर्नाटक आणि महाराष्ट्राचं श्रद्धास्थान असलेला आषाढी वारी सोहळा यंदाच्या वर्षीही कोरोनाच्या सावटाखालीच साजरा होणार आहे. यंदा वारीसाठी केवळ १० पालख्यांनाच परवानगी देण्यात आली असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. पुण्यात आषाढी वारी संदर्भातल्या आढावा बैठकीत ते बोलत होते.

गेल्या वर्षीप्रमाणेच यावर्षीही आषाढी वारीचा सोहळा कोरोनाच्या सावटाखालीच साजरा होणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने केवळ १० पालख्यांनाच वारी सोहळ्यात सहभागी होण्याची परवानगी दिली आहे. या दहा पालख्या २० बसेसच्या माध्यमातून पंढरपुरात पोहोचतील. मुख्य मंदिर मात्र भाविकांसाठी आणि दर्शनासाठी बंदच असणार आहे. सर्व नियमांचं काटेकोरपणे पालन केलं जाईल, त्याचबरोबर सर्व सहभागी वारकऱ्यांना वैद्यकीय चाचणी आवश्यक असणार आहे, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर केलंय.

प्रत्येक पालखीसाठी ४० वारकऱ्यांना परवानगी असून पायी पालखीला मात्र यंदाच्या वर्षीही परवानगी नसल्याचं पवारांनी स्पष्ट केलंय. शासकीय महापूजेचा कार्यक्रम गेल्यावर्षीप्रमाणे सर्व निर्बंध पाळूनच करण्यात येईल, असंही पवार माध्यमांशी बोलताना म्हणाले. त्याचबरोबर रिंगण आणि रथोत्सवासाठी १५ वारकऱ्यांना परवानगी देण्यात आली आहे. आळंदी प्रस्थान सोहळ्याला फक्त १०० जणांनाच परवानगी देण्यात आली आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!