गोव्याच्या ‘प्रेरणा’ची दिल्लीत चमक

राष्ट्रीय युवा महोत्सव कत्थक स्पर्धेत दुसरा क्रमांक

धनश्री मणेरीकर | प्रतिनिधी

पणजीः भारत सरकारच्या केंद्रिय क्रीडा आणि युवा व्यवहार मंत्रालयातर्फे आयोजित राष्ट्रीय युवा संसदेत एकीकडे गोव्याच्या स्वाती मिश्राने चमक दाखवलीच. परंतु गोव्याच्या अजून एका लाडली लक्ष्मीने दिल्ली गाजवली. राष्ट्रीय युवा महोत्सव 2020-21 मध्ये आयोजित कथ्थक स्पर्धेत ताळगावच्या प्रेरणा पालेकरने चक्क दुसरा क्रमांक पटकावलाय. तिने गोव्याचं नाव उज्ज्वल केलंय. युवा महोत्सवात गोव्याच्या युवतींनी मिळवलेलं यश गोव्यासाठी खूपच अभिमानाचं ठरलंय. सर्व स्तरातून तिचं भरभरून कौतुक होतंय.

राष्ट्रीय युवा महोत्सवात १२ स्पर्धांचं आयोजन

भारत सरकारच्या केंद्रिय क्रीडा आणि युवा व्यवहार मंत्रालयातर्फे आयोजित राष्ट्रीय युवा महोत्सवात एकूण १२ स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं. या १२ स्पर्धांमधून नृत्य स्पर्धेत प्रेरणाने गोव्याची मान अभिमानाने उंचावली. ही नृत्य स्पर्धा ऑनलाईन झाली होती. पण स्पर्धा अटीतटीची असल्याचं प्रेरणाने सांगितलं. दुसरं बक्षीस प्राप्त करत प्रेरणाने गोव्याचं नाव मोठं केलंय, हे कौतुकास्पद आहे.

कला शाखा पदवी ते कथ्थक पदव्यूत्तर

प्रेरणा ही पणजीतील मॅरी इम्याक्यूलेट गर्ल्स हायस्कूलची विद्यार्थिनी. तिने आपलं बारावीचं शिक्षण धेंपे कला आणि विज्ञान उच्च माध्यमिक विद्यालयातून पूर्ण केलं. पुढे ती म्हापसा येथील सेंट झेवियर्स महाविद्यालयात पोहोचली आणि तिथे तिने कला शाखेतून पदवी प्राप्त केली. कोकणी विषय घेऊन गोवा विद्यापीठातून ती अव्वल आली आणि एन.डी.नाईक शिष्यवृत्तीची मानकरी ठरली. तिने पदव्युत्तर पदवी मिळवली. पण त्याचबरोबर ललित कला केंद्र पुणे येथे गुरूकुल पद्धतीनं कथ्थक कलेतही तिनं पदव्यूत्तर शिक्षण प्राप्त केलं. कथ्थक नृत्यप्रकारात पदव्युत्तर पदवी मिळवणारी गोव्यातून ती पहिलीच आहे. कला आणि संस्कृती संचालनालयातर्फे ‘गोव्याबाहेर कला क्षेत्रात शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना देण्यात येणारी शिष्यवृत्ती प्रेरणाला मिळाली आहे.

वयाच्या ५व्या वर्षी नृत्य क्षेत्रात प्रवेश

कळत्या वयापासून प्रेरणा कथ्थक नृत्याशी जोडली गेली आहे. वयाच्या पाचव्या वर्षी प्रेरणाने नृत्य क्षेत्रात प्रवेश केला. छोट्या-मोठ्या नृत्य स्पर्धांमधून भाग घेत वयाच्या अकराव्या वर्षी कला अकादमीत कथ्थक नृत्यप्रकाराचं शास्त्रशुद्ध शिक्षण घेण्यासाठीचा तिचा प्रवास सुरू झाला.

घरातून मिळाला कलेचा वारसा

प्रेरणाचे वडील हे नाट्यकलाकार होते. तिची बहीण देविना पालेकर तसंच काही जवळचे नातेवाईक हे नाट्याभिनयाशी जोडलेले आहेत. त्यामुळे कलेचा वारसा प्रेरणाला घरातूनच मिळालाय असं म्हटल्यास ते चुकीचं ठरणार नाही. शिवाय कलापूर्ण वातावरणात प्रेरणाची जडणघडण झाली असल्यामुळे कलेप्रति तिच्या मनात सहज आवड निर्माण झाली आहे. प्रेरणाच्या कुटुंबात कुणीच कथ्थक नृत्याचं शिक्षण घेतलेलं नाही. पण तरीही तिला हा नृत्य प्रकार शिकण्याची इच्छा असल्यामुळे आईवडिलांकडून भरपूर पाठिंबा मिळाला. त्यामुळे आई स्वेता पालेकर आणि वडील सुधाकर पालेकर यांच्यामुळे आपण कलाक्षेत्रात पोहोचले, असं ती नेहमीच सांगते.

माझे गुरु हाच माझा आदर्श

गुरूंप्रति प्रेरणाला प्रचंड आदरभाव आहे. आपल्या यशाचं सारं श्रेय ती आपल्या गुरुंना देते. पुण्यातील गुरु पंडिता शमाताई भाटे आणि गुरु वरदा फडके बेडेकर यांच्याकडून प्रेरणाने कथ्थक नृत्याचे धडे गिरवलेत. त्या जेवढ्या सुंदर नृत्यांगना आहेत, तेवढ्याच उत्कृष्ट गुरु आहेत, असं प्रेरणा सांगते. गुरु वरदा मयंक बेडेकर यांच्या आपल्याला कथ्थक नृत्यातील सौंदर्य दिसल्याचं प्रेरणा सांगते. थिएटर गुरु अनघा देशपांडे यांनादेखील प्रेरणा खून मानते. प्रेरणाचं कथ्थक नृत्यातील प्राथमिक शिक्षण कला अकादमी येथे गुरु सीमा खेडेकर खांडोळकर यांच्या मार्गदर्शनात झालं. त्यानंतर गुरु चंदन सिंग यांच्याकडूनही तिने शिक्षण घेतलं. तसंच साईश देशपांडे, डॉ. रमिता गुरव, अमिरा पाटणकर यांचं मार्गदर्शन मिळाल्यानंच आपण ही मजल मारू शकले, असंही ती म्हणते.

अनेक बक्षिसांची मानकरी

प्रेरणाने आजतागायत अनेक कथ्थक नृत्य स्पर्धांमधून भाग घेतलाय. तसंच ती अनेक बक्षिसांची मानकरी ठरली आहे. त्याचप्रमाणे गुरु वरदा फडके बेडेकर यांच्या ग्रुप कोरियोग्राफीजमध्ये गोव्यात तसंच गोव्याबाहेर तिने भाग घेतला आहे. सलग चार वर्षं म्हार्दोळ आणि कला अकादमी येथे आयोजित आंतरराष्ट्रीय शास्त्रीय नृत्य महोत्सव, ‘केसरबाई संगीत समारोह,’ औरंगाबाद येथे आयोजित ‘औरा फेस्टिव्हल.’ गोवा कला आणि संस्कृती संचालनालयातर्फे आयोजित ‘युवाप्रतिभोत्सव 2018,’ गोवा कला अकादमी आयोजित ‘नक्षत्रोत्सव 2018,’ वेंगुर्ला – सिंधुदुर्ग येथे ‘कै. सुरेश आणि शशिकांत डुबळे स्मृती शास्त्रीय संगीत समारोह’ तसंच कणकवली ‘आर्य मंदिर’ येथे तिने एकल कत्थक सादर केलं आहे. फक्त एवढंच नव्हे, तर गुरु पंडिता शामाताई भाटे यांच्या ग्रुप कोरियोग्राफीजचा भाग होण्याचं भाग्यदेखील प्रेरणाला लाभलं आहे. कुरुक्षेत्र येथे गीता महोत्सवात ‘महाभारत – अतीत की पकछाई,’ मुंबई येथे एनसीपीए तसंच केरळ येथे निशागंधी महोत्सवात ‘चतुरंग की चौपाल,’ ‘कृष्णा द लिबरेटर,’ त्याचप्रमाणे ‘निशब्द भेदा,’ ‘कस्तुरबा’ हे काही इतर प्रॉडक्शन्स. ‘नादरुप’ – गुरु पंडिता शामाताई भाटे यांनी आयोजित केलेल्या ‘मदाम मेनका कोरियोग्राफी मुव्हमेंट 2018’मध्ये प्रेरणाने नृत्य सादर केलं. तसंच ‘नवरात्री महोत्सव पुणे 2016 आणि 2017,’ ‘नृत्योत्सव पुणे 2018’ इथेही तिने आपली कला सादर केली. ‘कला चेतना वळवई,’ ‘कला ओंकार पणजी’ या सांस्कृतिक संस्थांचा ती एक सदस्य राहिली असून सध्या ती ‘अभिव्यक्ती पणजी’ या संस्थेशी लहानपणापासून संलग्न आहे. ‘इंडियन टायगर्स’ या ग्रुपच्या सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी लहान मुलांना नृत्य आणि अभिनय शिकवण्याचं काम तिने केलं आहे. एक प्रयोग म्हणून प्रेरणाने तिच्या पुणे विद्यापीठातील बॅचमेट्ससोबत मिळून ‘रात्र्न दिन आम्हा’ हे प्रॉडक्शन केलं आणि ‘खेलो इंडिया 2019’मध्ये आपली कला सादर केली. ‘साजण माझा’ या अल्बममधील ‘अनुरागी भजन’ या अमीरा पाटणकर यांनी कोरिओग्राफ केलेल्या म्युझिक डान्स व्हिडिओचा ती एक भाग आहे. गेल्या वर्षी राज्य युवा महोत्सवात तिने कत्थकमध्ये पहिलं बक्षीस मिळवलं, तर यंदा राष्ट्रीय युवा महोत्सवात कथ्थकसाठी दुसरं बक्षीस मिळवून तिने गोव्याची मान उंचावली आहे.

‘सुधाकला प्रांगण’ संस्थेची स्थापना

वडीलांच्या आठवणीत प्रेरणाने ‘सुधाकला प्रांगण’ या संस्थेची स्थापना केली. प्रेरणाच्या वडील सुधाकर पालेकर यांना कलेप्रति खूप प्रेम होतं. ते स्वतः उत्तम नाट्य कलाकार होते. या संस्थेच्या माध्यमातून कलेसाठी काम करणार असल्याचं प्रेरणाने सांगितलंय. या संस्थेच्या माध्यमातून ती ताळगाव तसंच म्हापसा येथे कथ्थक नृत्यकलेचे वर्ग घेते. जास्तीत जास्त मुलांना या नृत्य प्रकाराकडे वळविण्याचा प्रेरणाचा मानस आहे. कोविडमुळे सध्या ती ऑनलाईन वर्ग घेते. पण फेब्रुवारीपासून ती ऑफलाईन वर्ग सुरू करणार असल्याचं तिने सांगितलंय.

विविध कार्यशाळांचं आयोजन

कथ्थक नृत्यकलेचा प्रसार करण्यासाठी प्रेरणा विविध कार्यशाळांचं आयोजनही करते. निर्मल इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशनच्या बी.एड. ट्रेनिंग विद्यार्थ्यांसाठी आबोल्यांचे फेस्त २०१९ करता तिने परफॉर्मिंग आर्ट वर्कशॉप घेतला होता. गोवा आर्किटेक्चर कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी तिने अशाच एका कार्यशाळेचं आयोजन केलं होतं. अभिव्यक्ती पणजी येथे प्रा. अनघा देशपांडे आणि साईश देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली तिने अनेक थिएटर कार्यशाळांचं आयोजन केलं आहे.

युवा पिढीसाठी संदेश

सर्व कथ्थक नृत्यांगनांना माझी विनंती आहे, की या नृत्यप्रकाराचं उत्तमोत्तम शिक्षण घेण्यासाठी गोव्याच्या बाहेर पडा. कारण या नृत्य प्रकारात गोवा अजून बराच मागे आहे. गोव्यात कथ्थक नृत्य प्रकारात अजून बर्‍याच सुधारणा करायला वाव आहे. जेवढं जास्त शिकता येईल तेवढं शिका. आपल्याकडील ज्ञानाच्या जोरावर येणार्‍या पिढीतील मुलांना या नृत्य प्रकारात तयार करा. जेणेकरून हा नृत्य प्रकार एका पिढीकडून दुसर्‍या पिढीकडे जाऊ शकेल, असं प्रेरणा सांगते.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!