गोंयच्या कोकणीचा राष्ट्रीय स्तरावर ‘प्रेमजागोर’

रंग संगम नाट्य महोत्सवात शनिवारी सादरीकरण

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजीः साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त आणि गोव्याचे ज्येष्ठ कोकणी लेखक पुंडलीक नाईक यांच्या लेखणीतून साकारलेलं प्रेमजागोर हे कोकणी नाटक दिल्लीत सादर होणारेय. संगीत नाटक अकादमीतर्फे आयोजित आजादी का अमृत महोत्सव कार्यक्रमांतर्गत रंग संगम नाट्य महोत्सवात या नाटकाचा प्रयोग 27 मार्चला रात्री 8.30 वाजता होणारेय. केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाच्या अखत्यारित आयोजित केलेल्या या महोत्सवात गोव्याच्या कोकणीचा या नाट्यरूपात सन्मान होत असल्यामुळे गोंयकारांसाठी ही अभिमानाची गोष्ट ठरलीये.

ऑनलाईन पद्धतीने नाट्य सादरीकरण

अंत्रूज लळितक, बांदोडा- फोंडा या संस्थेने या नाटकाची निर्मिती केलीये. गोव्याचे नामंकित नाट्यदिग्दर्शक तथा चित्रकार श्रीधर कामत बांबोळकर यांनी या नाटकाचं दिग्दर्शन केलंय. या महोत्सवात दोन हिंदी, एक मराठी, एक गुजराती आणि एक कोकणी नाटक सादर होणारेय. विशेष म्हणजे या नाट्यप्रयोगाचा लाभ देशभरातील नाट्यप्रेमींना व्हावा यासाठी संगीत नाटक अकादमीने हे सादरीकरण ऑनलाईन पद्धतीने आयोजित केलंय आणि त्यासाठी त्यांच्या फेसबुक पेज https://www.facebook.com/sangeetnatak/ आणि युट्यूब चेनलवर https://www.youtube.com/sangeetnatak/ ही सगळी नाटकं उपलब्ध करून दिलीत.

हेही वाचाः Corona +ve | आमदार बाबूश यांना कोरोनाची लागण

गोंयची लोककला आणि लोकनृत्याचा अविष्कार

प्रेमजागोर हे कोकणी नाटक गोव्यात बरंच गाजलंय. या संस्थेने कोकणी नाट्यस्पर्धेत घवघवीत यश तर मिळवलंयच. परंतु या नाटकाचे अनेक प्रयोग गोव्याभरात झालेत. एका खेडेगावातील ही एक लव्हस्टोरी. पण या लव्हस्टोरीला गोव्याची संस्कृती, लोककला, लोकनृत्य याचा बाज आहे. अगदी अंगावर काटा उभा करणारं हे नाटक देशभरातील नाट्यरसिकांची दाद मिळवून जाईल, यात अजिबात शंका नसावी. मोगा आणि बाबूराय यांची ही लव्हस्टोरी गोव्याच्या ग्रामीण जीवनपद्धतीचं एक नैसर्गिक चित्र उभं करते. पुंडलीक नाईक यांची लेखणी आणि श्रीधर कामत बांबोळकर यांचं दिग्दर्शन हा एक वेगळाच अनोखा संगम ठरलाय. दोन्ही ताकदीची माणसं असल्याने त्यांच्या या अनोख्या नाट्यमंथनातून एक अमृतरूपी नाट्यनिर्मिती प्रेमजागोराच्या रूपात तयार झालीये.

अंत्रूज लळितकचा दबदबा

फोंडा तालुक्यातील अंत्रूज तळितक ही संस्था बरीच लोकप्रिय. नाट्यक्षेत्रात या संस्थेचा एक वेगळाच दबदबा आहे. कोकणी आणि मराठी नाट्यसादरीकरणात या संस्थेने आत्तापर्यंत अनेक बक्षिसं प्राप्त केलीत. दरवेळी एका वेगळ्याच धाडणीची नाटकं सादर करण्याची या संस्थेची परंपरा आहे.

हेही वाचाः BREAKING | अग्नितांडव! पुणे कॅम्पमधील दुकानांचा कोळसा

हे असतील गोंयकार कलाकार

या नाटकात मोगा या पात्राची प्रमुख भूमिका तन्वी बांबोळकर साकारणार आहे, तर प्रेमनाथ केरकर हे बाबुरायची भूमिका वठवणार आहे. या व्यतिरीक्त दादी – गुरूदास नाईक, देमू – विराज गावडे, मांदा गुरू – रोहीदास गावडे, रिद्धी – अंकिता गावडे, शेजारी – वेदश्री गावडे आणि स्नेहा कामत, गराशेर/निखाणदार – दिनेश प्रियोळकर, बा – वंदना मुळवी, येसो – सुनील गावडे, गणपती – विराज नाईक, सिद्धी – मिनाक्षी गावडे, गोरंवा राखणो- प्रविण खेडेकर, सुशांत अकारकर, संगीत – सुरेश गावडे, सर्वेश गावडे, दयानंद खेडेकर, यदुवेंद्र खेडेकर, परेश गावडे, मुख्य गायक – गौरव गावडे, गौतमी हेदे बांबोळकर, इतर संगीत सहकारी – अशोक गावडे, मृगया गावडे, दिया प्रियोळकर, नेहा गावडे, गीता बांबोळकर, राधाकृष्ण बांबोळकर, संगीत दिग्दर्शक – चेतन खेडेकर, रंगभूषा- सोमनाथ गावडे, वेशभूषा – भानुदास गावडे यांचा समावेश आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!