गोव्यातील पहिली ‘ऑक्सिजन ऑन व्हील्स’ केपेत कार्यान्वित

उपमुख्यमंत्री चंद्रकांत (बाबू) कवळेकर यांच्या हस्ते उद्घाटन; जनतेसाठी ठरणार वरदान

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजीः उपमुख्यमंत्री चंद्रकांत (बाबू) कवळेकर यांच्या हस्ते केपेत ‘ऑक्सिजन ऑन व्हील्स’ कार्यान्वित करण्यात आली आहे. 5 ऑक्सिजन काँसंट्रेटर्स, सोबत 2 जनरेटर आणि अत्यावश्यक औषधे असं या वाहनाचं स्वरूप असून, केपे आणि आसपासच्या तालुक्यातील दुर्गम भागात राहणाऱ्या जनतेसाठी कोविड काळात हे वाहन वरदान ठरणार आहे. त्याच बरोबर तौक्ते वादळानंतर खंडीत वीजप्रवाह आणि त्यापासून उत्पन्न परिस्थितीपासून धडा घेत, बंगालच्या खाडीत आता तयार होणारे यास वादळ आणि येणाऱ्या पावसाळ्यात आपत्ती व्यवस्थान करत असताना कोविड रुग्णांसाठी हे वाहन वरदान ठरणार आहे.

हेही वाचाः आरोग्य पायाभूत सुविधांची दीर्घकालीन रणनीती अंमलात आणा

उपमुख्यमंत्री चंद्रकांत (बाबू) कवळेकर यांच्या हस्ते उद्घाटन

मुंबईहून खास मागविलेल्या या वाहनाच्या उद्घाटन प्रसंगी उपमुख्यमंत्री चंद्रकांत (बाबू) कवळेकर यांच्या सोबत, केपेच्या नगराध्यक्ष सूचिता शिरवईकर, उपनगराध्यक्ष विल्यम फर्नांडीस, अमोल काणेकर, प्रसाद फळदेसाई, केपे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्य अधिकारी डॉ. लोर्ना फर्नांडिस, केपे कोविड स्टेप उप केंद्राचे डॉ. संतोष वेर्णेकर, डॉ. पूजा वस्त उपस्थीत होते.

हेही वाचाः कोरोनाला झटक्यात बरं करणाऱ्या आयुर्वेदिक औषधाचा ‘या’ राज्यात बोलबाला

म्हणून मुंबईतून मागवलं ‘ऑक्सिजन ऑन व्हील्स’

हल्लीच झालेल्या तौक्ते वादळामुळे केपे भागात बरीच पडझड झाली होती. रात्रंदिवस वीजखात्याचे कर्मचारी आणि स्थानिक जनतेने मिळून पुरवठा परत सुरळीत करण्यात मोठा वाटा उचलला होता. यावेळी वीज गायब झाल्याने कोविड रुग्णांना ऑक्सिजन देणं किंवा रुग्णापर्यंत ऑक्सिजन पोचवणं कठीण होऊन गेलं. हे लक्षात आल्यानंतर तातडीने मुंबईहून हे खास तयार केलेलं वाहन केपेत मागविलं आहे, असं उपमुख्यमंत्री कवळेकरांनी यावेळी सांगितलं.

केपे तसंच आसपासच्या भागासाठी वरदान

केपे तालुक्या बरोबरच, शेजारील सांगे, धारबांदोडा,काणकोण आणि सालसेत तालुक्यातील कोविड रुग्णांना याचा फायदा होणार असल्याचं उपमुख्यमंत्री कवळेकर यावेळी म्हणाले. कुठल्याच ग्रामीण भागातील कोविड रुग्णाला ऑक्सिजनची कमतरता होऊ नये आणि तेही वीज नसल्याने त्याला ऑक्सिजन पुरवठा झाला नाही असं होऊ नये म्हणून हे वाहन आणलं गेलं असल्याचं ते म्हणाले. त्याच बरोबर या वाहनात तात्काळ लागणारी औषधं असणार आहेत. आपण या वाहनासाठी आणि आरोग्य केंद्रावर लागणाऱ्या कोविड औषधांचा मुबलक साठा यापूर्वीच आरोग्य अधिकाऱ्याकडे सुपूर्द केला असल्याची माहिती यावेळी बोलताना त्यांनी दिली. यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी कोविड रुग्णांना कुठल्याच कोविडच्या लक्षणांना हलक्यात घेऊ नये आणि तातडीने आरोग्यकेंद्रावर येऊन उपचार घेण्याची विनंती केली.

हेही वाचाः …आता पीपीई सूटही राहणार ‘कुल कुल’!

केपेत कोविड व्यवस्थापनासाठी चालू आहे 24 तास कॉल सेंटर

केपेत 7 मे रोजी ‘कोविड स्टेप अप’ केंद्र चालू झाल्यानंतर, केपेचे आमदार तथा राज्याचे उपमुख्यमंत्री चंद्रकांत (बाबू) कवळेकर यांनी 24 तास कोविड रुग्णांसाठी हेल्पलाईन सुरु केली आहे. केपे सोबत काणकोण, सासष्टी, सांगे आणि धारबांदोडा भागातील कोविड रुग्णांसाठी आरोग्य केंद्रात नेऊन आणण्यासाठी किंवा घरून आरोग्य केंद्रात जाण्यासाठी ही 24 तास मोफत वाहनांची उपमुख्यमंत्र्यांनी सोय केली आहे. केपे आणि आजूबाजूच्या तालुक्यातील कोविड रुग्णांची यामुळे मोठी सोय झाली आहे. एकदा कोविड रोगी घोषीत झाल्यानंतर, त्याला रुग्णालयात न्यायला किंवा चाचणी केंद्रात न्यायला रुग्णाचे घरचे सुद्धा एखाद्यावेळी आपली गाडी द्यायला पुढे येत नाहीत. अशावेळी उपमुख्यमंत्र्यांनी कोविड बाधितांची होणारी ही गैरसोय लक्षात घेऊन 24 तास 5 वाहनांची सोय केली असून, वेळ पढल्यास वाहनांची संख्या वाढविण्याची तयारी ही दाखविली आहे. यावरून सरकारी यंत्रणेवरील ताणही काही प्रमाणात कमी झाल्याचं दिसून आलं आहे. तसंच कोविड बाधित योग्यवेळी आरोग्यकेंद्रात उपचारासाठी पोचल्यानं त्यांचे योग्य उपचार होऊ शकले आणि पुढील उपचारांची गुंतागुंत सुटसुटीत झाल्याचेही निदर्शनास आलं आहे.

हेही वाचाः बिहारच्या बाप-लेकीची कमाल; कोरोना युद्धात डॉक्टरांच्या मदतीसाठी बनवला रोबोट

केपे कोविड स्टेप केंद्र ठरत आहे कोविड रुग्णांना वरदान

केपे येथील कोविड स्टेप उप केंद्र हे केपे आणि आजूबाजूच्या जनतेसाठी एक वरदान ठरत असून,योग्य वेळी खाटा उपलब्ध होत असून प्राणवायूची सोय असल्याने रुग्णांना योग्य मदत मिळत आहे, असं केपेच्या नवनिर्वाचिन नगराध्यक्ष सूचिता शिरवईकर म्हणाल्या. उपमुख्यमंत्र्यांनी रुग्णाच्या जेवणाची तसंच प्राणवायूची, मोफत औषधांची तसंच इतर साधन सुविधांची सोय केल्यानं रुग्णांना कोविडवर मात करण्यात सोपं जातं असं त्या म्हणाल्या. उपमुख्यमंत्र्यांनी ग्रामीण रुग्णांची गैरसोय ओळखून या केंद्राला सलाईन स्टँडपासून, पिण्याच्या पाण्याची सोय, टीव्ही आणि मोफत औषधांची मिळून सर्वच गोष्टींची सोय करून दिल्याबद्दल त्यांनी उपुख्यमंत्र्याने आभार व्यक्त केले.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!