‘गोव्यातील जनता भाजपसोबतच’

झेडपीनंतर नगरपालिक निवडणुकीने शिक्कामोर्तब

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : राज्यात विरोधकांसह काही एनजीओंच्या मानसिकतेची माणसं सत्ताधारी भाजप सरकारच्या बदनामीसाठी अहोरात्र काम करताहेत. एवढं करूनही जनता मात्र या सगळ्यांना धुडाकावून लावत असल्याचेच यापूर्वी झेडपी आणि आता नगरपालिका निवडणूकांतून स्पष्ट झालंय. राज्यात विधानसभा निवडणूका एका वर्षांवर आल्या असताना नगरपालिका निवडणूकांत लोकांनी भाजप समर्थक नगरसेवकांना निवडून आणून सरकारवरील विश्वासावरच शिक्कामोर्तब केलंय,असा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी केलाय.

राज्यातील नावेली झेडपी आणि इतर पंचायत पोटनिवडणूक तसेच पणजी महानगरपालिकेसह अन्य ६ नगरपालिकांच्या निवडणूकीत भाजपने घवघवीत यश मिळवलंय. एक कुंकळ्ळी नगरपालिका वगळता अन्यत्र सर्वंच ठिकाणी भाजप समर्थक पॅनलचा दणदणीत विजय झालाय. या विजयोत्सवानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी हा दावा केलाय. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोमंतकीय जनतेचे आभार व्यक्त करून जनतेने दाखवलेल्या विश्वासाला आपले सरकार पात्र ठरल्याची ही पावती असल्याचं म्हटलंय. विरोधकांनी कितीही खटाटोप केला तरी जनता सुज्ञ आहे आणि अशा अपप्रचाराला गोंयकार जनता भीक घालणारी नाही,असा टोलाही त्यांनी लगावला.

हेही पाहा – पालिका विजयानंतर भाजपची संपूर्ण पत्रकार परिषद अनकट

साखळीतील पराभव नगण्य

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या साखळी मतदारसंघातील नगरपालिकेच्या एका प्रभागाच्या पोटनिवडणूकीत विरोधी गटाचे धर्मेश सगलानी यांचा समर्थक उमेदवार निवडून आलाय. या प्रभागात भाजपला कधीच विजय मिळाला नव्हता. यावेळी भाजपने तिकडे तगडा सामना दिला, असे मुख्यमंत्री डॉ.सावंत म्हणाले. जिथे जिथे भाजपचा पराभव झालाय तेथील एकंदर कारणे आणि सुधारणा याबाबत पक्ष विचार करेल,असेही मुख्यमंत्री म्हणाले. भाजप संघटनेची ताकद आणि कार्यकर्त्यांचा प्रामाणिक वावर ही भाजपची जमेची बाजू आहे आणि त्या बळावरच या निवडणूकीत पक्षाने यश संपादन केल्याचं मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले.

मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब

भाजपने आगामी विधानसभा निवडणूका मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली लढविण्याची घोषणा यापूर्वीच जाहीर केलीय. या अनुषंगाने मागील झेडपी आणि आता नगरपालिका निवडणूकांत जनतेने पक्षावर ठेवलेला विश्वास हा मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्या नेतृत्वावर केलेला शिक्कामोर्तबच ठरलाय,असं प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी म्हटलंय. बंडखोरांबाबत बोलताना ते म्हणाले की जनतेने बंडखोरांना त्यांची जागा दाखवून दिलीय. बंडखोरांनी थेट विरोधी पक्षांना दिलेल्या पाठींब्याची गंभीर दखल पक्षाने घेतलीय. आगामी काळात यावर बैठक घेऊन कारवाईची प्रक्रिया सुरू केली जाईल,असेही ते म्हणाले. तूर्त या आंनदोत्सवात बंडखोरांवर बोलून विनाकारण त्यांना महत्व देण्याची गरजच नाही,असा टोलाही त्यांनी लगावला.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!