आरोग्यमंत्री विश्वजीत राणे अस्वस्थ झाले आणि…

कायदा हा सर्वांसाठी समान असायला हवा

किशोर नाईक गावकर, संपादक | प्रतिनिधी

ब्युरो : शेळ- मेळावलीतील आयआयटी विरोधकांची सर्व प्रकारची राजकीय कोंडी तसेच संपूर्ण तालुक्यात त्यांना एकटे पाडण्यासाठीचे सगळे प्रयत्न करून झाल्यानंतरही हा वणवा दिवसेंदिवस भडकत चालल्याने वाळपईचे आमदार तथा आरोग्यमंत्री विश्वजीत राणे बरेच अस्वस्थ बनलेत. झेडपी निवडणूकीत शेळ-मेळावली आंदोलनाचा प्रभाव नगण्य ठरल्याचे शेखी मिरवत या प्रकल्पाला गती देणार असल्याची वल्गना केल्यानंतर आणि मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी याच गतीला सीमांकन करण्याची प्रक्रिया सुरू करून चालना दिल्यानंतर हे आंदोलन हिंसक बनत चाललंय. आता सत्तरी तालुक्यातील वेगवेगळ्या गावांतून शेळ-मेळावलीवासियांना पाठिंबा मिळू लागलाय. म्हावशी गावातील शेकडो लोकांनी 25 किलोमीटर चालून शेळ- मेळावलीत धडक दिली आणि आपला पाठींबा गावकऱ्यांना जाहीर केला.

या आंदोलनाचा भडका संपूर्ण सत्तरीत पसरण्याची भिती निर्माण झाल्याने आरोग्यमंत्री राणे यांच्या भूमिकेत बदल घडून येत असल्याचे संकेत मिळताहेत. काल परवापर्यंत आयआयटीबाबत आपल्याला काहीच विचारू नका. मुख्यमंत्रीच काय ते सांगतील, अशी भूमिका घेणारे विश्वजित राणे यांनी हिंसक आंदोलन, शेळ-मेळावलीवासीय आणि त्यांना पाठींबा देणाऱ्यांविरोधात दाखल झालेले गुन्हे आणि तरीही शेळ-मेळावलीवासियांचा आंदोलन चालूच ठेवण्याचा वज्रनिर्धार या पार्श्वभूमीवर ग्राउंड रिपोर्ट काढण्याची प्रक्रिया सुरू केलीय. या आंदोलनाचे वास्तव समजून घेणार आणि मुख्यमंत्र्यांकडे चर्चा करणार असल्याचे पहिले ट्वीट त्यांनी सोमवारी जारी केलं.

मुख्यमंत्र्यांनी मात्र सिमांकनाची प्रक्रिया सुरूच राहणार असं सांगून पुन्हा एकदा शेळ-मेळावलीवासियांना चिथावण्याचाच प्रकार केला. आपण चर्चेसाठी तयार आहे. आंदोलकांनी चर्चेसाठी आपल्याकडे यावं,अशी भूमिका त्यांनी जाहीर केलीय. संध्याकाळी उशिरा विश्वजित राणे यांचा दुसरा ट्विट जारी झाला. या ट्वीटमध्ये त्यांनी आपल्यासाठी सत्तरी आणि उसगांवचे लोक आणि त्यांच्या भावना हेच सर्वकाही आहे.आपले लोक हीच आपली ताकद आहे,असे म्हटलंय. एकीकडे शेळ-मेळावलीवासिय गेल्या चार महिन्यांपासून आंदोलन करीत आहेत. हे आंदोलन चिरडून टाकण्यासाठी सर्व प्रकारची राजकीय ताकद वापरण्यात आली. उर्वरीत सत्तरीवासियांना पुढे करून आयआयटीला पाठींबा असल्याचे चित्र तयार केले गेले.

एवढे करूनही आपल्या मातीशी प्रामाणिक राहून जीव गेला तरी जमिन सोडणार नाही या निर्धाराने हा सगळा दबाव झुगारून आयआयटी विरोधाला चिकटून राहीलेल्या शेळ-मेळावलीवासियांच्या निर्धारासमोर आता आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी शरणागती प्रत्करण्याची तयारी केल्याचेच या ट्वीटवरून दिसून येते,अशी प्रतिक्रिया सत्तरीत उमटत आहेत.

वकिलांनाही पाझर फुटला

कायदा हा सर्वांसाठी समान असायला हवा. सत्तरी तालुक्यातील शेळ-मेळावलीत कायद्याला फाटा देऊन आणि सरकारी यंत्रणेचा गैरवापर करून हा प्रकल्प पुढे रेटला जातोय. सीमांकन करताना कायद्याची प्रक्रिया पार पाडावी लागते ती करण्यात आलेली नाही. पोलिस बळ वापरण्यात आल्याने आंदोसलन हिंसक बनले आणि तरीही आंदोलक आणि त्यांना पाठींबा देण्यासाठी पुढे सरसावलेल्या निवडक लोकांवर गंभीर कलमे घालून गुन्हे दाखल करण्यात आली आहेत. या एकूणच प्रकरणांत सरकारकडून उघडपणे कायद्याची फजिती सुरू आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील काही वकिलांनी शेळ-मेळावलीवासियांना कायदेशीर पाठींबा देण्याची तयारी दर्शवलीय. ऍड. श्रीधर कामत यांनी यासंबंधी पुढाकार घेऊन ते वेगवेगळ्या समविचारी वकिलांशी चर्चा करीत आहेत.

हेही वाचा – Uncut | म्हावशी गावातील लोक मेळावलीवासीयांसाठी रस्त्यावर आयआयटीविरोधात मोर्चा

राज्यात एका गावातील लोक आपल्या जमिनींच्या सरंक्षणासाठी आंदोलन करीत आहेत आणि सरकार विकासाच्या नावाने हा प्रकल्प पुढे रेटण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. या परिस्थितीत आंदोलकांना समाजाकडून कोणतीही सहानुभूती मिळत नसेल तर समाज म्हणून आम्ही सगळेचजण अपयशी ठरू. सगळा समाज राजकीय व्यवस्थेसमोर शरणागती पत्करून असल्याचा चुकीचा संदेश समाजात पसरल्यास भविष्यात अन्यायाविरोधात उभे राहण्याचे धाडस कुणीच करू शकणार नाही. राज्यभरातील वकिलांनी आपल्या कायदेशीर ज्ञान आणि अनुभवाचा उपयोग करून शेळ-मेळावलीवासियांना मदत करण्याची ही वेळ आहे,असे आवाहन अॅड.श्रीधर कामत यांनी केलंय.

पाहा व्हिडीओ –

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!