उपराष्ट्रपतीजी ईमेल वाचा प्लीज !

मुंबई-गोवा हायवेच्या कामाबाबत अनेक तक्रारी

किशोर नाईक गावकर, संपादक | प्रतिनिधी

पणजी : देशाचे उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू शनिवारी गोवा भेटीवर आलेत. त्यांचे 16 जानेवारीपर्यंत राज्यात वास्तव्य असेल. अलिकडेच राष्ट्रपती रामनाथ कोविंद गोवा मुक्ती हिरक महोत्सवाच्या उदघाटनानिमित्त गोव्यात येऊन गेलेत. आता उपराष्ट्रपती पोहचलेत. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती ही सर्वोच्च महनीय व्यक्ती. अर्थातच त्यांच्या आगमनामुळे सुरक्षा आणि इतर गोष्टींबाबत अनेक शिष्टाचारांचे नियम लागू होतात. सर्वसामान्यांची काही प्रमाणात गैरसोय होईलही.

इथे मात्र एक वेगळीच गैरसोय किंवा अडचण काहीजणांना सतावतेय. गोष्ट तशी जूनी पण विचारणार कोण, असा एक प्रश्न अनेकांना पडलाय. विशेष करून पेडणेवासियांना. एनएच-१६६ म्हणजे पूर्वीचा हायवे क्रमांक – १७ च्या रूंदीकरणाचे काम पत्रादेवी ते बांबोळीपर्यंत मेसर्स एम.व्ही.आर. इन्फ्रा प्रोजेक्टस हा कंत्राटदार करतोय. या कामाचा दर्जा आणि एकूणच या कामासंबंधीच्या गोष्टींमुळे या हायवेवरून रोजनिशी प्रवास करणारे बरेच त्रस्त बनलेत. आत्तापर्यंत अनेक तक्रारी, निवेदने झालीत. खुद्द पंतप्रधान कार्यालयापर्यंत हा विषय पोहचला. पण दुर्दैवाने राज्य सरकार उघडपणे या कंत्राटदाराची बाजू उचलून धरतेय. खऱ्या परिस्थितीबाबत चक्क खोटी माहिती पंतप्रधान कार्यालयाला दिली जाते. याचं कारण म्हणजे हे सगळेच कंत्राटदाराला दचकून असतात म्हणे.

आता या कंत्राटदाराला सगळेच घाबरण्याचे कारण काय. भाजपचा सर्वांत लाडका कंत्राटदार. भाजप सरकारात सर्वंच महत्वाची पायाभूत सुविधांची कामे ह्याच कंत्राटदाराला (कायदेशीर लिलाव) पद्धतीने मिळतात. कामाच्या दर्जाचं काहीच बोलू नाका. कारण या कंत्राटदाराला जाब विचारायचा नाही,असा दंडक आहे अशी चर्चाही सरकारात सुरू आहे.

व्यंकय्याजी का आदमी

मेसर्स एमव्हीआर ही व्यक्ती उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंच्या खास मर्जीतली आहे. व्यंकय्या नायडू हे भाजपचे ज्येष्ठ नेते. पूर्वीपासून त्यांचा गोव्याच्या भाजपकडे संपर्क. सुरूवातीला ते नेहमीच राज्यात भाजपच्या प्रचारासाठी यायचे. माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांना ते खूप मानायचे आणि नायडू यांच्याप्रती पर्रीकरांना मोठा आदर होता. या घट्टा नात्यातूनच मेसर्स एमव्हीआर ही कंपनी अचानक गोव्यात उदयास आली. व्यंकय्या नायडू आपल्या खाजगी भेटीवेळी नेहमीच या कंत्राटदाराच्या दोनापावला येथील बंगल्यावर भेट देतात,असं सरकारी अधिकारीच सांगतात.

सगळेच बिथरतात

एमव्हीआर कंपनीला सगळेच बिथरून असतात. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे यापूर्वी गोवा पायाभूत विकास महामंडळाचे चेअरमन राहीलेत. या कंपनीला जीएसआयडीसीची बहुतांश सगळीच कामे मिळताहेत. सहजिकच डॉ. सावंत यांनाही एमव्हीआरची चांगलीच ओळख असावी. सदर कंत्राटदाराच्या दबदब्यामुळेच तर मुंबई- गोवा हायवेच्या कामाचे संपूर्ण कंत्राट मेसर्स दिलीप बिल्डकॉन कंपनीला मिळालेले असतानाही पत्रादेवी ते बांबोळीपर्यंतचा टप्पा मेसर्स एमव्हीआर कंपनीला मिळालेला आहे. मुख्य म्हणजे या टप्प्यात पर्वरी बाजार ते तीन बिल्डींगपर्यंत ओवर ब्रीज येणार आहे. मुळातच सरकारने महामार्गाच्या रूंदीकरणासाठी आवश्यक भूसंपादन केलेले नाही आणि त्यात कंत्राटदाराला काम सुरू करण्याची परवानगी दिल्याने हायवेचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे सुरू आहे.

हेही पाहा – Panchnama | MUM-GOA HIGHWAY च्या कामातील हलगर्जीपणाला जबाबदार कोण? 

आत्तापर्यंत कंत्राटदाराच्या निव्वळ बेजबाबदारपणामुळे अनेकांचे जीव गेलेत तर अनेकजण जायबंदी होऊन घरी आहेत. हे सगळं डोळ्यांसमोर घडत असताना आणि लोक तक्रारी करीत असताना मुख्यमंत्र्यांसहीत सगळेच डोळ्यांना आणि कानांना पट्टी बांधून आहेत. या कंत्राटदाराला कुणीही जाब विचारू शकत नाही ना त्याला समज देऊ शकत. संपूर्ण सरकारी यंत्रणेनेच या कंत्राटदारासमोर शरणागती पत्करल्याने या कंत्राटदाराचा दबदबा बराच वाढलाय. आता तर मोपा विमानतळासाठीच्या 250 कोटींच्या लिंक रोडचे कंत्राटही ह्याच कंत्राटदाराला मिळणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.

कसं काय विचारणार ?

या कंत्राटदाराचा कुणी केसही वाकडा करू शकत नाही म्हटल्यावर आता केवळ एकच व्यक्ती हे काम करू शकते ती म्हणजे एम.व्यंकय्या नायडू. आत्तापर्यंत या कंत्राटदाराच्या बेजबाबदारपणाची जाणीव त्यांना ट्वीटर आणि ईमेलवरून देण्यात आलीय. आता ते चक्क गोव्यातच आहेत म्हटल्यावर त्यांच्या कानावर ही गोष्ट कशी घालावी,अशा विवंचतेन अनेकजण आहेत. या कंत्राटदाराच्या विरोधात बंडाचे निशाण फडकावलेल्या पेडणे तालुका नागरीक समितीचीही तीच कोंडी झालीय. पेडणे तोर्से येथील नागझरकर कुटुंबावर मोठा अन्याय झालाय.

या कुटुंबाच्या घरासमोरच खोदकाम करून त्यांना मुळ रस्त्यापासूनच वेगळं करण्यात आलंय. हे कुटुंब सगळ्यांकडे फिरून झालं तरीही कुणीही त्यांना दाद देत नाही. या कुटुंबाची व्यथा माध्यमांनी मांडली तरीही सरकारला पाझर फुटत नाही. हा प्रकार उपराष्ट्रपतींच्या नजरेला आणून देण्याची इच्छा पेडणे तालुका नागरीक समितीने व्यक्त केलीय. तसा ईमेल त्यांना पाठवण्यात आलाय. आता उपराष्ट्रपती आपल्या गोवा भेटीत हा ईमेल वाचून या कुटुंबाला न्याय मिळवून देणार काय, याची उत्सुकता मात्र सगळ्यांना लागून राहीलीय.

पाहा व्हिडीओ –

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!