गोष्ट राजाराम पैंगीणकरांची…

Goan Varta Live | प्रतिनिधी
डॉ. रुपेश पाटकर
शंभर वर्षांपूर्वीची गोष्ट. गोव्यातील पैंगीण गावातील. राजाराम असेल पंधरा- सोळा वर्षांचा. त्याला सामाजिक विषयांची आवड. त्याकाळात तो लोकमान्यांचा केसरी पोस्टाने मागवून वाचे. पेपर पोस्टाने येई म्हणजे त्यावर पत्ता असणारच. पत्ता असणार म्हणजे नाव असणार. पूर्ण नाव लिहायचे म्हणजे वडिलांचे नावदेखील असणार. पण राजारामने आपले नाव लिहिलेले त्याच्या वडिलांना आवडले नाही. त्यांनी तसे चिडून आईला सांगितले सुद्धा. ‘का मी बाबांचे नाव लावायचे नाही? काय चुकले माझे? मी कोण?’ हे प्रश्न छोट्या राजारामच्या डोक्यात येऊ लागले. याच प्रश्नांनी राजारामचे जीवन बदलून टाकले.
राजारामजींचा जन्म देवदासी कुटुंबात झाला होता. त्यांचे वडील गावातील प्रतिष्ठित व्यक्ती होते. पण त्यांनी राजारामजींच्या आईशी विवाह केला नव्हता. ते रोज त्यांच्या घरी उजळ माथ्याने येत होते, परंतु ते त्यांचे औपचारिक पालकत्व स्वीकारायला मात्र तयार नव्हते. त्याकाळात तीच समाजमान्य रीत होती. परंतु वडिलांनी नाव लावायला नकार देण्याची गोष्ट संवेदनशील राजारामजीना अस्वस्थ करून गेली. त्यांच्या डोक्यात बंडाचे बीज पेरून गेली.
आम्हीदेखील माणसेच आहोत. मग माणसामाणसात हा भेद का? आमच्या घरातील स्त्रिया लग्न न करता देवाला वाहिल्या जातात म्हणून? मग आता याच्या विरोधातच काम करायचं. त्यांनी आपला विचार आपल्या नातेवाईकांना , मित्रांना बोलून दाखवला. सहजासहजी हा विचार पाटणे कठीण होते. कारण शंभर वर्षांपूर्वी असा लढा उभारणे सोपे नव्हते. या प्रथेचा फायदा उठवणारा समाजातील उच्चभ्रूवर्ग होता. हा वर्ग जमीनदार होता. गावात त्याचीच सत्ता होती. शिवाय देवदासी परंपरा धर्मात गोवली गेल्यामुळे धर्माची दहशतदेखील होती. राजारामजींची आजी म्हणालीदेखील की म्हातारीच्या पोराला पंढरपूर कोणी सांगितलंय?
शेवटी २ऑक्टोबर१९१० ला पैंगीण गावात ती ऐतिहासिक सभा भरली. देवदासी प्रथेच्या प्रश्नाला अनेक आयाम होते. वेश्याव्यवसाय करणाऱ्यात गायक समाज, नाईक, बंदे, फर्जंत, देवळी, भाविणी, पेरणी वगैरे पोटजाती होत्या. या जाती आपापसात उच्चनीच भेद पाळत होत्या. काही ठिकाणी तर रोटी व्यवहारदेखील होत नव्हता. त्यामुळे या सर्वांना एकत्र आणण्याचे आव्हानदेखील त्यांच्यापुढे होतें. शिक्षणाचा प्रचार होणंदेखील गरजेचं होतं. त्यामुळे या बैठकीत वेश्याव्यवसाय न करता मुलींची लग्ने करण्याच्या ठरावासोबत समाजाचे एकीकरण करण्याची भूमिका घेण्यात आली. शिकण्याबाबत ठराव करण्यात आला. त्याचबरोबर आणखी दोन ठराव घेण्यात आले. हे ठराव खूप वैशिष्ट्यपूर्ण होते. कारण ते विवाह संस्थेत घुसलेल्या विकृतींना विरोध करणारे होते.या सभेने हुंडा न घेण्याचा आणि विधवांचे पुनर्विवाह करण्याचा ठराव संमत केले. या ठरावांवर सभेत जमलेल्या ३७ जणांनी सह्या केल्या. त्यापैकी २० सह्या महिलांच्या होत्या. या सभेत जमलेल्यानी या कामासाठी तब्बल ६०रुपये १४ आणे वर्गणी दिली. हे खूप मोठे यश होते. मग गावोगावी प्रचार सुरू झाला. लोकांचा पाठिंबा मिळू लागला. काही कटू अनुभवदेखील आले. समाजातील अनेक शिकलेले लोक समाजापासून दूर राहत होते, तर काहीजण जुन्या परंपरा सोडायला तयार नव्हते. चळवळीच्या प्रचारादरम्यान एके ठिकाणी तर देवदासी समाजातील व्यक्तीकडूनच पंक्तीप्रपंच केल्याचा अनुभव राजारामजीना आला.
समाजातील मुलींना शेन्सविधी करून देवदासी बनवण्याच्या पद्धतीविरुद्धचा संघर्ष हा समाजातील मानसिकता बदलण्याचा प्रयत्न होता. त्याचं पुढचं पाऊल म्हणजे देवदासी प्रथेची वेदना इतर समाजातील संवेदनशील लोकांपर्यंत पोचवणे. त्यासाठी सर्व जातीतील लोक जमतील असा एखादा कार्यक्रम घेणे आवश्यक होते. राजारामजींनी त्यासाठी सार्वजनिक सत्यनारायण करायचं ठरवलं. पूजेसाठी तयारी सुरू झाली. मंडप घातला. पताका लावल्या. आजूबाजूच्या गावातील लोकांनादेखील निमंत्रणे दिली. वर्गणी गोळा केली जाऊ लागली. देवस्थानाने देखील मनाचे सव्वापाच रुपये वर्गणी दिली. पूजेच्या दिवशी दुपारी ३ वाजल्यापासून लोक जमू लागले. पण गावचे पुरोहित काही केल्या येईनात. त्यांना गावातल्या वजनदार बामणानी पूजेला जाण्यास मज्जाव केला. गावात राहायचे मग पुरोहित त्यांचे वैर कसे घेतील? आणि पुरोहिताशिवाय पूजा कशी होणार? पूजा रद्द करणे भाग होते. मग जमलेल्याना काय सांगावे? राजारामजी उभे राहिले. त्यांनी महाभारत, रामायण, उपनिषदातील दाखले देत भेदाभेदतील विसंगती दाखवायला सुरुवात केली. व्यासांचा जन्म, धृतराष्ट्र व पांडू यांचा जन्म, वशिष्टांचा जन्म वगैरे उदाहरणे त्यांनी दिली. बहुजनांनी शिक्षण घेतल्याशिवाय त्यांचं दैन्य संपणार नाही, म्हणून शिक्षण घेण्याची आवश्यकता त्यांनी सांगितली. गंमत म्हणजे पूजेसाठी पुरोगामी प्रवृत्तीचे काही बामणदेखील आले होते. त्यांनाही पूजा झाली नसल्याचे पाहून वाईट वाटले. सत्यनारायण पूजा रद्द झाली तरी राजारामजींनी बामणशाहीपुढे आव्हान उभे केले होते. भेदाभेद मिटला तर बामणाना मान कोण देणार? बहुजन शिकले तर बामणाच्या बागायतीत (भाटात) मुकाट्याने काम कोण करणार? त्यामुळे त्यांना धडा शिकवलाच पाहिजे अशी भूमिका घेण्यात आली. राजारामजींनी देवाधर्माची नालस्ती केल्याचा प्रचार आजूबाजूच्या गावात करण्यात आला. गावाच्या देवळात लोक जमले. राजारामजींना मार देऊन वर दंड करण्याचे ठरवण्यात आले. ही गोष्ट राजारामजींची मित्रमंडळी सहन करणे शक्य नव्हते. देवळात राजारामजीना प्रत्यक्ष बांधण्याचा जेव्हा प्रयत्न करण्यात आला तेव्हा अमृतीबाई आणि हातात सुरा घेतलेल्या राजारामजींच्या भावाने हस्तक्षेप केला. राजारामजीच्या सहकाऱ्यांकडून प्रतिहल्ला होईल या भीतीने त्यांना सोडून देण्यात आले. तो प्रसंग टळला तरी बामणाचा रोष कायम होताच. त्यांच्या कुटुंबावर बहिष्कार घालण्यात आला. त्यांच्या शेतीबागायतीचे उत्पन्न जप्त करण्यात आले. हा विरोध जीवावर बेतणे शक्य होते. पुन्हा कसोटीचा प्रसंग. काय करावे? प्रतिकार कसा करावा? सरकारकडे दाद मागावी तर गावातल्या बामनांच्या विरोधी जाऊन आपल्या बाजूने साक्ष कोण देणार? मग गोव्याबाहेर पळून जावे का? क्षमा मागून माघार घ्यावी का? परिस्थिती चिघळण्यापूर्वी लवकरच काही ठोस करणे आवश्यक होते. मग त्यांनी एक वेगळीच खेळी केली. एका रात्री त्यांच्या घरावर दगडफेक झाली. आणि त्यांना तात्काळ गव्हर्नरला भेटण्याची संधी मिळाली. खरंतर प्रत्यक्षात त्यांनीच आपल्या मित्रांकरवी दगडफेक करवून घेतली होती. गव्हर्नरने ममलेदाराला हस्तक्षेप करण्याचे आदेश दिले. सरकारी दबाव तर मिळवला. पण त्याने विरोधक शांत होतील का? मग आणखी कोणाला मध्यस्थ करावं? परतगाळच्या मठाधिशानी निर्णय दिल्यास त्याचा मान बामणाकडून राखला जाईल. राजारामजींनी परतगाळच्या इंदिराकांत स्वामींकडे आपली बाजू मांडली. स्वामींना राजारामजींनी बाजू पटली. पण तरीही विरोधकांचे समाधान झाले नाही. राजारामजींनी देवाब्रह्मणांची नालस्ती केल्याबद्दल निदान क्षमा तरी मागितली पाहिजे अशी मागणी परतगाळचे दुसरे स्वामी कमलनाथजीकडे करण्यात आली. पण शेवटी कोर्टात जायची पाळी आलीच. हे लक्षात घेण्यासारखे आहे की राजारामजींचे वकील बामण होते तर साक्षीदार बामणांसह सर्वच जातीचे होते. विरोधकांना मात्र बामाणाशीवाय कोणीच साक्षीदार मिळाले नाहीत. पोर्तुगीज न्यायाधीश सियब्र परिस्थिती पाहण्यासाठी जातीने पैंगीणला आले. राजारामजींच्या बाजूने निर्णय झाला. विरोधकांनी हायकोर्टात आणि पोर्तुगालच्या वरिष्ठ कोर्टात केलेले अपील फेटाळण्यात आले.
या संघर्षात जय तर झाला, पण वैयक्तिक पातळीवर राजारामजीवर बिकट परिस्थिती आली. खटल्यामुळे आर्थिक नुकसान खूप झाले. पुन्हा व्यापार करावा तर गावातले श्रेष्ठी मदत करणे शक्य नव्हते. राजारामजींनी मुंबई गाठली. तेथेही कोणाकडून मदत होण्यासारखी नव्हती. मावशीच्या घरी फुकट जेवण मिळत होते. रिकामपणात वेळ फुकट घालवण्यापेक्षा आंब्याचा व्यापार करण्याचा सल्ला त्यांना एका स्नेहयाने दिला. व्यापार कसला? खोकी मांडून किरकोळ आंबे विकण्याचा. ते ही त्यांनी केले. त्या दिवसात एक दिवस ते मुलीच्या सासरी गेले. मुलीकडे कोणी पाहुणे आले होते. व्याह्यांनी राजारामजींची ओळख नातेवाईक म्हणून करून न देता ‘आमच्या गावचे आंबेवाले’ आशी करून दिली. राजारामजीनी नमस्कार केला आणि बाहेरची वाट धरली. या प्रसंगाविषयी राजारामजी आपल्या आत्मचरित्रात लिहितात, ‘अन्नाला काळ आणि धरणीला भार एवढीच आज माझी किंमत. जे लोक मला मानाने वागवत होते, त्यांच्याच घरात मी आंबेवाला झालो. ह्यात त्यांचा दोष नाही, कालाय तसमै नमः’
आंब्याचा मौसम संपल्यावर राजारामजीं गावी परतले. विरोधकांचा राग थोडा थंडही झाला होता. आणि राजारामजींच्या नम्र स्वभावामुळे परिस्थिती बदलली. त्यांनी व्यापार सुरू केला. त्यांना गिऱ्हायकेही चांगली मिळत गेली.
समाजासाठीचे कामदेखील चालू होते. सभा, चर्चा, प्रचार वगैरे संघटनात्मक कामाबरोबरच शैक्षणिक काम चालू होते. संघटनेच्या कामातील महिलांचा सहभाग वाढावण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न सुरू केले. आजपर्यंतच्या सभांचे सर्व अध्यक्ष पुरुषच असल्याने १९४१ साली नागेशी येथे भरलेल्या प्रचंड सभेचे अध्यक्षस्थान इंदिराबाई नार्वेकर यांना देण्यात आले. १९४२ साली कारवारच्या सुहासिनी बोरकर यांच्या अध्यक्षतेखाली मोठी सभा भरवण्यात आली. जुन्या चालींना पूर्ण फाटा देऊन स्वतःच्या कर्तृत्वावर नव्या विकासाकडे झेपावणारा हा समाज गोमंतक मराठा समाज या नावाने ओळखला जाऊ लागला. बंड करणाऱ्या या शोषित समाजाचे वैशिष्ट्य असे की त्याने लाचारीला, संधीसाधुपणाला अजिबात स्थान दिले नाही. या समाजाने स्वतःच्याच समाजातील नव्हे तर सर्वच जातीतील गरीब होतकरू मुलांना शिक्षणासाठी मदत करण्याची भूमिका घेतली. या समाजातील अनेकांनी स्वकर्तृत्वावर विविध क्षेत्रात आपले स्थान निर्माण केले. गोव्याचे पाहिले आणि सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर याच समाजातले होते. कोणालाही व्यक्तिगत दोष न देण्याच्या राजारामजींच्या प्रवृत्तीमुळेच कदाचित, त्यांनी ज्या समाजाशी समानतेसाठी संघर्ष केला, त्या समाजात त्यांचे अनेक मित्रही होते. एवढेच नव्हे तर या दोन समाजात कटुताही निर्माण झाली नाही. १९६४ साली पैंगीणपासून जवळच असलेल्या लोलीये गावात सारस्वत बामाणानी बांधलेल्या श्रीदामोदर विद्यामंदिराच्या बक्षीस वितरण समारंभाचे अध्यक्ष म्हणून राजारामजीना बोलावण्यात आले. १९२१साली सत्यनारायण पूजेच्यावेळी बहुजन समाजाने शिक्षण घ्यावे म्हणून सांगणाऱ्या राजारामजीवर बहिष्कार घालणाऱ्या समाजाने गोरगरिबांना शिक्षण मिळावे म्हणून शाळा सुरू केली आणि तेथील कार्यक्रमाला राजारामजीना बोलावले, हा खरोखरच राजारामजीच्या चळवळीचा विजय होता.