सविस्तर | वेश्या व्यवसाय आणि हारदवून टाकणारे सवाल

बलात्काराच्या घटना वाढल्यानं लैंगिक भूक, सत्ता गाजवण्याचा पुरुषी स्वभाव आणि वेश्या व्यवसाय पुन्हा चर्चेत

Goan Varta Live | प्रतिनिधी

डॉ. रुपेश पाटकर : या गोष्टीला आता 12 वर्षांहून अधिक काळ लोटला. मी बांबोळीच्या मनोविकार संस्थेतील जॉब नुकताच सोडला होता आणि कन्सलटंट सायकियाट्रिस्ट म्हणून ‘अन्याय रहित जिंदगी’ (ARJ) या संस्थेत आठवड्यातून दोनदा व्हीजीट देत असे.
‘अर्ज ‘ या संस्थेशी माझी ओळखदेखील बांबोळीच्या मनोविकार संस्थेतील नोकरीदरम्यान झाली. या संस्थेच्या कार्यकर्त्या काही पेशंटना घेऊन येत. त्या पेशंटपैकी काहीजणीनी वेश्याव्यवसाय केलेला असे. अर्थात एक सायकीयाट्रिस्ट म्हणून मी सगळ्याच पेशंटशी पूर्वग्रह न ठेवता वागणे साहजिक होते. पण अर्जच्या कार्यकर्तीला मात्र माझे वागणे इतरापेक्षा वेगळे वाटे. आणि ती मुद्दाम आपले पेशंट माझ्याकडे घेऊन येई. मी सरकारी मनोविकार संस्थेतील नोकरी सोडताच अर्जने मला त्यांच्या संस्थेसाठी वेळ देण्याची विनंती केली.

हादरवून टाकणारा सवाल

या संस्थेने वेश्याव्यवसायातून बाहेर पडू इच्छिणाऱ्या महिलांसाठी एक लॉंड्री सुरू केली होती. तिथल्या महिलांना भावनिक प्रश्न असतील तर सल्ला देणे हे माझे काम होते. या लॉंड्रीत काम करणाऱ्या महिला ज्या बायणा वस्तीतून येत, तिथे या संस्थेचे ऑफिस होते. मी अगदी सुरुवातीच्या काळात या संस्थेचे काम समजून घेण्यासाठी त्यांच्या बायणा वस्तीतील ऑफिसमध्येदेखील जात असे. तिथेच रमेश हरिजन (नाव बदलले आहे) हा सुमारे माझ्याच वयाचा तरुण भेटला. एकदोन भेटीनंतर एक दिवस तो म्हणाला…

“साहेब, एक प्रश्न विचारू? राग मानू नका. तुम्ही येथे येता, आमच्याशी आपुलकीने बोलता. पण तुमची आई किंवा बहीण किंवा बायको रंडी आहे, असे जर कोणी म्हटले तर काय वाटेल तुम्हाला?”

रमेशच्या या प्रश्नाने मी पुरता हादरून गेलो. रमेश हा गोव्यातील ‘बायणा’ या रेडलाईट वस्तीतला रहिवासी. तिथंच लहानाचा मोठा झालेला, वेश्येचा नातेवाईक म्हणून जीवन अनुभवलेला.

निरुत्तर

आयुष्यात आपल्याला कोणी असा प्रश्न विचारील, असे मला स्वप्नातही वाटले नव्हते. रमेशचा प्रश्न मला अंतर्मुख करून गेला.
गेल्या कित्येक वर्षांपासून मी सामाजिक कामात आहे. शेतकरी, कामगार यांच्यासोबत संघर्षात उतरलो आहे. जातीअंताच्या चळवळीशीदेखील मी संबंधित आहे. हे सर्व करत असताना मी स्वतःला शोषित कष्टकरी कामगार- शेतकरी यांपैकीच असे अभिमानाने म्हणवून घेत आलेलो आहे. दलितांशी नाते सांगायलाही मी कधी कचरलो नाही. पण रमेशच्या प्रश्नाचं उत्तर मला देता येईना.

कष्टकरी जसे शोषित आहेत, दलित जसे शोषित आहेत, तशाच वेश्यादेखील शोषित आहेत. मग त्यांच्याशी नाते सांगणे मला जड का जावे? याचा अर्थ माझ्या अंतर्मनात कोठेतरी मला त्या शोषित न वाटता, दोषी वाटत होत्या. मी कॉलेजात जाईपर्यंत वेश्या व्यवसायात गुंतलेल्या मुली या ‘वाईट चाली’च्या असे नकळत शिकलो होतो. (अनेक चुकीच्या गोष्टी नकळतपणे आपण शिकत असतो.) मेडिकल कॉलेजमध्ये पहिल्यांदा कम्युनिटी मेडिसिनच्या प्राध्यापक बाईंकडून वेश्यासाठी ‘कमर्शियल सेक्स वर्कर्स’ हा शब्द ऐकला. आणि वाईट चालीची मुलगी याऐवजी त्यांना लैंगिक कामगार समजू लागलो. आणि आपल्या विचारात खूप काही प्रागतिक बदल झाला असे वाटू लागले. पण रमेशने हा भ्रमदेखील फोडला. तो म्हणाला,

‘हे जर इतर कामासारखे काम वाटते, तर तुमच्या घरातल्या मुलीला हे काम करायला पाठवाल का? तुम्हीच म्हणता कोणतेही कष्ट करणे लाजिरवाणे नाही. मग पाठवाल तुमच्या घरातल्या मुलीला आमच्या आयाबहिणीसारखे तथाकथित कष्ट करायला?”

त्याच्या या प्रश्नाचेदेखील मी उत्तर देऊ शकलो नाही.

वेश्या समाजाची गरज?

मी जेव्हा रमेशने विचारलेल्या या प्रश्नांची माझ्या काही मित्रांशी चर्चा केली तेव्हा ते म्हणाले, “वेश्या ही समाजाची गरज आहे. वेश्याव्यवसाय नसेल तर घरंदाज बायकांवर बलात्कार होतील. सेक्स ही माणसाची गरज आहे. अविवाहित किंवा पत्नीपासून दूर राहणाऱ्या माणसासाठी लैंगिक भूक भागवण्याचा वेश्या हा एक मार्ग आहे.” माझ्या मित्रांचे हे विधान थोरामोठ्यानाही योग्य वाटते. वेश्या या घरंदाज बायकासमोरील ढाली असल्याचे एक मोठ्या महापुरुषाने म्हटल्याचे मी वाचले होते.
या मतावर रमेशचे उत्तर काय असेल असा मला प्रश्न पडला. पण मी त्याला असा प्रश्न विचारून दुखवू इच्छित नव्हतो. मग मीच स्वतःला रमेशच्या जागी कल्पून विचार करु लागलो की रमेशने काय उत्तर दिले असते.

जर या मुली बलात्कारांपासून समाजातील महिलांचे रक्षण करत असतील तर त्यांना सैनिकांचा दर्जा दिला पाहिजे आणि त्यांच्या बलिदानासाठी त्यांना अशोकचक्र दिले पाहिजे. आणि अशा महान कामासाठी घरंदाज मुलींनी पुढे यायला हवे. (वेश्या व्यवसायात अडकलेल्या मुलींपैकी तूरळक मुली वगळता बहुतांशी मुली कनिष्ठ समजल्या जाणाऱ्या जातीतील विशेषतः दलित आदिवासी समाजातील असतात.)

दुसरा प्रश्न येतो तो लैंगिक भुकेचा. पण वेश्याव्यवसायात फक्त पुरुषांच्या लैंगिक भुकेचा विचार होतो. स्त्रियांच्या लैंगिक भुकेचे काय? पण मुळात माणूस आणि प्राणी यात फरक आहे. प्राणी भूक, मैथुन याबाबत मनोनिग्रह राखू शकत नाही, पण संयम ही माणसाच्या मेंदूची विशेष क्षमता आहे. भूक लागली असतानाही माणूस हसऱ्या चेहऱ्याने उपाशी राहू शकतो. एवढेच नव्हे तर दुसऱ्याचा जीव वाचवण्यासाठी स्वतःच्या जीवाची आहुती देऊ शकतो.

‘पण काही लोकांना संयम पळता येत नसेल तर त्यांनी काय करावे?’ आणखी एका मित्राने शंका व्यक्त केली. जर एखाद्या पुरुषाला संयम पाळता येत नसेल तर ती त्याची समस्या झाली. त्याच्या समस्येसाठी एखाद्या मुलीला त्याच्या अनियंत्रित वासनेसाठी बळी देणे, योग्य आहे का? दुसरे म्हणजे एखाद्याला संयम पाळण्याची समस्या असेल तर त्याच्यावर उपचार करायला हवेत. त्याला त्याची लैंगिकता संयमात ठेवता येत नसेल तर ती त्याची विकृती आहे. ज्याला विकृती आहे, त्याच्यावर उपाय करावा की त्याच्या विकृतीसाठी निष्पाप मुलीला बळी द्यावे?

पुरुषांते पूर्वग्रहदूषित कल्पनारंजन

“पण एखाद्या मुलीला अतिलैंगिकता असल्यामुळे ती वेश्याव्यवसायात येत असल्याचे बोलले जाते, त्याचे काय?” आणखी एकाचा प्रश्न. “ही माहिती तुम्हाला कोणाकडून मिळाली? एखाद्या सर्वेतून मिळाली का? एखाद्या डॉक्टरच्या अभ्यासातून मिळाली का? की वेश्येकडे गिऱ्हाईक म्हणून जाऊन आलेल्या माणसाकडून मिळाली?” मी विचारले. ही माहिती पुरुषांच्या उथळ चर्चांमध्ये बोलली जाते. म्हणजे एक तर ते पुरुषांचे पूर्वग्रहदूषित कल्पनारंजन असते किंवा अश्लील पुस्तकातून रंगवलेले चित्र असते. मी असे सांगताच, एकाने आपल्या जवळ उपस्थित नसलेल्या मित्राची साक्ष देत सांगितले की, “तो मित्र अनेकदा वेश्यांकडे गिऱ्हाईक म्हणून जातो. आणि त्या त्याच्याशी एकदम मज्जेत वागतात.”

मुळात सेक्स विकत घ्यायला जाणारा माणूस त्या स्त्रीविषयी, तिच्या भावभावनांविषयी संवेदनशील असेल का? आणि आपल्याला विकत घ्यायला आलेल्या गिऱ्हाईकाला कोणती मुलगी आपले दुःख सांगेल? तो पैसे खर्च करून तिचे दुःख ऐकायला आलेला असतो का? याबाबत बोलताना अर्जचे संस्थापक संचालक अरुण पांडे म्हणाले,

“मी जेव्हा नॅशनल कमिशन फॉर विमेनसाठी 14 राज्यातील रेडलाईट भागांचा अभ्यास केला तेव्हा 75% मुलींना बालवयातच वेश्याव्यवसायात ढकलल्याचे आढळले. शिवाय हेदेखील लक्षात घेतले पाहिजे की मुलींना जेव्हा खुलेपणाने गिऱ्हाईकाकडे पाठवले जाते, तेव्हा त्या तिसऱ्या फेजमध्ये पोचलेल्या असतात.”

“तिसरी फेज म्हणजे?” मी विचारले.

” फेजेसवर बोलण्याआधी मी हा मुद्दा स्पष्ट करू इच्छितो की व्यभिचार आणि वेश्याव्यवसाय या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. दोन प्रौढ व्यक्तींनी एकमेकांच्या सहमतीने दोघांनाही एकमेकांविषयी शारीरिक आकर्षण वाटल्यामुळे शारीरिक संबंध ठेवले तर तो व्यभिचार. पण जिथे पैसे किंवा प्रमोशन किंवा इतर कोणत्याही गोष्टीच्या बदल्यात लैंगिक संबंध ठेवले जातात, तर तो वेश्याव्यवसाय किंवा देहविक्रय.”

टोकाचा विरोध ते टोकाची तडजोड

देहविक्रयात प्रथमच ढकललेली मुलगी सुरुवातीला पूर्ण विरोध करते. ती तिची रिजेक्शन फेज असते. या फेजमधील तिचा नकार मोडून काढण्यासाठी तिला वेश्याव्यवसायात ढकलणारी माणसे तिला कोंडून घालून अनेकांकडून बलात्कार करवून घेण्यापासून योनीमार्गात मसाला भरण्यासारखे क्रूर प्रकार केल्याचे अनुभव आहेत. जेव्हा आपल्या विरोधाला अजिबात न जुमानले जाण्याचा अनुभव येतो तेव्हा ती मुलगी निगोशिएशन फेजमध्ये पोचते. जिथे ती सुटण्यासाठी रदबदली करते. तडजोडी करण्याचा प्रयत्न करते. पण ताडजोडीनंतरदेखील सुटकेचा मार्ग दिसत नाही तेव्हा मग ती एक्सेपटन्स फेजमध्ये जाते. म्हणजे ती परिस्थिती हतबलतेने स्वीकारते. जेव्हा ती गिऱ्हाईकला भेटते तेव्हा तिच्या सुटकेविषयीच्या सर्व आशा मावळलेल्या असतात.

बाजारातील दुकानदारी

दुसरी ही गोष्ट लक्षात घ्यायला हवी की वेश्याव्यवसाय हा एक बाजार आहे. त्यातील वेश्या बनवण्यात आलेली मुलगी ही त्या व्यवसायातील विक्रीला ठेवलेली वस्तू असते. आणि तो बाजार चालवणारे अनेकजण असतात. भडवे असतात, घरवल्या असतात, मसाज पार्लरच्या नावाखाली राजरोस दुकाने उघडून बसलेले असतात, हॉटेलवाले- लोजिंगवाले असतात, रिक्षा- टॅक्सीवाले असतात, पोलिस असतात. वेश्याव्यवसायाच्या या सगळ्या लाभार्थींना वेश्या बनवण्यात आलेल्या मुलीने बाहेर पडावे असे वाटेल का? त्यांच्या दहशतीच्या विरोधात जाऊन ती आपले दुःख गिऱ्हाईकाला सांगेल का?”

अर्जने वेश्याव्यवसायात गुंतलेल्या मुलींची आत्मकथने ‘मंडी’ या डॉक्युमेंटरीद्वारे (DOCUMENTARY) प्रसिद्ध केलीत. त्यात एक महिला सांगते,

“रूम के बाहर मजा होता है, लेकीन रूम के अंदर सब सजा होता है. जो लोग अपने बीबी के साथ जो perverted चीजे कर नाही सकते, वो चीजे वो हमारे साथ करते है.”

त्यामुळे अतिलैंगिकतेमुळे मुली वेश्या बनतात हे गृहीतक चुकीचे आहे. उलट अनियंत्रित लैंगिक वासना असणाऱ्या पुरुषांच्यामुळे हा बाजार चालतो.

सत्तेचा माज कसा उतरणार?

इथे एक मुद्दा नमूद करतो, तो म्हणजे बलात्काराचा. बलात्कारामध्ये कृती जरी लैंगिक दिसत असली तरी त्यामागील प्रेरणा मात्र सत्तेची असते. वेश्यागमन करणाऱ्यांची मानसिकता आणि बलात्कार करणाऱ्यांची मानसिकता यात फरक आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. मुळात या दोन्ही गोष्टी पुरुषांच्या विकृती आहेत आणि त्यासाठी प्रत्येक घरात पुरुषावर संस्कार करायला हवेत. पण त्याऐवजी एखाद्या स्त्रीला वेश्या बनवण्याचे रॅशनलायजेशन करण्याकडे दिसणारा कल, अप्रत्यक्षपणे समाजातील कोणाही मुलीला वेश्या बनवण्यास अप्रत्यक्ष पाठिंबा देणारा असतो हे आपल्या लक्षातच येत नाही.

अर्ज संस्थेसोबत मी सुमारे वर्षभर काम केले. या वर्षभरात माझे अनेक पूर्वग्रह दूर झाले. सर्वात महत्वाचा मुद्दा माझ्या लक्षात आला तो म्हणजे वेश्याव्यवसायात अडकलेल्या मुलींना उपजीविकेचा पर्याय उपलब्ध करून दिला तर त्या बाहेर पडायला तत्पर असतात. अर्जने लॉंड्रिद्वारे जेव्हा काम उपलब्ध करून दिले तेव्हा महिनाकाठी 20 ते 25 हजार कमावणाऱ्या मुली जेमतेम 2 ते 2.5 हजार रुपयांवर कष्टाचं काम करू लागल्या.

देवदासी ते रेडलाईट

वेश्याव्यवसाय हा असा एक विचित्र बाजार आहे की ज्याने परिस्थितीप्रमाणे आपले स्वरूप बदलले. सरंजामी व्यवस्थेत तो देवदासीच्या स्वरूपात होता. नंतर रेडलाईट एरियाच्या रुपात आला, त्यानंतर मसाज पार्लर रुपात आणि आता तर ऑन लाईन रुपात सुरू आहे. ऑन लाईन व्यवसाय करवून घेणारे उघडपणे राजरोसपणे कॉन्टॅक्ट नंबर देऊन, दर सांगून, मुलींचे फोटो पाठवून धंदा करत आहेत. त्यांना कायद्याची, पोलिसांची भीती वाटत नाही. याबाबत मी पोलिसांना विचारले असता त्यांनी ऑनलाईन धंदा पकडण्यात असमर्थ असल्याचे सांगितले.

पोलिस जरी हतबल असल्याचे सांगत असले तरी अर्जसारखी संस्था मात्र गेली 23 वर्षे सातत्याने देहविक्रयाच्या विरोधात लढत आहे. हा पराकोटीच्या शोषित महिलांचा प्रश्न समजून घेऊ या आणि आपल्या संपर्कातील मंडळीचे प्रबोधन करूया.

हेही वाचा –

तब्बल 110 वर्षांपूर्वीची गोष्ट, ही गोष्ट आहे राजाराम पैंगीणकरांची…

शेवटी ‘मरे’ तरी ‘शाश्वत जिवंत’ कोकणी…

तेव्हा माणूसकीचा सुद्धा खून झाला…

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!