काय सांगता? खरंच या महिलेनं 78 वर्ष वीज वापरली नाही!

सिध्देश सावंत | प्रतिनिधी
मुंबईत वीज गेली म्हणून सोशल मीडियावर पोस्टी हाणणारे अनेक पाहायला मिळतील. त्यात मुंबईत वीज गेलेली असताना डोंबिवली आणि विरारमधलं पब्लिक वीज असल्यांना दोनशे ग्रॅम वजन वाढल्यासारखं झालं. वीज हा प्रत्येकासाठी महत्त्वाचा आणि कळीचा मुद्दा असला तरी महाराष्ट्रात एक अशी महिला जिने तब्बल 70 हून अधिक वर्ष वीजच वापरलेली नाही. खरंच यावर अनेकांचा विश्वास बसत नाही. पण हे खरंय. महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात राहणाऱ्या या महिलेबद्दल तुम्हाला माहीत आहे का? नसेल माहीत तर मग तुम्ही हे वाचलंच पाहिजे.
सकाळी उठल्यापासून ते अगदी रात्री झोपेतही आपल्याला वीज लागतेच लागते. माणसाचं आयुष्य विजेवर अवलंबून आहे असं म्हटलं तर त्यात काही वावगंही नाही. पण पुण्यात एक अशी महिला आहे, जिनं गेली 78 वर्ष वीजच वापरलेली नाही. या महिलेचं नाव आहे हेमा साने. हेमा साने या प्राध्यापिका आहेत.
घराभोवती जंगल, अनेक छोटेमोठे कीटक, प्राणी-पक्षी हे त्यांच्या कुटुंबाचे सदस्य आहे. मुख्य म्हणजे उभ्या आयुष्यात एकदाही त्यांनी वीज वापरलेली नाही. आहे की नाही कमाल?
प्राध्यपिका हेमा साने या तांबडी जोगेश्वरी मंदिराजवळ राहतात. त्यांच्या घराच्या बाजूला जंगलासारखाच भाग आहे. अगदी जंगलच आहे, असं म्हटलं तरी चालेल. तिथे वीज न वापरता त्या गेल्या गेली अनेक वर्ष राहत आहेत. गरज भासेल तेव्हा फक्त त्या सौरदिव्यांचा वापर करतात. पर्यावरणप्रेमी असल्यांन साने यांचं वनस्पती, झाडं, निसर्ग यावर नितांत प्रेम आहे. त्यामुळे त्यांच्या घरात जाताना पाऊलवाटेच्या आजूबाजूला भरपूर झाडे लावलेलीही दिसतात.
त्यांच्या घरात गेल्यानंतर तिथं वर्षानुवर्ष कुणी राहत असावं, यावरही कुणाचा विश्वास बसणार नाही. हेमा साने या 1962 ते 2000 या कालाधीत वनस्पतिशास्त्र शिकवत होत्या. कमळ, जास्वंद, पुण्यात असणारे दुर्मीळ वृक्ष, हिरवे मित्र, बुद्ध आणि बुद्ध परंपरा अशी अनेक पुस्तके त्यांनी लिहिलेली आहेत. विजेचा गैरवापर टाळण्यासाठी त्यांनी वीज न वापरण्याचाच निर्धार केलाय. छोटे प्राणी-कीटक, मांजर, कुत्रा हे त्यांचे सध्याचे फॅमिली मेम्बर्स. एक वृत्तपत्र प्रतिनिधीशी बोलताना
हेमा साने यांनी म्हटलं होतं की…
आपण पर्यावरण, विजेचा बेसुमार वापर करत आहोत, याची कोणालाच कल्पना नाही. त्याचप्रमाणे जगात कोणालाही आदर राहिलेला नाही. त्यामुळे मी फारशी घराबाहेर जात नाही. माझ्याकडे बघून अनेक जण मला भिकारी समजतील. परंतु मी कशाचाच विचार न करता माझे आयुष्य जगते.
निसर्ग सुंदर आहे. अफाट आहे. आपण त्यांची किंमत केली नाही, तर तोही आपली किंमत करणार नाही, हे वेळोवेळी सिद्ध होतं. नैसर्गिक आपत्ती, प्रदूषणं, अशा सतराशे साठ समस्या माणसानेच तयार केल्यात. त्याची किंमत आज लोकांना मोजावी लागतेच आहे. अशात हेमा सानेंसारखी माणसं आपल्याला पुन्हा जगण्याची दिशा देण्याचं काम करत आहेत. काही लोकं त्यांच्या जगण्याची थट्टा मस्करी करत असावीत. पण एक वेळ अशीही येऊ शकेल की सगळं सोडून माणसाला फक्त जंगलातच राहावं लागेल, तेव्हा त्यांना हेमा सानेंसारखी माणसं लख्खपणे आठवतील, हे नक्की.