अबब! हे काय गोवा अद्याप महाराष्ट्राचा जिल्हा ?

गोवा मुक्ती हिरक महोत्सवी वर्षात असाही सवाल

किशोर नाईक गावकर, संपादक | प्रतिनिधी

एकीकडे देशातलं सगळ्यात लहान आणि छोटं राज्य म्हणून गोव्यावर कौतुकाचा वर्षाव करायचा. देश स्वातंत्र्य होऊन 14 वर्षांनी मुक्ती मिळूनही गोव्याने साधलेल्या प्रगतीचे गुणगान गायचे आणि दुसरीकडे मात्र लहान राज्य म्हणून गोव्याची वेगळी ओळख करून देणे परवडत नाही,असे म्हणून गोव्याला शेजारील महाराष्ट्राच्या हद्दीतील एक जिल्हा म्हणून वागवायचं. केंद्राच्या या दुटप्पी धोरणाला आता गोवा मुक्ती हिरक महोत्सवाच्या निमित्ताने नव्याने उजाळा मिळालाय. केंद्रीय क्रीडा आणि युवा व्यवहार मंत्रालयातर्फे भरविण्यात येणाऱ्या युवा संसद स्पर्धेत यंदाही गोव्याला स्वतंत्र राज्याचं स्थान देता महाराष्ट्राच्यावतीनेच प्रतिनिधीत्व देण्याचा घाट सुरू आहे.

पंतप्रधान मोदींची संकल्पना

देशाच्या जडणघडणीत आणि वेगवेगळ्या विकास आणि धोरणात्मक निर्णयांत युवकांच्या कल्पना आणि सृजनतेला वाव मिळावा या हेतूने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युवा संसद ही संकल्पना राबवली. या संकल्पनेअंतर्गत केंद्रीय क्रीडा आणि युवा व्यवहार मंत्रालय राज्यांतर्गत नेहरू युवा केंद्रांच्या सहाय्याने जिल्हास्तरापासून युवा संसद स्पर्धा भरवली जाते. जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय अशा टप्प्यातून युवा प्रतिनिधींची निवड केली जाते.

विशेष म्हणजे राज्यांतून राष्ट्रीय स्तरावर निवड झालेल्या युवा संसद प्रतिनिधीला नवी दिल्लीत सेंट्रल हॉलमध्ये पंतप्रधान आणि इतर दिग्गजांसमोर भाषण करण्याची संधी मिळते आणि कोणत्याही राज्यासाठी ती एक अभिमानाची गोष्ट ठरते. गोव्यातील प्रतिनिधींना मात्र महाराष्ट्राच्या इतर 35 जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी स्पर्धा करावी लागते आणि त्यातून आपोआप गोव्याचा युवा प्रतिनिधी राष्ट्रीय स्तरावर चमकण्यापासून वंचित राहतो. गोव्यातील युवा संसदपटूंना प्रतिनिधीत्व करण्याची संधी प्राप्त होते, पण भाषण करण्याची संधी मात्र मिळत नाही.

गोव्यातील युवकांवर अन्याय

गोव्यात नेहरू युवा केंद्र कार्यरत आहे. परंतु हे केंद्र महाराष्ट्र नेहरू युवा केंद्राशी संलग्न आहे. महाराष्ट्राच्या एका क्षेत्राशी संबंधीत असलेल्या गोव्यात पणजी आणि मडगाव असे दोन विभाग आहेत. गोव्याला घटक राज्याचा दर्जा मिळाला असला तरी टपाल खाते आणि नेहरू युवा केंद्र मात्र महाराष्ट्राशी संलग्नीत आहेत.

उर्वरीत छोट्या राज्यांचाही अशाच पद्धतीने बड्या राज्यांत समावेश केल्याची खबर आहे. गोवा हे शिक्षण, विकास तसेच इतर क्षेत्रात आघाडीवर असल्याने युवा संसद स्पर्धेच्या निमित्ताने गोव्यातील युवकांना राष्ट्रीय स्तरावर चमकण्याची संधी यातून मिळू शकते परंतु स्वतंत्र राज्य म्हणून गोव्याला मान्यता मिळाली नसल्याने गोंयकार युवकांची ही संधी हुकतेय.

डॉ. सावंत, नेहरू युवा केंद्राचे प्रॉडक्ट

गोव्याचे युवा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे नेहरू युवा केंद्राचे प्रॉडक्ट आहेत. गोव्यातील नेहरू युवा केंद्राचे जिल्हा युवा समन्वयक कालिदास घाटवळ हे नेहमीच ही गोष्ट अभिमानाने सांगतात. गत साली युवा संसद स्पर्धेच्या निमित्ताने हा विषय उपस्थित झाला असता मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पुढील वर्षी गोव्याला स्वतंत्र राज्य म्हणून मान्यता मिळेल,असे वचन दिले होते. नवीन वर्ष उजाडले आणि स्पर्धेला सुरूवातही झालीय, पण गोव्याच्या स्वतंत्र व्यवस्थेबाबत मात्र अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही.

सेंट्रल हॉलमध्ये युवा संसद महोत्सवात गोव्याचं प्रतिनिधित्व करताना कृष्णा पालयेकर

कृष्णा पालयेकर गरजले

गत साली राष्ट्रीय युवा संसद महोत्सवात गोव्याचं प्रतिनिधीत्व करण्याची संधी पेडणे तालुक्यातील युवक कृष्णा पालयेकर याला मिळाली होती. त्याने गोव्यावरील या अन्यायाबाबत केंद्रीय क्रीडा आणि युवा व्यवहारमंत्री राज्यवर्धन राठोड यांच्यासमोर ही गोष्ट मांडली होती. राठोड यांनीही सकारात्मक प्रतिसाद देऊन गोव्यावरील हा अन्याय दूर करू,असे वचन दिले होते. पुढे मात्र काहीच झाले नाही.

गोवा फॉरवर्डचा फॉलोअप चुकला

दिल्लीत गोव्याला युवा संसदेत स्वतंत्र अस्तित्व मिळायलाच हवं असं म्हणून गोवा फॉरवर्ड पक्षानं हा विषय हाती घेतला होता. गत साली युवा संसद स्पर्धेत निवड झालेल्या कृष्णा पालयेकर आणि व्हिर्जिनिया डिमेलो यांचा सत्कारही पक्षानं घडवू आणला होता. केंद्र सरकारकडे तसे लिखित पत्रही पाठवलं होतं. परंतु दुर्दैवानं या गोष्टीचा फॉलोअप मात्र झाला नसल्यानं हा विषय अद्यापही अनिर्णित राहीलाय.

गोवन वार्ताने गत साली दिलेलं वृत्त

यंदाचे मानकरी

युवा संसद महोत्सवासाठी यंदा अलिकडेच जिल्हास्तरीय स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत उत्तरेतून राजू गांवस आणि दक्षिणेतून स्वाती मिश्रा यांची निवड झालीय. उत्तरेतून प्रियंका कदम आणि दक्षिणेतून प्रेम कुमार उपविजेते ठरलेत. या चौघांनाही आता राज्य स्तरावर स्पर्धा करावी लागेल. तिथून तिघांची निवड होऊन ते राष्ट्रीय स्तरावर गोव्याचं प्रतिनिधीत्व करणार आहेत.

या तिघांपैकी एकट्याला नवी दिल्लीत सेंट्रल हॉल येथे आयोजित होणाऱ्या राष्ट्रीय युवा महोत्सवात बोलण्याची संधी प्राप्त होईल, पण त्यासाठी त्यांना महाराष्ट्रातल्या 35 जिल्ह्यातून निवड झालेल्या स्पर्धकांशी दोन हात करावे लागणार आहेत.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!