शेवटी ‘मरे’ तरी ‘शाश्वत जिवंत’ कोकणी…

विश्वनाथ नेने | प्रतिनिधी
पणजीः कोकणी. गोंयकारांची फक्त भाषाच नाही तर ती इथली जीवन पद्धती आहे. तो इथला स्वभाव आहे. ती इथल्या स्वतंत्र अस्तित्त्वाची ओळख आहे. इथे मांडवीला दोन समृद्ध तीर. कोकणी आणि मराठीच्या तीरांमध्ये अखंड प्रवाहित आमची मांडवी. मी या बाबतीत एवढंच म्हणेन की जो श्रीखंड खातो त्याला श्रीखंडाची गोडी कळते जो नुस्ते खातो त्याला नुस्त्याची रुच कळते. गोवेकर त्याबाबतीत भाग्यवान. मात्र गोव्याचे वेगळे अस्तित्व दाखवणारा आणी टिकवणारा महत्त्वाचा एकमेव घटक म्हणजे कोकणी.
गोव्याचे समुद्र किनारे, इथलं पश्चिम घाटाचं सौंदर्य, इथल्या चर्चेस, देवळं, मशिदी ही पर्यटनाची आकर्षणाची केंद्रं आहेतच. पण याला साथ लाभली आहे ती गोवेकरांच्या कोकणी स्वभावाची. त्यांच्या आदरतिथ्याची, आणि म्हणूनच देशातल्या इतर राज्यांपेक्षा पर्यटकांचं सर्वांत सुरक्षित पर्यटन स्थळ म्हणजे गोवा.
गोव्याचा शिमगोत्सव आणि कार्निव्हल हे दोन लोकोत्सवच. सातेरी, केळबाय, भूमिका, आजोबा, लईराई ही इथली लोकदैवतं. शिगम्याच्या काळात फेणी आणि हुर्राकाचे घोट घेऊन दिवसभर झिंगत शबय घालणारा इथला गोंयकार कोकणी माणूस आणि श्रावण सुरु झाल्यापासून ते गणपतीच्या विसर्जनापर्यंत दारुला चुकूनही स्पर्श न करणारा, पूर्ण शाकाहार घेणाराही तोच गोंयकार कोकणी माणूस. गोंयकार हा एकच पण इथल्या प्रथा, परंपरा, संस्कृती आणि चालीरीती मात्र विभिन्न. आणि या विभिन्न घटकांची एकत्र मूठ बांधणारा धागा म्हणजे इथली कोकणी.
गणेश चतुर्थी म्हणजेच ‘चवथ’ गोंयकारांचा सर्वांत मोठा उमेदीचा आणि चैतन्याचा उत्सव. चतुर्थीला प्रत्येक घरात सुखकर्ता-दुखहर्ता, लवथवती विक्राळा, दुर्गे दुर्घट भारी या आणि अशा अनेक मराठी संतांच्या आरत्या म्हटल्या जातात. मात्र जर या आरत्यांना कोकणी घुमटाची, शामेळाची, कासाळ्याची साथ नसेल तर गोव्याची चवथ ती कसली? म्हणून चवथीच्या काही दिवस आधी चर्चा आणी तयारी सुरु असते ती घुमट साजयला मरे? शामेळ साजयला मरे? याची. गोव्याची संस्कृती, गोव्याची ओळख जिवंत आहे आणि किंबहुना जिवंत राहणार ती शेवटच्या ‘मरे’ प्रत्ययामुळेच.
‘तियात्र’. राजकीय आणि सामाजिक परिस्थितीवर तात्काळ आणि प्रखर भाष्य करणारा गोव्यातील नाट्य प्रकार. तियात्रातील कातारांनी कित्येक राजकीय आणि सामाजिक अपप्रवृत्तींचे पत्ते जसे कात्रीने कापावेत तसे कापल्याचा आजवरचा इतिहास आहे. लोकशाहीत सामाजिक आणि खासकरून राजकीय प्रवृत्तींवर अंकुश ठेवण्याच्या ताकदीची नाट्य कला. चल आज तियात्राक या मरे? असं म्हणून बाहेर पडलेला गोंयकार ज्यावेळी तियात्र बघून घरी येतो तेव्हा त्याच्या मनात अपप्रवृत्तींविरुद्ध निर्माण झालेली चीड ही लोकशाहीच्या जिवंतपणाचीच लक्षणे असतात.
म्हणूनच एकंदर सारासार विचार केला तर कोकणीच्या ‘मरे’ मुळे फक्त भाषाच नव्हे तर इथली संस्कृती, इथला कोकणी स्वभाव आणि पर्यायाने गोव्याचं स्वतंत्र अस्तित्व अबाधित आहे यात तीळमात्र शंका नाही. आणि म्हणूनच कोकणीचे आद्यपुरुष शणै गोंयबाब ह्यांनी सांगितल्या प्रमाणे
गोंय आमचें मूळ पीठ, कोकणी आमची भास
कोकणी संस्कृताय आमचें जाण्ट्याली मिरास