नातं गोव्याचं, देणं मराठीचं | चला संवाद साजरा करु!

भाषा, वर्ण, जात- पात, धर्म आदींच्या पल्याड मानवतेचे शिखर गाठण्यासाठीच आम्ही या नव्या अवतारात पदार्पण करीत आहोत. या वाटचालीत आपणा सर्वांची साथ अत्यंत महत्वाची आहे.

किशोर नाईक गावकर, संपादक | प्रतिनिधी

पणजी : गोवन वार्ता लाईव्ह मराठी महाचॅनलच्या वेबसाईटचे लोकार्पण होत असताना मला अत्यंत आनंद होत आहे. 1 ऑक्टोबर 2020 रोजी श्री दत्त पद्मनाभ पीठ, तपोभूमीचे पीठाधीश प. पू. ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजींच्या शुभहस्ते या संकेतस्थळाचं आणि महाचॅनलच्या प्रोमोचं लोकार्पण होणं हा आमच्यासाठी अत्यंत शुभ असा योग ठरला. प्रत्यक्ष महाचॅनलसाठी आता अवघे दिवसच आपल्याला वाट पाहावी लागेल.

संकल्प नव्या नात्याचा

गोमंतभूमी ही देवभूमी आहे. या पवित्र देवभूमीचं आध्यात्मिक, सांस्कृतिक, सामाजिक संचिताची समस्त विश्वाला ओळख करून देण्याचा संकल्प आम्ही केला आहे. आम्ही गोव्याचं समस्त विश्वाकडे एक नवं नातं जोडण्यासाठी आलो आहोत आणि हे नातं मराठीच्या धाग्यानं जोडलं जाणार आहे.

गोमंतकाचे आद्य मराठी कवी कृष्णादास श्यामा यांच्या काव्यवेलीवर बहरलेली, फादर थॉमस स्टीफनसनच्या ख्रिस्त पुराणात रमलेली, भारतकार गो. पुं. हेगडे देसाई यांच्या जाज्वल्य पत्रकारितेत तलवारीसम तळपलेली, क्रांतीवीर दीपाजी राणे यांच्या पराक्रमाने उजळलेली, हिराबाई पेडणेकर आणि रघुनाथ शेट सावंत यांच्या नाट्यलेखनात रंगलेली, कृष्णंभट बांदकर यांच्या संगीत रंगभूमीवर अवतरलेली मराठी म्हणजे गोव्याचे प्राचीन सांस्कृतिक संचित आहे. 450 वर्षांच्या पोर्तुगीज राजवटीत देखील येथील मराठीने देशी स्वत्वाचे भान आणि स्वसंस्कृतीची जाण कायम जागी ठेवण्याचं काम केले. गोमंतकीयांचा आत्माभिमान, राखण्याचं ऐतिहासिक कार्य मराठी सदैव करीत आली आहे आणि नेहमीच करेल.

भाषेची पाळंमुळं

भाषा हे समाजाला चैतन्य देणारे साधन असते. आज आपल्या अवतीभोवती जुन्या समस्या संपलेल्या नाहीत आणि नव्यांचा गुंता वाढतो आहे. विज्ञान, तंत्रज्ञानाची प्रगती आणि त्यांचा वेग प्रचंड आहे. पण तरीही मनःशांती नाही. अशा वातावरणात भाषा आणि संस्कृतीचे देणेच आपल्याला माणूस म्हणून का जगावे याचे भान आणून देते. जीवन जगण्याच्या नव्या शाश्वतांचे आव्हान स्विकारत नव्या पिढीला सुसंगत भविष्य घडविण्याचा ध्यास हाच आमचा नित्य प्रयास असेल. गोव्याच्या नवनिर्माणाचा पाया रचण्यासाठीच आम्ही कार्यरत राहणार आहोत. आम्हाला फक्त आणि फक्त प्रेम, बंधुत्व, मानवतेचे बी रोवायचे आहे. माणूस ही संकल्पनाच आमच्यासाठी सर्वोत्तम असेल आणि या समस्त विश्वाचे कल्याण हेच आमचे ब्रिद असणार आहे.

वीरांना मानाचा मुजरा

पोर्तुगीज सालाझारशाहीच्या जोखडातून या गोमंतभूमीला मुक्ती मिळवून देण्याच्या यज्ञकुंडात 74 हुतात्म्यांच्या समिधांची आहुती दिली आहे. ह्यात 35 गोमंतकीय तर मध्यप्रदेश-6, महाराष्ट्र-7, राजस्थान-1, कर्नाटक-5, आंध्रप्रदेश-5, पश्चिम बंगाल-3, बिहार-1, पंजाब-1, हिमाचल प्रदेश- 1, उत्तर प्रदेश-1, उत्तर प्रदेश-1, दमण-3, बांगलादेश-1 आणि 3 अज्ञात स्वातंत्र्यसैनिकांचा समावेश आहे. या शूरविरांचे ऋण आम्हाला फेडायचे आहे. या पवित्र भूमीची जगाला ओळख करून देतानाच या भूमीच्या भवितव्याला योग्य दिशा मिळावी, नव्या गोव्याच्या बिजाला आदर्शतेचा अंकुर फुटावा ही इच्छा बाळगूनच आम्ही कार्यतत्पर राहणार आहोत. सर्वांत आधी आणि सर्वप्रथम बातमी देणं यापेक्षा विश्वासार्ह बातमी देणं हे कधीही महत्वाचं. गोव्याला भेडसावणारे असंख्य विषय, गोव्याच्या प्रगतीत आणि विकासात अडथळे निर्माण करणारे प्रश्न यांची सोडवणूक कशी होईल याचा मार्ग शोधून काढून प्रशासनाला जागं करण्याचं काम आम्ही करणार आहोतच. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं एक नवं व्यासपीठ म्हणून आम्ही पुढे आलो आहोत आणि या व्यासपीठाचा केवळ सकारात्मकतेसाठीच उपयोग होईल याची हमी आम्ही देणार आहोत.

मराठीचा गोमंतकीय बाज

आमचं संकेतस्थळ हे खास गोमंतकीय बाज घेऊन आलंय. ह्यात ग्रामीण तथा शहरी गोव्याचं दर्शन तर घडेलच पण त्याचबरोबर या वेबसाईटच्या माध्यमाने गोंयकार जगाशी जोडला जाणार आहे. देशात आणि विदेशात आपल्या मायभूमीची आस ठेऊन असलेल्या गोंयकारासाठी तर हे गोवनवार्तालाईव्ह.कॉम एक अमुल्य भेटच ठरणार आहे. कला, संस्कृती, शिक्षण, आरोग्य, नोकरी, व्यवसाय, अर्थकारण, राजकारण हे विषय तर असणार आहेतच पण त्याचबरोबर गोव्याचं स्वतंत्र गोंयकारपण अधोरेखीत होणार आहे.

संवाद साजरा करुया

संकेतस्थळाचे हेच ब्रीद महाचॅनल देखील जपणार आहे. सर्व वादांच्या बाहेर जाऊन आम्हाला फक्त संवाद साधायचा आहे. भाषा, वर्ण, जात- पात, धर्म आदींच्या पल्याड मानवतेचे शिखर गाठण्यासाठीच आम्ही या नव्या अवतारात पदार्पण करीत आहोत. या वाटचालीत आपणा सर्वांची साथ अत्यंत महत्वाची आहे. आपला पाठींबा आणि आपले सहकार्य अपेक्षित आहे. हे व्यासपीठ तुमचं प्रत्येकाचं आहे आणि तुम्हीच या व्यासपीठाला यशाचे शिखर गाठून द्यायचे आहे. चला तर मग… एका नव्या नात्याला सुरूवात करू…. वाद खूप झाले. चला संवाद साजरा करु…

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!