सविस्तर | आपल्या मुलांचा जीव मोबाईलच्या किंमतीएवढा झालाय का?

दहावीच्या मुलाने आत्महत्या केल्याचं कारण हारदवून टाकणारं आहे!

सिध्देश सावंत | प्रतिनिधी

ब्युरो : सत्तरीमध्ये दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यानं आत्महत्या केल्याची घटना घडली. जे प्राथमिक कारण या घटनेत समोर आलं आहे ते हादरवून टाकणारंय. मोबाईलसाठी दहावीच्या मुलानं आत्महत्या करणं, गोव्यासारख्या राज्यासाठी लांच्छनास्पद आहे, असा सूर उमटू लागलाय.

नेमकी घटना काय?

सत्तरी तालुक्यात पाली गाव आहे. या गावात १५ ऑक्टोबरची सकाळ नेहमीसारखी होती. पण आज काहीतरी खळबळजनक घडणारे, असं पाली-सत्तरीत कुणाला स्वप्नातही वाटलं नसेल. याच गावात दहावीत शिकणारा एक मुलगा ठाणे-सत्तरीतल्या सरकारी हायस्कूलमध्ये शिकत होता. शाळा बंद असल्यानं सध्या ऑनलाईन शिक्षण सुरु आहे. एका वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार आत्महत्या केलेल्या मुलाच्या वडिलांनी या घडनेची हकीकत सांगितलीये.

सकाळी या मुलाचे वडील कामावर जायला निघाले. तेव्हा दहावीत शिकणाऱ्या या मुलाने मोबाईल दुरुस्तीसाठी पैसे मागितले. पण तेव्हा या मुलाच्या वडीलांकडे पैसे नव्हते. म्हणून त्यांनी त्याची समजूत काढली. आता पैसे नाहीत, चार दिवसांनी देतो, असं वडीलांनी मुलाला सांगितलं. या मुलाचे वडील खासगी बसचे ड्रायव्हर म्हणून काम करतात. करोनामुळे ठप्प झालेल्या अर्थचक्राची झळ या बसड्रायवर असलेल्या वडीलांच्या संपूर्ण कुटुंबाला बसली. पैसे नाहीत हे वडीलांचं उत्तर ऐकून मुलाला राग झाला. रागाच्या भरात मुलानं खराब झालेला मोबाईल भिंतीवर भिरकावला. मुलाच्या या कृत्यावर स्वाभाविकपणे वडील भडकले. पण नवीन मोबाईल घेऊन देतो, असं सांगत त्यांनी मुलाला आश्वस्त केलं आणि ते कामावर निघून गेले.

पाहा व्हिडीओ

आणि दुःखाचा डोंगर कोसळला

पण पुढच्या दोन तासांतच भयंकर बातमी वडलांच्या कानावर आली. आपल्या पोटच्या पोराने मोबाईलसाठी गळफास घेऊन आत्महत्या केलीये, हे ऐकल्यानंतर वडलांच्या पायाखालची जमिनच सरकली. यानंतर आत्महत्या केलेल्या मुलाच्या आईवडिलांची काय अवस्था झाली असेल, याची आपण कल्पनाही करु शकत नाही. ते दुःख, त्यांची मानसिकता, त्यांची काय अवस्था झाली असेल, हे आपल्याला तोपर्यंत कळणारच नाही, जोपर्यंत ही अशी घटना आपल्यासोबत घडत नाही. मुळात ही अशी घटना घडायलाच नको.

ऑनलाईन शिक्षण घेताना मुलांचे देशभरात काय हाल होत आहेत, याच्या बातम्या वेळोवेळी समोर येतात. मोबाईलला रेंज मिळत नाही, म्हणून काय मनस्ताप मुलांना भोगावा लागतोय, याचीही कल्पना फारशी कुणाला नाही. ऑनलाईन एज्युकेशन हा शब्द ऐकायला छान वाटतो. पण ऑनलाईन एज्युकेशनसाठी पुरेपूर यंत्रणा संपूर्ण पातळीवर आहे का? याचा सरकार लवकरच विचार करेल, अशी अपेक्षा बाळगुयात. पण याचा तुम्ही आम्ही माणूस म्हणून विचार करणार आहोत का? हा खरा प्रश्न आहे.

कदाचित या मुलाच्या आत्महत्येचं कारण दुसरं काहीतरी आहे, असंही भविष्यात समोर येऊ शकतं. मात्र प्राथमिक माहिती जी मिळते, ती अस्वस्थ करायला लावणारी आहे. त्यामुळे किमान गोव्यासारख्या राज्याला ही घटना शोभनीय नक्कीच नाही.

संवेदना मेल्या आहेत का?

गोव्यामध्ये सगळेच श्रीमंत आहेत, अशातला भाग नक्कीच नाही. पण सगळेच गरीब आहेत, असंही मुळीच नाही. अनेकदा ऑनलाईन शिक्षणासाठी शैक्षणिक धोरणांवर टीका केली जाते. सरकार आणि प्रशासनावर खापर फोडून सगळी जबाबदारी झटकली जाते. पण पाली-सत्तरीत विद्यार्थ्यानं मोबाईलसाठी जीव दिला, या घटनेनं कुणीच हळहळत नाही, हे जास्त धक्कादायक नाही का?

राजकारण्यांनी काय करायला हवं आणि नको, हा मुद्दा काही वेळासाठी बाजूला ठेवून गोयकार म्हणून पाली-सत्तरीतील विद्यार्थ्यांच्या आत्महत्येकडे आपण बघणार आहोत की नाही? स्थानिक आमदार, राजकीय पुढारी, नेतेमंडळी यांना आठ दहा हजाराचा मोबाईल विद्यार्थ्यांना घेऊन देणं, काही मोठी गोष्ट नक्कीच नाही. पण एक समाज म्हणून तुम्ही आम्ही जर अशा आत्महत्येमुळे अस्वस्थ होत नसू, तर मात्र खरा गंभीर प्रश्न भविष्यात उभा राहणार, हे नक्की.

भीषण वास्तवात आपली जबाबदारी काय?

आपल्या आजूबाजूला मुलं रेंज मिळेल त्या ठिकाणी जाऊन ऑनलाईन वर्ग अटेंड करताएत. तसे काही फोटोही वेळोवेळी समोर येतात. या मुलांसाठी एकच वायफाय हॉटस्पॉट बनवून देणं, शक्य नाही का? थोडेफार पैसे कॉन्ट्रीब्यूट करुन ही गोष्ट करता येऊ शकत नाही का? स्मार्टफोन अभावी गरजू मुलांना शिक्षणाला मुकावं लागतंय. यावर तुम्ही आम्ही आपण आपआपल्या लेव्हलवर काय मदत करु शकतो, याचा कुणीच विचार न करणं, हे जास्त भीषण आहे.

मित्रांनो, पैसे आज आहेत, तर उद्या नाहीत. उद्या नसतील तर परवा कमवता येऊ शकतील. पण जिवाचं काय? आपल्या नजरेपुढे लहानाचं मोठं झालेलं लेकरु मोबाईलसाठी जर आपला जीव देत असेल, तर त्याच्या जिवाची किंमत ही एका ८-१० हजाराच्या स्मार्टफोन एवढी होणं, हे लांच्छनास्पद नाही का? करोनामुळे अनेकांची आर्थिक घडी बिघडली आहे. अशांना माणूस म्हणून उभं राहायला आपण सढळ हातानं मदत करायला हवी.

चैन्नईतही एक विचित्र घटना समोर आली. ऑनलाईन शिक्षण घ्यायला पैसे नाहीत, म्हणून एका अल्पवयीन मुलानं मोबाईलची चोरी केली. पोलिसांनी मोठ्या शिताफीनं या चोराला पकडलं. पण जेव्हा चोरीचं कारण कळलं तेव्हा त्या पोलिसांनी चोरी केलेल्या अल्पवयीन मुलाला स्वतःची पदरमोड करुन मोबाईल गिफ्ट केला. १३ वर्षांच्या या मुलाला पोलिसांनी गुन्हेगारीपासून परावृत्त करण्यास मोठी मदत केली, असंच म्हणावं लागेल.

एका मुलाला मोबाईल घेऊन देणं चेन्नई पोलिसांना शक्य आहे. पण अशी कित्येक मुलं देशाच्या कानाकोपऱ्यात आहे, ज्यांचं शिक्षण मोबाईल नाही म्हणून अडलंय. गोव्यातही काही वेगळी परिस्थिती नाही. पाली सत्तरीत दहावीच्या विद्यार्थ्यानं केलेली आत्महत्या वरवर लोकांना महत्त्वाची वाटत नसेल कदाचित. पण भविष्यात अशा घटना वाढण्याची भीतीही नाकारता येत नाही. भविष्यातील आत्महत्या रोखायच्या असतील तर आताच पावलं उचलावी लागतील. आपल्या विद्यार्थ्यांना, आपल्या मुलांना वाचवायचं असेल, तर आपल्याला त्यांच्या जिवाची किंमत मोबाईलच्या किंमतीएवढी नक्कीच होऊ द्यायची नाही.. प्रत्येकच आई-बाबा आजच्या घडीला आर्थिकदृष्ट्या सक्षम असतीलच असंही नाही. जे नाहीत, त्यांना मदतीचा हात देणं, इतकं तरी आपण करुच शकतो. किमान त्यासाठी प्रयत्न करु शकतो.

एक हात मदतीचा

सरकार काहीतरी करेल, अशी वाट बघत जर आपण बसणार असू… तर मात्र कठीण आहे. आपल्या प्रत्येकाला माणूस म्हणून.. गोयकार म्हणून गावागावातील, वाड्यावस्तीवरील प्रत्येक विद्यार्थ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहण्याची हीच खरी वेळंय. पाली-सत्तरीत आत्महत्या केलेल्या मुलाचा जीव तर आपण परत आणू शकत नाही. पण अजूनकुणी मोबाईलसाठी जीव देणार नाही, याची खबरदारी तरी नक्कीच घेऊ शकतो. हो ना? चला तर.. ज्यांना अशा विद्यार्थ्यांना मदत करायची आहे. त्यांनी आम्हाला संपर्क करा. (संपर्कासाठी नंबर – गोवनवार्ता लाईव्ह – 08010541136) आपण मिळून या सर्व विद्यार्थ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहण्याचा प्रामाणिक प्रयत्न करु.

पाहा व्हिडीओ –

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!