महागाईने लावला सर्वसामान्यांच्या बजेटमध्ये सुरुंग ! आता पावसामुळे इतर भाज्या देखील महागल्या

ऋषभ | प्रतिनिधी
वेबडेस्क 23 जुलै : सध्या संपूर्ण देशात पावसाने जोर धरला आहे. परिणामी अनेक भागात पूरामुळे शेतमालाचे नुकसान झाले आहे. पूर आणि पावसामुळे सखल भागात राहणाऱ्या लोकांचे जनजीवन तर पूर्णतः विस्कळीत झाले आहे.

वाढत्या महागाईमुळे भाजीपाला, फळे, मसाले, डाळींच्या किमतीमुळे लोकांची चव आणि मूड बिघडला आहे. गेल्या 1 महिन्यात सर्वच भाजीपाल्याचे भाव 20 ते 40 टक्क्यांनी वाढले आहेत. त्यामुळे गृहिणींच्याही बजेटला ग्रहण लागले आहे.
गोव्यासह उत्तर कर्नाटकात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस आणि त्यानंतर आलेल्या पुरामुळे भाज्यांच्या पुरवठ्यावर सर्वाधिक परिणाम झाला आहे. त्यामुळेच एरव्ही स्वस्त मिळणाऱ्या भाज्या देखील आता चढत्या दराने विकत घ्यावे लागल्याने गृहीणींचे बजेट पार कोलमडले आहे. बेळगावसह जेथून गोव्यात भाजीपाला पुरवला जातो अशा अनेक भागात भाजीपाला आणि इतर गोष्टींची लागवड पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे, ज्यामुळे भाज्या आणि फळांचे भाव गगनाला भिडले आहेत.

वाढत्या महागाई आणि दरामुळे भाजीपाला आणि फळेच नव्हे तर किराणा दुकानात ठेवलेला मालही लोकांच्या आवाक्याबाहेर गेला आहे. यासह, लोकांच्या घरापर्यंत सामान पोहोचवणाऱ्या अनेक अॅप्सवर भाजीपाला आणि फळांच्या किमती बाहेर उपलब्ध असलेल्या वस्तूंपेक्षा जास्त दराने विकत आहेत.
मसाल्यांच्या दरातही वाढ –
भाज्यांबरोबरच मसाले, तेलही आवाक्याबाहेर असल्याचे दिसून येत आहे. मसाल्यांच्या किमतीतही सातत्याने वाढ होत असून खाद्यतेल, मीठ, साखर यासारख्या वस्तूही आता महाग होत आहेत. मसाल्यांच्या प्रति 100 ग्रॅमच्या किंमती 10 ते 20 टक्क्यांनी सतत वाढत आहेत. ज्यात पूर्वी 30 रुपये किमतीची हळद आता 34 रुपये झाली आहे. तर लाल मिरची 60 ते 66 रुपये, जिरे 90 ते 78 आणि गरम मसाले 100 ते 110 रुपयांवर पोहोचले आहेत.

यासोबतच तेल, मीठ, साखरेबाबत बोलायचे झाले तर त्यांच्या किमतीही सातत्याने वाढल्या आहेत. मोहरीचे तेल 150 ते 165 ते 170 रुपये प्रतिलिटर झाले आहे. जे मीठ 24 रुपये पाकिटाला मिळायचे ते आता 30 आणि 35 रुपयांचे पाकिट झाले आहे. एकंदरीत महागाईने सामान्य जनतेचं जगणं मुश्किल करून ठेवलंय.