‘गोवन वार्ता लाईव्ह’चं थाटात महालाँचिंग

सचिन खुटवळकर | प्रतिनिधी
पणजी : ‘नातं गोव्याचं, देणं मराठीचं’ हे ब्रिदवाक्य घेउन फोमेन्तो मीडियाचं गोवन वार्ता लाईव्ह हे गोव्याचं पहिलं मराठी महाचॅनल लोकांच्या सेवेसाठी सज्ज होतंय. गोवन वार्ता लाईव्हचं लोकार्पण अर्थात लाँचिंग समारंभ धनत्रयोदशीच्या सुमुहूर्तावर शुक्रवार दि. 13 नोव्हेंबर रोजी सकाळी 10.30 वाजता होणार आहे.
दोनापावल इथल्या ताज हॉटेल अॅण्ड कन्वेन्शन सेंटर येथे होणार्या या कार्यक्रमाला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, उपमुख्यमंत्री चंद्रकांत उर्फ बाबू कवळेकर आणि महाराष्ट्राचे माहिती-जनसंपर्क महासंचालक डॉ. दिलीप पांढरपट्टे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
गोमंतकीयांचा बुलंद आवाज
गोव्यात मराठी चॅनलची उणीव भरून काढतानाच गोमंतकीयांचा बुलंद आवाज म्हणून गोवन वार्ता लाईव्ह पुढे येत आहे. विविधांगी कार्यक्रम आणि ताज्या घडामोडींच्या अपडेट्सच्या खजिन्यासह गोवन वार्ता लाईव्हची वेबसाईट यापूर्वीच लाँच करण्यात आली. केबल टीव्हीवरील प्रक्षेपणासह वेबसाईटवरील लाईव्ह स्ट्रिमिंग, यूट्यूब, फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, वॉट्सअॅप, टेलिग्राम अशा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर महाचॅनलच्या माध्यमातून न्यूज अपडेट्स मिळतील.
उत्सुकता शिगेला…
गोवन वार्ता लाईव्हच्या प्रोमोजना मिळणारा भरघोस प्रतिसाद तसेच हटके वार्तांकनाला मिळणारी पसंती या पार्श्वभूमीवर गोव्यात आणि गोव्याबाहेरही गोवन वार्ता लाईव्ह चॅनलविषयी उत्सुकता शिगेला पोहोचलीय. कोरोना महामारीच्या अनुषंगाने एकूणच माध्यम क्षेत्रात आलेली मरगळ झटकून टाकणारा हा चॅनल फोमेन्तो मीडियाच्या माध्यमातून लोकार्पणास सज्ज झाला आहे.
फोमेन्तो मीडियाचं आणखी एक दमदार पाउल
गोव्याच्या माध्यम क्षेत्रातील आघाडीचा ब्रँड म्हणून ख्यातकीर्त असलेल्या फोमेन्तो मीडियानं मराठी चॅनलच्या माध्यमातून आणखी एक दमदार पाउल टाकलंय. फोमेन्तो मीडियाच्या द गोवन, गोवन वार्ता, भांगरभूंय या वर्तमानपत्रांसह प्रुडंट मीडिया, सिंधुदुर्ग लाईव्ह या चॅनलच्या पंक्तीत आता गोवन वार्ता लाईव्ह या गोव्याच्या पहिल्या मराठी महाचॅनलचा समावेश होतोय.