आपल्या स्वातीचं भाषणं ऐकायलाच हवं!

राष्ट्रीय युवा संसदेत गोंयकारांचा आवाज गुंजणार

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : नवी दिल्लीत सेंट्रल हॉलमध्ये गोव्याचा आवाज गुंजणार आहे. राष्ट्रीय युवा संसद महोत्सवात गोव्याचं प्रतिनिधीत्व करणारी स्वाती मिश्रा हीचं भाषण होणार आहे. या महोत्सवात स्वतंत्र राज्य म्हणून गोव्याला पहिल्यांदाच प्रतिनिधीत्व मिळतंय. या व्यतिरिक्त उत्तरेतून प्रियांका कदम आणि दक्षिणेतून प्रेम कुमार हे विद्यार्थी जिल्हा प्रतिनिधी म्हणून युवा संसदेत सहभागी होणार आहेत. सकाळी कार्यक्रमाला सुरूवात झाली. संध्याकाळच्या सत्रात सर्व राज्यांचे प्रतिनिधीत्व करणारे युवा प्रतिनिधी भाषण करणार आहेत. यांतून तिघांची निवड होणार आहे. १२ रोजीच्या युवा दिवसानिमित्त राष्ट्रीय युवा संसदेच्या समारोप कार्यक्रमात हे तिघे युवा प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर भाषण करतील.


या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण लोकसभा टीव्ही आणि वेबकास्ट https://webcast.gov.in/parliament वर सुरू आहे. गोव्याची स्वाती मिश्रा ही उत्तर गोव्यातील फोंड्यातील आहे. तिचे शालेय शिक्षण मातोश्री इंदिराबाई खांडेपारकर हायस्कूलात झालं. तिथून ती जीव्हीएम उच्च माध्यमिक महाविद्यालयात विज्ञान शाखेत शिकली. सध्या ती मडगाव येथील पार्वतीबाई चौगुले महाविद्यालयात द्वितीय वर्ष विज्ञान शाखेत शिकते. तिचे वडील मायनिंग इंजिनियर आहेत तर आई गृहिणी आहे. तिचं नाव जरी मिश्रा असलं तरी तिचा जन्म आणि शिक्षण गोव्यात झालंय. विज्ञान शाखेची विद्यार्थिनी असूनही विविध सांस्कृतिक कार्यक्रमात ती नेहमीच आघाडीवर असते.

पंतप्रधान मोदींची संकल्पना

18 ते 25 या वयोगटातील युवकांची मते ऐकण्यासाठी राष्ट्रीय युवा संसद महोत्सव (National Youth Parliament Festival – NYPF) याचे आयोजन केले जाते. ही मूळ संकल्पना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 31 डिसेंबर 2017 रोजी त्यांच्या मन की बात या उपक्रमाच्या भाषणात मांडली. या संकल्पनेतून प्रेरणा घेऊन पहिला एनवायपीएफ 17 ते 29 जानेवारी 2019 या काळात ‘बी द व्हॉइस ऑफ न्यू इंडिया अँड फाइंड सोल्युशन अँड कॉन्ट्रिब्यूट टू पॉलिसी’ (नव्या भारताचा आवाज बना आणि मार्ग शोधा आणि यंत्रणेत सहभागी व्हा) या विषयाला अनुसरून आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमामध्ये एकूण 88,000 युवकांनी भाग घेतला होता.

दुसऱ्या एनवायपीएफला 23 डिसेंबर 2020 रोजी व्हर्च्युअल पद्धतीने (आभासी माध्यमातून) प्रारंभ झाला. देशभरातून 2.34 लाख युवकांनी याच्या पहिल्या टप्प्यात भाग घेतला. त्यापाठोपाठ राज्य युवा संसद देखील व्हर्च्युअप माध्यमातून 1 ते 5 जानेवारी 2021 या काळात सुरू झाली. राष्ट्रीय विजेत्यांना राष्ट्रीय परीक्षक राज्यसभेच्या खासदार श्रीमती रूपा गांगुली, लोकसभेचे खासदार परवेश साहिब सिंग आणि प्रख्यात पत्रकार प्रफुल्ला केतकर यांच्या समोर बोलण्याची संधी मिळणार आहे. अंतिम तीन विजेत्यांना पंतप्रधानांसमोर समारोप समारंभाच्या प्रसंगी 12 जानेवारी रोजी बोलण्याची संधी मिळणार आहे.

राष्ट्रीय युवा महोत्सव

राष्ट्रीय युवा महोत्सव हा प्रत्येक वर्षी 12 ते 16 जानेवारी या काळात साजरा केला जातो. 12 जानेवारी हा दिवस स्वामी विवेकानंद यांची जयंती म्हणून देशभर राष्ट्रीय युवा दिवस म्हणून साजरा केला जातो. या वर्षी राष्ट्रीय युवा महोत्सवाबरोबरच ‘एनवायपीएफ’ चे देखील आयोजन करण्यात आले आहे.

युवकांना त्यांच्यातील प्रतिभा दाखविण्याची संधी मिळावी, जणू भारताचे लघुरूपच तयार करून त्यांना एक हक्काचे व्यासपीठ निर्माण करून देणे, जेथे युवकांना औपचारिक आणि अनौपचारिक पद्धतीने आपल्या विचारांची देवाण घेवाण करता येईल आणि आपली सामाजिक आणि सांस्कृतिक विभिन्नतेची देवाण घेवाण करता येईल. राष्ट्रीय एकत्रीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी देखील हे आहे, जातीय सलोख्याचा आपलेपणा, बंधुभाव, धैर्य आणि साहस यांना प्रोत्साहन देण्यासाठी आहे. याचा मूलभूत हेतू म्हणजे एक भारत श्रेष्ठ भारत ही भावना, सार आणि संकल्पना यांचा प्रचार करणे.

कोविड- 19 मुळे, राष्ट्रीय युवा महोत्सव हा व्हर्च्युअल (आभासी) पद्धतीने आयोजित करण्यात आला आहे. ‘YUVAAH – Utsah Naye Bharat ka’ (युवा – उत्साह नये भारत का) हा यंदाच्या महोत्सवाचा विषय आहे. 24 व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचा उद्‌घाटन समारंभ आणि दुसऱ्या राष्ट्रीय युवा संसद महोत्सवाचा समारोप समारंभ दोन्हीही एका दिवशी म्हणजे 12 जानेवारी 2021 रोजी संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये आयोजित करण्यात आले आहेत. 24 व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचा समारोप डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्र, नवी दिल्ली येथे 16 जानेवारी 2021 रोजी होणार आहे.

LIVE | आपल्या स्वातीचं भाषणं ऐकायलाच हवं! पाहा, राष्ट्रीय युवा संसद महोत्सवातील युवाशक्तीचा आवाज 👇🏻

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!