पारंपरिक पिकांकडे गोमंतकीय शेतकऱ्यांचे दुर्लक्ष

लागवडीखालील क्षेत्रात मोठी घट

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी: राज्यातील शेतकऱ्यांनी भात, ऊस, भुईमूग या पारंपरिक पिकांऐवजी भाजीपाला, नारळ आणि फळांच्या लागवडीस अधिक प्राधान्य देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे गेल्या साडेपाच वर्षांत भात, ऊस आणि भुईमूग लागवडीच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात घट होऊन भाजीपाला, नारळ लागवड क्षेत्रात वाढ झाली आहे.

उपमुख्यमंत्री तथा कृषिमंत्री बाबू कवळेकर यांनी पावसाळी अधिवेशनात दिलेल्या लेखी प्रश्नाच्या उत्तरातून कृषी लागवडीखालील घटत्या क्षेत्राची माहिती समोर आली आहे. मंत्री कवळेकर यांनी दिलेल्या उत्तरात २०१५ ते २०२१ पर्यंत कोणत्या पिकासाठी किती क्षेत्र लागवडीखाली आणले आहे, याची माहिती दिली आहे.

भात आणि ऊस पिकांच्या लागवडीखालील क्षेत्रात गेल्या साडेपाच वर्षांत मोठ्या प्रमाणात घट

भात आणि ऊस गोमंतकीय शेतकऱ्यांची पारंपरिक पिके होती. पण, गेल्या साडेपाच वर्षांत या दोन्ही पिकांच्या लागवडीखालील क्षेत्रात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. २०१५-१६ मध्ये खरीप आणि रब्बी या दोन्ही हंगामांत राज्यातील ४१,३४४ हेक्टर जमीन भात शेतीसाठी वापरात आली होती. त्यानंतर त्यात सातत्याने घट झाली. २०१६-१७ मध्ये ४०,८२३, २०१७-१८ मध्ये ३८,५२०, २०१८-१९ मध्ये ३६,३८४, २०१९-२० मध्ये ३४,६९८ हेक्टर जमीन भात लागवडीखाली होती. २०२०-२०२१ मध्ये त्यात पुन्हा २,०२१ हेक्टरने घट होऊन चालू वर्षी ३२,६७७ हेक्टरमध्ये भाताची लागवड करण्यात आली आहे.

ऊस लागवडीखालील क्षेत्राच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास २०१५-१६ मध्ये राज्यातील १,१३९ हेक्टर जमीन ऊस लागवडीखाली होती. त्यानंतर हे क्षेत्र कमी होत गेले. २०१६-१७ मध्ये ८९७, २०१७-१८ मध्ये ९१०, २०१८-१९ मध्ये ८८८, २०१९-२० मध्ये ८११ हेक्टर जमीन ऊस लागवडीखाली होती. तर २०२०-२०२१ केवळ ५४५ हेक्टर जमिनीत ऊस लागवड केली आहे.

भुईमूग लागवडीकडे गोमंतकीय शेतकऱ्यांनी पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचे आकडेवारीतून दिसून येते. २०१५-१६ मध्ये राज्यातील १,८९८ हेक्टर जमीन भुईमूग लागवडीखाली होती. त्यानंतर २०१६-१७ मध्ये हे क्षेत्र १,६८९, २०१७-१८ मध्ये १,५३७, २०१८-१९ मध्ये ४२४, २०१९-२० मध्ये १७० हेक्टर झाले. तर चालू २०२०-२०२१ मध्ये केवळ ७४ हेक्टर क्षेत्रात भुईमूग लागवड केल्याचे स्पष्ट झाले आहे.

सहा वर्षांपूर्वी राज्यात डाळींचे उत्पादन समाधानकारक होत होते. पण त्यानंतर या क्षेत्रातही मोठ्या प्रमाणात घट झाली. २०१५-१६ मध्ये राज्यातील ७,१५४ हेक्टर क्षेत्र डाळींच्या लागवडीखाली होते. २०१६-१७ मध्ये त्यात घट होऊन हे क्षेत्र ५,८८७ हेक्टर झाले. २०१७-१८ मध्ये ५,५४०, २०१८-१९ मध्ये ६,२०३, २०१९-२० मध्ये ४,३९८ आणि चालू २०२०-२०२१ मध्ये ३,८४० हेक्टर क्षेत्रात डाळींची लागवड करण्यात आली आहे.

भाजी लागवड क्षेत्रात वाढ

भाजीपाला लागवडीकडे गोमंतकीय शेतकऱ्यांकडून अधिक लक्ष देण्यात येत आहे. त्यामुळे गेल्या साडेपाच वर्षांत भाजी लागवडीखालील क्षेत्रात वाढ झाली आहे. २०१५-१६ मध्ये ७,२४० हेक्टर क्षेत्रात भाजीपाला लागवड करण्यात आली होती. त्यानंतर २०१६-१७ मध्ये ७,३७९, २०१७-१८ मध्ये ७,५३४, २०१८-१९ मध्ये ७,६२५, २०१९-२० मध्ये ७,८५२ हेक्टर जमीन भाजीपाला लागवडीखाली आली. चालू वर्षी राज्यातील ८,०३० हेक्टर जमीन भाजीपाला लागवडीखाली आहे.

फळ लागवडीस प्रोत्साहन (जमीन हेक्टरमध्ये)

फळ २०१५-१६ २०१६-१७ २०१७-१८ २०१८-१९ २०१९-२० २०२०-२१
काजू ५६,६०९ ५६,७३५ ५६,२४८ ५६,४१७ ५६,४७६ ५६,८२९
नारळ २५,८१८ २५,९१३ २६,१६९ २६,३८१ २६,५४२ २६,६२९
सुपारी १,७८३ १,८०९ १,८३६ १८३६ १,९७१ २,०६३
आंबा ४,८८४ ४,९२० ४,९६९ ५,००१ ५,०३४ ५,०६२
केळी २,४१४ २,४३५ २,४२८ २,४११ २,४६० २,४७२

हा व्हिडिओ पहाः FRAUD | बँकेची नोकरी गेलीच, अटकेची कारवाई

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!