लसीकरणाच्या नावानं गोयकारांनाच ‘गोवा सफर’

ऑनलाईन पोर्टल नोंदणीत 'सावळा गोंधळ' ; गुड गव्हर्नन्सचा उडाला फज्जा !

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : सरकारने जाहीर केल्याप्रमाणे शनिवारपासून 18 ते 44 वर्षांपर्यंतच्या लोकांसाठी लसीकरण सुरू झाले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या लसीकरणासाठी ऑनलाईन पोर्टलवरून नोंदणी केलेल्यांना राज्यातील ठिकठिकाणच्या केंद्रांवर पाठविण्यात आलंय. ही केंद्रे जवळही नसून उत्तर गोव्यातील लोकांना दक्षिणेत तर दक्षिणेतील लोकांना उत्तरेत स्लॉट मिळाल्याची खबर आहे.
मांद्रेचे माजी सरपंच आणि विद्यमान पंच राघोबा गावडे यांनी फोनवरून दिलेल्या माहितीनुसार मांद्रे येथील केंद्रावर लसीकरणासाठी लागलेली रांग अनोखळी लोकांचीच होती. चौकशीअंती यापैकी अनेकजण मडगावातून तर राज्यातील अन्य भागांतून आल्याचे कळले. मांद्रेतील जनता मात्र या लोकांना पाहत राहीली,असे ते म्हणाले. भाजपचे नेते दत्तप्रसाद नाईक यांनी ट्वीटरवरून आपला असाच अनुभव कथन केलाय. गुड गव्हर्नन्सची सर्वोच्च पातळी यानिमित्ताने पाहायला मिळाली,असा टोला त्यांनी हाणलाय. आपल्याला सांगेत तर आपल्या पत्नीला कासांवलीत लसीकरणाची संधी मिळालीए,असं ते म्हणाले. आपल्या आणखी एका मित्राला काणकोणात तर त्याच्या पत्नीला कुंकळ्ळीत लसीकरणासाठी बोलावलंय. हे लसीकरण म्हणजे दक्षिण गोव्याचा टूर ठरल्याचेही ते म्हणालेत.


राज्यात 18 ते 44 वर्षांसाठीचे लसीकरण शनिवारपासून सुरू झालंय. केवळ 32 हजार लसींचा साठा सरकारकडे पोहचलाय. यासाठी मोठ्या प्रमाणात नोंदणी झाली. पहिल्या काही अवध्या मिनिटांतच ही नोंदणी पूर्ण झाली. या नोंदणीनंतर लसीकरणासाठी निश्चित केलेली केंद्रे ही लोक राहत असलेल्या ठिकाणांपासून दूरची असल्याने हा नेमका काय प्रकार आहे,असा सवाल लोकांकडून उपस्थित केला जातोय.

ऑनलाईन नोंदणीची सोय करा

आपल्या राज्याच्या साक्षरतेचे कितीही दाखले सरकार देत असले तरी ऑनलाईन पद्धतीच्या नोंदणीच्या सक्तीमुळे अनेक पात्र लाभार्थी वंचित राहणार आहेत. सरकारने प्रत्येक पंचायत आणि पालिकेत या नोंदणीची सोय करावी जेणेकरून प्रत्येक पात्र नागरीक या लसीकरणाचा लाभ मिळवू शकेल. जे कुणी स्वतः ऑनलाईन नोंदणी करतात ते बरं आहे पण ज्यांना नोंदणीचे ज्ञान नाही त्यांच्यासाठी ही सोय उपलब्ध व्हावी, अशी मागणी मांद्रेचे पंच राघोबा गावडे यांनी केली.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!