महिला, पुरुष साक्षरतेत गोवा तिसरा; केरळ अव्वल!

Goan Varta Live | प्रतिनिधी
पणजी : महिला आणि पुरुषांच्या साक्षरतेत गोवा तिसऱ्या क्रमांकावर आहे. या यादीत केरळ अव्वल स्थानी तर मिझोरम दुसऱ्या क्रमांकावर आहे. सर्वात कमी साक्षरतेच्या यादीत बिहार क्रमांक एकवर आहे. केंद्र सरकारतर्फे नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण २०१९-२० मधून ही माहिती समोर आली आहे.
१९ जून २०१९ ते ३० डिसेंबर २०१९ या कालावधीत देशभरातील २२ राज्यांमध्ये हा सर्वे करण्यात आला होता. गोव्यात ९३ टक्के महिला आणि ९६.३ टक्के पुरुष साक्षर आहेत. शहरी भागातील ९२.६, तर ग्रामीण भागातील ९३.४ टक्के महिला साक्षर आहेत. तर शहरी भागातील ९४.९
आणि ग्रामीण भागातील ९८.५ टक्के पुरुष साक्षर असल्याचे अहवालातून समोर आले आहे. केरळमध्ये सर्वाधिक ९८.२ टक्के नागरिक साक्षर आहेत. तेथील ९८.३ टक्के महिला आणि ९८.२ टक्के पुरुष साक्षर असल्याचे अहवाल सांगतो. तर दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या मिझोरममध्ये
९७.१ टक्के जनता साक्षर आहेत. त्यात महिलांची टक्केवारी ९४.४, तर पुरुषांची टक्केवारी ९७.१ टक्के इतकी असल्याचे अहवालातून दिसून येते.
सर्वात कमी साक्षरता असलेल्या राज्यांत बिहार क्रमांक एकवर आहे. तेथील ७८.५ टक्के जनताच साक्षर आहेत. बिहारातील ५७.८ टक्के महिला आणि ७८.५ टक्के पुरुष साक्षर आहेत. या यादीत आंध्र प्रदेश दुसऱ्या क्रमांकावर आहे. तेथील ६८.८ टक्के महिला आणि ७९.५ टक्के पुरुष
साक्षर आहेत. तर तिसऱ्या क्रमांकावर पश्चिम बंगाल असून, तेथील ७६.१ टक्के महिला आणि ८१.६ टक्के पुरुष साक्षर असल्याचे अहवालातून स्पष्ट होते.
गोव्याशेजारी असलेल्या महाराष्ट्रातील ८४.६ टक्के महिला, तर ९३ टक्के पुरुष साक्षर आहेत. तर कर्नाटकातील ७६.७ टक्के महिला आणि ८८.५ टक्के पुरुष साक्षर असल्याचेही स्पष्ट झाले आहे. दरम्यान, राज्यात शिक्षणाचा अधिकाधिक प्रसार व्हावा, एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू
नये, यासाठी राज्य सरकार तसेच विविध स्वयंसेवी संस्था गेल्या अनेक वर्षांपासून प्रामाणिकपणे प्रयत्न करीत आहेत. त्याचेच फळ म्हणून २०१५-१६ च्या तुलनेत यंदा साक्षरतेचे प्रमाण वाढलेले दिसून येते. आगामी काही वर्षांत गोवा शंभर टक्के साक्षर असलेले राज्य बनेल, अशी हमी दिलेले
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत त्या दिशेने कामही करीत आहेत.
साक्षरता मोहिमांना राज्यात यश
- साक्षरतेचे प्रमाण वाढविण्याबाबत गोवा सरकार गेल्या अनेक वर्षांपासून राबवित असलेल्या विविध मोहिमांना मोठ्या प्रमाणात यश आल्याचे या अहवालातून स्पष्टपणे दिसून येते.
- २००५-०६ मध्ये केलेल्या सर्वेक्षणात गोव्यातील ८३.६ टक्के महिला आणि ९०.३ टक्के पुरुष साक्षर असल्याचे दिसून आले होते. त्यानंतर २०१५-१६ च्या सर्वेत ८९ टक्के महिला आणि ९४.७ टक्के पुरुष साक्षर असल्याचे समोर आले. गेल्या चार वर्षात महिलांच्या साक्षरतेत ३.६, तर
पुरुष साक्षरतेत सुमारे दोन टक्क्यांची वाढ झालेली दिसून येते. - राज्यातील शहरी भागांपेक्षा ग्रामीण भागांत साक्षरतेचे प्रमाण अधिक आहे. यावरून राज्यात शिक्षणाची गंगा तळागाळातील जनतेपर्यंत
पोहोचल्याचेच सिद्ध होते.