‘ओस्सय ओस्सय’ | गोवा शिगमोत्सवाची तारीख जाहीर

यंदा तीन शहरांतूनच होणार शिमगोत्सव मिरवणूक

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : कोविडच्या पार्श्वभूमीवर यंदा पणजी, म्हापसा आणि फोंडा या तीनच शहरांत शिमगोत्सव मिरवणूक काढली जाणार आहे. यातील पहिली मिरवणूक ३ एप्रिल रोजी पणजीत; तर दुसरी मिरवणूक ४ रोजी म्हापशात होईल. फोंड्यातील मिरवणुकीची तारीख निश्चित झालेली नाही, अशी माहिती उपमुख्यमंत्री आजगावकर यांनी शुक्रवारी दिलीये. दरम्यान, यंदा फोंडा आणि म्हापसा येथेच मिरवणूक घेण्याबाबत निर्णय झाला होता. मात्र, आमदार मोन्सेरात यांनी पणजीत चित्ररथ मिरवणूक व्हावी, अशी मागणी केली होती. त्यानुसार राजधानीतूनही मिरवणूक निघेल. फोंडा आणि म्हापसा येथे होणाऱ्या चित्ररथ स्पर्धेसाठी अनुक्रमे ६०, ५० व ४० हजारांची बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. त्याशिवाय अन्य काही बक्षिसेही आहेत.

पर्यटनमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली शिगमोत्सव समितीची बैठक

पर्यटनमंत्री बाबू आजगावकर यांच्या अध्यक्षतेखाली शिगमोत्सव समितीची बैठक पर्यटन भवनमध्ये झाली. पर्यटनमंत्री आजगावकर यांनी घेतलेल्या या समितीच्या बैठकीला पर्यटन संचालक मिनिनो डिसोझा, पणजीचे महापौर उदय मडकईकर, वाहतूक पोलिस अधीक्षक अरविंद गावस, उत्तर गोवा पोलिस अधीक्षक उत्कृष्ट प्रसून, पणजीचे माजी नगरसेवक मंगलदास नाईक, पर्यटन विकास महामंडळाचे निखिल देसाई तसंच इतर अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत महत्त्वाच्या विषयांवर चर्चा

शिगमोत्सव समितीची बैठकीत शिगमोत्सव मिरवणुकीसाठीच्या मार्गासंदर्भात तसंच वाहतूक व्यवस्थेबाबतचा आराखडा तयार करण्याबाबत चर्चा झाली. शिगमोत्सव हा पारंपरिक महोत्सव असल्याने कोरोनाच्या महामारीमुळे तो प्रत्येक शहरामध्ये न घेता तीनच ठिकाणी घेण्यात येत असल्याचे मंत्री आजगावकर यांनी स्पष्ट केलं. या महोत्सवासाठी निश्चित करण्यात आलेल्या बक्षिसांची माहिती त्यांनी दिलीये.

पणजीत शिगमोत्सव आयोजनाची शिफारस

शिगमोत्सव दोन जिल्ह्यातील एका शहरात आयोजित करण्याचा निर्णय झाला होता. त्यानुसार उत्तरेत म्हापशात तर दक्षिणेत फोंडा ही ठिकाणं निश्चित झाली होती. पणजीत शिगमोत्सव होणार नसल्यानं पणजी शिगमोत्सव समितीने पणजीचे आमदार बाबुश मोन्सेरात यांच्याशी चर्चा केली व राजधानी पणजीत हा शिगमोत्सव आयोजित करण्याची मागणी केली. त्यानुसार मोन्सेरात यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी चर्चा केली व पणजीत शिगमोत्सव आयोजनाची शिफारस केली. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आदेशाने आता पणजीतही शिगमोत्सव आयोजित करण्यावर निर्णय झाला आहे.

शहरी भागात अप्रुप चित्ररथ मिरवणुकीचं

ग्रामीण भागातील गोमंतकीयांची नाळ पारंपरिक शिगमोत्सवाशी जुळलेली असली, तरी शहरी भागात मात्र शिगमोत्सवाने आधुनिक रुप धारण केल्याचं दिसतं. हा बदल गेल्या २० ते २५ वर्षांत घडला आहे. राज्य सरकारतर्फे रोमटामेळ व चित्ररथांची स्पर्धा आयोजित केली जाते. त्यासाठी राजधानी पणजी, मडगाव, म्हापसा, फोंडा, वास्को या प्रमुख शहरांसह तालुक्यांच्या ठिकाणी मिरवणुका आयोजित केल्या जातात. या मिरवणुका पाहण्यासाठी हजारोंची गर्दी जमते. देशी – विदेशी पर्यटक येतात. पर्यटनवृद्धीसाठी कार्निव्हलच्या धर्तीवरील एक ‘इव्हेंट’ असंच या मिरवणुकीचं स्वरुप बनलं आहे. यातील रोमटामेळ हा प्रकार रोमांचक अनुभव असतो.

‘शिगमो परेड’चं आकर्षण

शिगमोत्सवाच्या काळात गोव्यातील शहरी भागातील रस्त्यावर ‘शिगमो परेड’चा जल्लोष पाहायला मिळतो. अनेकजण पारंपरिक पोशाख परिधान करून मोठ्या उत्साहाने या परेडमध्ये सहभागी होतात. परेडमध्ये सहभागी झालेल्या महिला लोकनृत्य सादर करतात. हजारोनी पर्यटक शिगमो परेडमध्ये सहभागी होतात. राज्यभरात निघणाऱ्या या परेडमध्ये गोव्यातील संस्कृतीचे दर्शन होतं. या रंगीबेरंगी परेडमध्ये नृत्य, संगीत आणि चित्ररथांची रेलचेल असते. मिरवणुकीमध्ये फुगडीसारखा पारंपरिक खेळ खेळला जातो. गोव्यातील रस्त्यांच्या दुतर्फा सुंदर सजावट केल्याचे पाहायला मिळते. राज्य सरकारदेखील या परेडला सर्वोतोपरी सहाय करते. रंगीबेरंगी पोशाख परिधान करून परेडमध्ये सहभागी झालेले अनेकजण हातात रंगीबेरंगी ध्वज घेऊन मिरवताना दिसतात. तसंच ढोल, ताशा आणि बासरीचे सुमधूर सूर आसमंतात गुंजतात.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!