फेब्रुवारी महिन्यात बेरोजगारीत गोवा तिसऱ्या क्रमांकावर

राज्याचा बेरोजगारी दर २१ टक्क्यांवर; नोकऱ्यांसाठी रांगा

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी: राज्यावर करोनाचं संकट अद्यापही घोंघावत असल्यानं बेरोजगारी दरात वाढच होत चाललीये. यंदा जानेवारी महिन्याच्या तुलनेत फेब्रुवारीमध्ये गोव्यातील बेरोजगारीचा दर सुमारे चार टक्क्यांनी वाढून २१.१ टक्क्यांवर पोहोचला आहे. फेब्रुवारीतील सर्वोच्च बेरोजगारी दरात गोवा देशात तिसऱ्या क्रमांकावर असल्याची माहिती भारतीय अर्थव्यवस्थेची प्रत्येक महिन्याला देखरेख करणाऱ्या सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी (सीएमआयई) या संस्थेने दिलीये.

हेही वाचाः EXCLUSIVE INTERVIEW | गोवा निवडणूक आयोग सरकारच्या हातातलं बाहुलं झालय?

सर्वोच्च बेरोजगारी दर असलेले हरयाणा

फेब्रुवारी महिन्यात सर्वोच्च बेरोजगारी दर असलेले राज्य म्हणून हरयाणाची नोंद झाली आहे. या महिन्यात तेथे बेरोजगारी दर २६.४ टक्के राहिला. या यादीत राजस्थान दुसऱ्या क्रमाकांवर आहे. तेथे बेरोजगारी दर २५.६ टक्के राहिला. त्यानंतर गोव्याचा क्रमांक लागत असून, गोव्यात फेब्रुवारीत बेरोजगारीचा दर २१.१ टक्के नोंद झाला आहे.

फेब्रुवारीत गोव्याच्या बेरोजगारी दर २.८ टक्के

फेब्रुवारी २०२० मध्ये गोव्याच्या बेरोजगारीचा दर २.८ टक्के असल्याचं ‘सीएमआयई’ने जाहीर केलं होतं. त्यानंतरच्या प्रत्येक महिन्यात या दरात चढउतार होत राहिली. मार्चमध्ये ५.२, एप्रिलमध्ये १३.३, मेमध्ये २१.२, जूनमध्ये १०, जुलैमध्ये १७.१, ऑगस्टमध्ये १६.२, सप्टेंबरमध्ये १५.५, ऑक्टोबरमध्ये १०.९, नोव्हेंबरमध्ये १५.९, डिसेंबरमध्ये १३.२, तर जानेवारी २०२१ मध्ये राज्यातील बेरोजगारी दर १६ टक्के होता. पण फेब्रुवारीमध्ये त्यात चार टक्क्यांनी वाढ झाल्याचे ‘सीएमआयई’च्या आकडेवारीत नमूद करण्यात आले आहे.

हा करोनाचाच फटका : कोचकर

करोना काळातील लॉकडाऊनमुळे राज्यातील अनेक कंपन्या, आस्थापनांना मोठा आर्थिक फटका बसला. त्याचा परिणाम म्हणून हजारो कर्मचाऱ्यांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या. ही परिस्थिती अजूनही म्हणावी तशी रुळावर आलेली नाही. त्यातच करोनाची दुसरी लाट येण्याचाही धोका निर्माण झालेला आहे. त्यामुळेच गोव्याच्या बेरोजगारी दरात वाढ होत आहे, असे राज्य औद्योगिक संघटनेचे अध्यक्ष दामोदर कोचकर यांनी स्पष्ट केले. राज्यातील रोजगाराची समस्या लक्षात घेऊन तरुणांनी व्यवसाय, उद्योग उभारणीवर लक्ष केंद्रित केलं पाहिजे, असंही कोचकर यांनी नमूद केलं.

राज्य औद्योगिक संघटनेचे अध्यक्ष दामोदर कोचर
ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!